आजची तरुणाई इतर कारणांबरोबरच अभ्यासासाठीदेखील स्मार्टफोनचा मोठ्याप्रमाणावर वापर करत आहे. इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ ४४ टक्के विद्यार्थी वर्ग सुरू असताना स्मार्टफोनमध्ये नोट्स घेतात, तर दहापैकी सातजण विद्यापीठाचे इमेल पाहाण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. अरुबा नेटवर्क्सने केलेल्या १५०० मुलांच्या पाहणीतून जवळजवळ एकपंचमांश मुले ही स्मार्टफोनवर पाच तास इंटरनेट वापरात घालवत असल्याचे आढळून आले, तर दी टेलिग्राफच्या अहवालात ६५ टक्के मुलांकडे तीन किंवा त्यापेक्षा जास्त स्मार्टफोन असल्याचे म्हटले आहे. पाहणी केलेल्या विद्यार्थ्यांमधील जवळजवळ अर्ध्या मुलांनी शाळेच्या तासांपेक्षा बाहेर अभ्यास करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगत, यामुळे अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंटरनेटवर पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या सेवा कॉफी शॉप आणि पबमध्ये बसून अॅक्सेस करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले. अनेक विद्यापीठे नव्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देत आहेत अथवा ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह सर्विसद्वारे विद्यार्थ्यांना सकाळच्या तासांमध्ये सहभागी करून घेत आहेत. जेणेकरून विद्यार्थी जेथे असतील तेथून वर्गाशी जोडलेले राहू शकतील आणि त्यांचे वर्ग बुडणार नाही. विद्यार्थ्यांबरोबर संपर्कात राहाण्यासाठी अनेकजण सोशलमीडियाचादेखील वापर करत आहेत.