सहज, जलद आणि चटपटीत संवादांचे सर्वात प्रभावी माध्यम बनलेले ‘व्हॉट्सअॅप’ वापरणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ संदेशच नव्हे तर फोटो, व्हिडीओ, संपर्क क्रमांक पाठवण्याची आणि सुलभ संभाषणाची सुविधा देणारे हे अॅप्लिकेशन अतिशय उपयुक्त असल्याने अल्पावधीतच ते फेसबुक किंवा ट्विटरपेक्षाही लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळेच सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी आता ‘व्हॉट्सअॅप’वर पडू लागली असून आकर्षक मेसेजेस पाठवून वापरकर्त्यांची माहिती हॅक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
सामाजिक संवादाचे प्रभावी माध्यम असलेल्या ‘व्हॉट्सअॅप’वर दररोज नवनवीन अफवांचे मेसेज फिरतच असतात. ‘हा मेसेज दहा मित्रांना पाठवा आणि दहा रुपयांचा रिचार्ज मिळवा’, ‘हा मेसेज दहा जणांना पाठवा आणि ‘व्हॉट्सअॅप’ मोफत मिळवा’ अशा भुलवणाऱ्या मेसेजेसपासून ‘आपले राष्ट्रगीत जगातील सवरेत्कृष्ट राष्ट्रगान ठरले आहे..’, ‘जगातील सर्वात प्रभावी व्यक्ती बनवण्यासाठी शिवाजी महाराजांना मतदान करा..’ अशी भावनिक आवाहने करून एकच मेसेज लाखो वापरकर्त्यांमध्ये फिरवणाऱ्या संदेशांची ‘व्हॉट्सअॅप’वर भलतीच चलती आहे. या मेसेजेसवर विश्वास ठेवून ते ‘फॉरवर्ड’ करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॉट्सअॅप’वर एक संदेश प्रचंड वेगाने पसरत चालला आहे. व्हॉट्सअॅपची कॉलिंग सुविधा सुरू करण्यासाठी दहा लोकांना निमंत्रण पाठवण्याचे आवाहन करणारा हा मेसेज प्रत्यक्षात एक मोठा सायबर हल्ला आहे. वापरकर्त्यांची माहिती हॅक करून तिचा गैरवापर करण्याच्या हेतूने हा मेसेज प्रसारित होत असल्याचे उघड झाले आहे.
एरवी व्हॉट्सअॅपवरून पसरवले जाणारे नकली अथवा खोटे संदेश निरुपद्रवी असल्याने इतरांचा ‘मनस्ताप’ वाढवण्यापलीकडे त्याचा काही धोका नसतो. मात्र, ‘व्हॉट्सअॅप कॉलिंग’ नावाने येणाऱ्या मेसेजेसपासून वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला मोठा धोका निर्माण होत आहे.
“Hey, I am inviting you to try whatsapp Calling click here to activate now-> http://WhatsappCalling.com.” असा हा संदेश सध्या सर्वत्र फिरत आहे. व्हॉट्सअॅपवरील नवीन सुविधा म्हणून वापरकर्ते या लिंकवर क्लिक करतात, तेव्हा ‘व्हॉट्सअॅप’सारखाच पृष्ठभाग असलेल्या एका संकेतस्थळावर ते पोहोचतात. तेथे त्यांना पुढे जाण्यासाठी आपल्या दहा मित्रांना ‘इन्व्हाइट’ करण्याचे आवाहन केले जाते. तसे केल्यानंतर वापरकर्त्यांला एका ‘सव्र्हे’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. मग पुढे या सव्र्हेच्या माध्यमातून काही अॅप्स डाउनलोड करण्याची सूचना येते. हे अॅप्स अतिशय धोकादायक असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. या अॅप्सद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये काही ‘मालवेअर’ शिरकाव करतात. ते वापरकर्त्यांची माहिती, डाटा आपल्या सव्र्हरकडे पाठवतात. या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून फिरणाऱ्या या मेसेजेसना अनेकांनी ‘क्लिक’ केले आहे आणि त्यातून आपल्या मित्रमंडळींनाही या ‘स्पॅम’चे सावज बनवले आहे. यापैकी ज्यांनी सव्र्हे भरण्याचे अथवा अॅप्स डाउनलोड करण्याचे टप्पे पूर्ण केले नसतील, त्यांना या ‘स्पॅम’चा फारसा धोका नाही. मात्र, ज्यांनी या प्रक्रिया पूर्ण केल्या असतील, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटी आहे.
‘व्हॉट्सअॅप’ने काही महिन्यांपूर्वीच आपल्या अॅपमध्ये ‘कॉलिंग’ सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, याचाच गैरफायदा घेत ‘हॅकर्स’ आणि सायबर हल्लेखोर व्हॉट्सअॅप यूजर्सना लक्ष्य करीत आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय हाच अशा धोकादायक संदेशांपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्याला किंवा आपल्या एखाद्या ग्रुपवर आलेले असे ‘आवाहनवजा’ संदेश पुढे पाठवण्याची प्रत्येकालाच घाई असते. हे करताना त्या संदेशाच्या सत्यतेची खातरजमा केली जात नाहीच; शिवाय सदसद्विवेकबुद्धीला प्रश्नही विचारले जात नाहीत. वापरकर्त्यांच्या याच ‘स्वभावा’चा आता सायबर हल्लेखोर गैरफायदा घेऊ लागले आहेत. ‘व्हॉट्सअॅप मोफत मिळवण्यासाठी हा मेसेज दहा जणांना पाठवा. त्यांनी तो वाचला की तुमच्या व्हॉट्सअॅपचा आयकॉन निळा होईल. म्हणजे तुम्ही आजीवन मोफत ‘व्हॉट्सअॅप’ मिळवू शकता’ असे सांगणारे संदेश अगदी सुरुवातीपासून फिरत आहेत. ते खोटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही ते ‘फॉरवर्ड’ करणारे महाभाग कमी नाहीत. अशी बेफिकीरीच पुढे वापरकर्त्यांना सायबर हल्लेखोरांच्या किंवा हॅकर्सच्या जाळय़ात ओढते.
आजघडीला व्हॉट्सअॅपवरून दररोज ३० अब्जांहून अधिक संदेशांची देवाणघेवाण होते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे लक्ष त्याकडे वळू लागले आहे. विशेषत: भारतासारख्या देशात तर ‘व्हॉट्सअॅप’वरून बनावट मेसेजेस पाठवण्याचे प्रमाण भरपूर आहे. ‘ट्राय’ने नकोशा कॉल्स आणि ‘स्पॅम’ एसएमएसवर बंधने आणल्यापासून सायबर हल्लेखोरांनी आपला मोर्चा व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाकडे वळवला आहे. याचे परिणाम अद्याप उघडपणे दिसत नसले तरी त्यापासून ‘व्हॉट्सअॅप’ वापरकर्त्यांना मोठा धोका संभवतो. त्यामुळे ‘व्हॉट्सअॅप’चा बेफिकीरपणे वापर करणाऱ्या प्रत्येकानेच आता सावध होण्याची गरज आहे.
आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com