बरोब्बर पंधरवडय़ानंतर ब्राझील नामक देशात फुटबॉलचा कुंभमेळा भरणार आहे. मात्र तत्पूर्वी सहा महिने आधीच जगभरातील वातावरण फुटबॉलमय झाले आहे. फुटबॉल तसा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ! त्यामुळे फुटबॉल विश्वचषकाकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. अनेक मोबाइल, तंत्रज्ञान कंपन्याही फुटबॉल विश्वचषकासंबंधित विविध अॅप्स, मोबाइल गेम, व्हिडीओ गेमची निर्मिती करून वातावरण फुटबॉलमय बनवत आहेत. अनेक चाहत्यांनीही वर्ल्डकपसंबंधीचे अॅप्स, गेम्स डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. सध्या तंत्रज्ञानाच्या युगात फुटबॉल विश्वचषकही तंत्रज्ञानयुक्त बनविण्यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. विश्वचषकामध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्यात फुटबॉलमध्ये एचडी दर्जाचे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यावरून यंदाचा विश्वचषक तंत्रज्ञानमय होत असल्याची प्रचीती येते.
फुटबॉल विश्वचषकासंबंधीचे प्रमुख अॅप्स
सध्या प्रत्येक हाती स्मार्टफोन असल्याने प्रत्येक जण आवश्यक असे अॅप्स डाऊनलोड करत असतो. मग फुटबॉल विश्वचषकही त्यात मागे कसा राहील. फुटबॉल विश्वचषकासंबंधीचे अनेक अॅप्स तंत्रज्ञान कंपन्यांनी तयार केले आहेत. विश्वचषकातील सामन्यांचा थरार, विविध बातम्या, रोमांचकारी माहिती, विविध संघांसंबंधी माहिती अशा अनेक प्रकारच्या माहितीचा खजिना या अॅप्समधून तुम्हाला मिळणार आहे. काही प्रमुख अॅप्सविषयी माहिती..
फिफा ऑफिशिअल अॅप
फुटबॉलच्या जागतिक नियामक संस्थेने (फिफा) हा अॅप तयार केलेला आहे. फुटबॉलसंबंधित सर्व ताज्या बातम्या, छायाचित्रे, व्हिडीओ हा अॅप पुरवणार आहे. फिफाचे नियम, फुटबॉलसंबंधित त्यांचे कार्य आदी प्रशासकीय माहितीही हा अॅप पुरवणार. विश्वचषकात सध्या काय चालू आहे, कोणता संघ कोणत्या स्थानी याची माहितीही हा अॅप देणार असून, हा मोफत अॅप असल्याचे फिफाकडून सांगण्यात आलेले आहे.
ईएसपीएन एफसी सॉकर अॅण्ड वर्ल्डकप
फुटबॉल विश्वचषकासंबंधी ईएसपीएनने हा अॅप तयार केला आहे. विश्वचषकातील सर्व सामन्यांची खोलवर माहिती, बातम्या हा अॅप पुरवणार. या अॅपद्वारे तुम्ही फुटबॉलचा सामना लाइव्ह पाहू शकता. त्यावर प्रतिक्रियाही देऊ शकता. ईएसपीएनचे क्रीडासमीक्षक आणि विश्लेषकांकडून प्रत्येक सामन्याचे विश्लेषण, मीमांसा करण्यात येणार असून, त्याची माहिती या अॅपद्वारे तुम्हाला मिळू शकते. विश्वचषक संपल्यानंतर या अॅपमधून तुम्हाला इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, एमएलएस आदी फुटबॉलसंबंधित मालिकांमधील बातम्या, माहितीही तुम्हाला मिळू शकते.
युनिव्हिजन डिपोर्टिज
फुटबॉल विश्वचषकात जर तुमचा आवडता संघ अर्जेटिना असेल किंवा तुम्ही स्पेनचे चाहते आहात, तर तुमच्या आवडत्या संघाविषयीची संपूर्ण माहिती या अॅपद्वारे मिळेल. तुमच्या आवडत्या संघाची कामगिरी, मालिकेतील स्थान, बातम्या तुम्हाला वेळोवेळी हा अॅप पुरवेल. त्याचप्रमाणे विश्वचषकातील प्रत्येक सामन्याची हायलाइट्स, क्षणोक्षणीचा स्कोर आणि बातम्या हा अॅप पुरवणार. समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) विश्वचषकासंबंधी काय चालू आहे, हेही हा अॅप सांगणार. विश्वचषक संपल्यानंतरही फुटबॉलसंबंधीची माहिती, बातम्या हा अॅप्स वेळोवेळी पुरवणार.
