आपल्या आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून शेअर करणे अलीकडे जणू नेटकरींचे कर्तव्यच बनले आहे. त्यामुळे विविध विषयांवरील बातम्या, ताज्या घडामोडी, छायाचित्रे, व्हिडीओ तसेच खासगी आयुष्यातील आनंद-दु:खाचे प्रसंग अशा गोष्टी दर सेकंदाला फेसबुकवरून शेअर होत असतात. या साऱ्यांना आता संगीतमय स्पर्शही होणार आहे. फेसबुकने वापरकर्त्यांना त्यांचे आवडते गाणे आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘म्यूझिक स्टोरीज’ नावाची ही सुविधा सध्या केवळ आयफोनधारकांसाठी उपलब्ध आहे. मात्र, लवकरच ती अँड्रॉइड आणि विंडोज स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठीही सुरू होण्याची शक्यता आहे.
आयफोनवरील फेसबुकचे वापरकर्ते त्यांच्या भावना किंवा मूड दर्शवणारी गाणी अॅपल म्यूझिक किंवा स्पॉटीफायच्या मदतीने शेअर करू शकतील. वापरकर्त्यांना या दोन्हीपैकी एका साइटवरील गाण्याची लिंक फेसबुकवर शेअर करता येईल. तसेच त्यासोबत आपली प्रतिक्रिया किंवा टिप्पणीही नोंदवता येईल. इतरांनी या लिंकवर क्लिक केल्यास त्यांना ३० सेकंदांसाठी हे गाणे ऐकता येईल. हे गाणे आवडल्यानंतर अन्य वापरकर्ते ते विकत घेऊ शकतात किंवा त्याच्या खात्यामध्ये साठवू शकतात. ‘म्यूझिक स्टोरीज’ ही सेवा न्यूज फीडचाच एक भाग आहे. अॅपलचे आयटय़ून स्टोअर किंवा स्पॉटीफाय या दोन्ही अॅपवर सध्या गाणी डाऊनलोड करण्यासोबत शेअर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ‘स्पॉटीफाय’ स्वत: कोणताही मजकूर किंवा लिंक फेसबुकवर टाकणार नसून वापरकर्ता त्याच्या मनाप्रमाणे टाकू शकणार असल्याचे स्पॉटीफायच्या प्रवक्त्या मार्नी ग्रीनबर्ग यांनी सांगितले.
अनेक संगीतकार, गायकांना त्यांची गाणी फेसबुकच्या पेजवर किंवा सीडी बेबीसारख्या माध्यमातून विकत आहेत. मात्र त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यांची प्रसिद्धी होत नसल्याने गाणी संगीतप्रेमींपर्यंत पोहोचत नाहीत. आता मात्र फेसबुकने ही सुविधा उपलब्ध केल्याने या संगीतकार- गायकांना नवीन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
‘म्यूझिक स्टोरीज’ या नव्या सुविधेचे स्वागत होत असले तरी या क्षेत्रातील इतर प्रतिस्पर्धी नाराज आहेत. या सुविधेचा फक्त दोन कंपन्यांनाच फायदा होणार असून ऑनलाइन गाणी ऐकण्याची सुविधा देणाऱ्या इतर कंपन्यांवर फेसबुक अन्याय करत असल्याचे, सध्या फेसबुकवरील पहिल्या पाचमध्ये असलेले म्यूझिक वॉच कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. सध्या ही सुविधा आयफोन वापरकर्त्यांपुरतीच मर्यादित असली तरी ती लवकरच अँड्रॉइड आणि विंडोजवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र फेसबुकने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने अँड्रॉइड आणि विंडोज वापरकर्त्यांचा हिरमोड होणार आहे.
कशी वापराल सुविधा?
अॅपलचे आयटय़ून स्टोअर किंवा स्पॉटीफाय या दोन अॅपवरून ही गाणी फेसबुकवर शेअर करता येणार आहेत. यासाठी प्रथम फेसबुकची परवानगी घेणे आवश्यक आहे. यानंतर वापरकर्ता आपल्या आवडीचे गाणे फेसबुक वॉलवर टाकू शकतो. त्याने गाण्याची लिंक शेअर केल्यानंतर इतर ते गाणे ३० सेकंद ऐकू शकतात. आवडल्यास ते या सेवा संकेतस्थळांवरून खरेदी करू शकतात.
– प्रतिनिधी
फेसबुकवर गाण्यांतून व्यक्त व्हा!
‘म्यूझिक स्टोरीज’ नावाची ही सुविधा सध्या केवळ आयफोनधारकांसाठी उपलब्ध आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 17-11-2015 at 09:07 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook launches music stories