‘भविष्यातील तंत्रज्ञान’ म्हणून नावाजल्या गेलेल्या गुगल ग्लासबद्दल आतापर्यंत बरंच काही छापून, दिसून आलं आहे. डोळय़ांवर बसणारया चष्म्यात सामावलेला कम्प्युटर हे गुगल ग्लासचे वर्णन केले जाते. ई मेल, मेसेज वाचणे असो की एखादे छायाचित्र घेणे असो, एखाद्या ठिकाणाचा नकाशा पाहणे असो की एखाद्या वास्तूची माहिती घेणे असो, हातांचा वापर न करता केवळ शब्दांच्या आज्ञेवरून डोळय़ांसमोर ऑपरेट होणारा गुगल ग्लास एक अविस्मरणीय अनुभूती आहे.
पण आपली चर्चा गुगल ग्लासविषयी नाही, तर गुगल ग्लासला पर्याय म्हणून बाजारात दाखल होत असलेल्या ग्लास अप बद्दल आहे. इटलीतील ग्लास अप या कंपनीने गुगल ग्लाससारखाच डोळय़ांवर बसणारा कम्प्युटर चष्मा तयार केला असून पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात तो बाजारात येऊघातला आहे. गुगल ग्लासच्या तुलनेत अत्यंत स्वस्त हे या चष्म्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. गुगल ग्लासची किंमत 1500 ते 1800 डॉलरच्या घरात असण्याची शक्यता असताना ग्लास अप मात्र 399 डॉलरमध्ये ( अंदाजे 24 हजार रुपये) उपलब्ध होणार आहे. अर्थात गुगल ग्लासच्या तुलनेत ग्लास अपमध्ये अनेक वैशिष्टय़ांची कमतरता आहे. गुगल ग्लासमध्ये छायाचित्रे घेण्यापासून अनेक वैशिष्टय़े असली तरी ग्लास अप हे मेल, मेसेज, ट्विटर, फेसबुक यावरील अपडेट्स वाचण्याइतपतच उपयुक्त आहे. कारण त्यावरून मेसेज पाठवण्याची यंत्रणा नाही. स्मार्टफोन आणि ब्लूटुथ यांच्याद्वारे ग्लासअपशी जोडता येते व त्यानंतर तुमच्या मोबाइलवर आलेला प्रत्येक मेसेज किंवा ई मेल ते तुमच्या डोळय़ांसमोर आणते.
अर्थात काही बाबतीत ग्लास अप गुगलपेक्षाही उजवा ठरू शकतो. कमी किंमत ही त्यातील एक बाब आहेच. पण ग्लास अपमध्ये आलेले मेसेज वा ई मेल चष्म्याच्या मधोमध तरीही दृष्टीला कोणताही अडथळा न करता उभे राहतात. त्यामुळे गुगल ग्लासमध्ये असलेली डोळय़ांच्या त्रासाची भीती ग्लास अपमध्ये उरणार नाही.
‘ग्लासअप’ फेब्रुवारी 2014मध्ये येणार असले तरी त्याची हवा आतापासूनच निर्माण झाली आहे. खुद्द गुगलनेही या प्रोडक्टची दखल घेत इटालियन कंपनीला प्रोडक्टचे नाव बदलण्यास सांगितले आहे. ‘ही आमच्यासाठी एकप्रकारची सरशीच आहे,’ असे कंपनीचे म्हणणे आहे.
किंमत २३ हजार ५०० रुपये अंदाजे

Story img Loader