ब्राझील २०१४ काऊंटडाऊन
तुम्ही विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहात आहात? तुम्ही पहिला सामना कधी सुरू होतो याच्या प्रतीक्षेत आहात? मिनिट टू मिनिट तुम्ही मोजत आहात, तर हा अॅप डाऊनलोड कराच. या अॅपने उलट गणती (काऊंटडाऊन) सुरू केली आहे. आतापासून विश्वचषक सुरू होईपर्यंत लागणारा वेळ हा अॅप तुम्हाला सांगत राहील.
वर्ल्ड सॉकर फायनल्स
विश्वचषकासंबंधी माहिती देणाऱ्या सवरेत्कृष्ट अॅपच्या तुम्ही शोधात आहात, तर हा अॅप तुमच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करेल. विश्वचषकाचे वेळापत्रक, प्रत्येक सामन्याचा गोलफलक, गुणपत्रक, प्रत्येक फुटबॉलपटूची माहिती आणि बरेच काही हा अॅप पुरवणार आहे. हा अॅप मोफत आहे, मात्र ०.९९ डॉलर भरून हा अॅप अपग्रेन केल्यास अधिक चांगली माहिती मिळू शकते. एखादा सामना पाहण्याचा तुमच्याकडून राहिला असेल, तर या अॅपवर त्याची सोय आहे. हा सामना तुम्ही या अॅपच्या व्हिडीओवर पाहू शकता.
फुटबॉल विश्वचषकासंबंधी प्रसिद्ध मोबाइल गेम
स्कोअर वर्ल्ड गोल
या मोबाइल गेममध्ये फुटबॉलच्या सामन्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. जसे तुम्ही प्रत्यक्ष फुटबॉलच खेळत आहात, असा भास या गेममधून होईल. तुमच्या समोर फुटबॉलचे जाळे असून, तुम्हाला या जाळ्यात बॉल टाकून गोल करायचा आहे. तुमच्यासमोर एक मॅप असेल, त्यात तुम्हाला किती गोल करायचे असेल, याची माहिती असेल. तेवढे गेाल तुम्ही केलेत, तर तुम्ही पुढील लेव्हलमध्ये जाल.
फिफा वर्ल्ड कप
२०१०मध्ये झालेल्या विश्वचषकासंबंधी हा गेम बनविण्यात आला आहे. या गेममध्ये तुम्हाला किती गोल करायचे आहेत, याचे आव्हान केले जाते. तुम्ही तितके गोल केल्यास तुमचा पुढील लेव्हलमध्ये प्रवेश होईल.
फिफा १४
फिफाकडून हा गेम बनविण्यात आला आहे. या गेमद्वारे तुम्ही फुटबॉल विश्वचषकाचा थरार अनुभवू शकता. फुटबॉल विश्वचषक ज्याप्रमाणे खेळविला जाणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही कोणत्याही एका संघाचे नियंत्रण होऊन हा गेम खेळू शकता. त्याचप्रमणे स्कॉटिश प्रीमिअर लीग, ब्राझिलिअन लीग अशा विविध लीगही तुम्ही खेळू शकता.
फुटबॉल मॅनेजर वर्ल्डकप
या गेमद्वारे तुम्ही केवळ फुटबॉल खेळू शकणार नाहीत, तर एखाद्या संघाला कोचिंगही करू शकणार आहात. म्हणजेच हा गेम तुम्हाला फुटबॉलचा कोचही बनविणार आहे. तुम्हाला यासाठी एखाद्या संघाची निवड करायची आहे. तुम्ही या संघाला मार्गदर्शन करायचे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे हा संघ सामना खेळेल. म्हणजे या संघावर तुमचे नियंत्रण असेल.