बसमधून, रेल्वेतून प्रवास करताना किंवा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत असताना एक दृश्य हमखास दिसते.. आपल्या आजूबाजूला बसलेल्यांपैकी किमान एक तरी व्यक्ती मोबाइलवर ‘कॅण्डीक्रश’ खेळत आहे.. या दृश्यात ‘कॅण्डीक्रश’च्या ऐवजी ‘अँग्री बर्ड’ किंवा ‘टेम्पल रन’ दिसेल. पण बाकी त्यात कोणताही फरक दिसणार नाही. मोबाइलवरील गेम्सनी प्रत्येक मोबाइलधारकाला इतकं व्यापून टाकलं आहे की चालता, बोलता, धावता, बसता, जेवता, झोपता अशा प्रत्येक क्रियेदरम्यान जराशी उसंत मिळाली की हाताची बोटं स्मार्टफोनच्या स्क्रीनशी खेळू लागतात. जितक्या वेगानं भारतात स्मार्टफोननी आपलं प्रस्थ निर्माण केलं, तितक्याच किंबहुना त्याहुन दुप्पट वेगाने भारत ‘मोबाइल गेमिंग’चा मोठा उपभोक्ता देश बनत चालला आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर वाईट असतोच, पण वापर आणि अतिवापर यांची फूटपट्टी प्रत्येक व्यक्तीनुसार ठरते. त्यामुळे मोबाइल गेमिंग वाईट की चांगलं, याची चर्चा करत बसण्यात अर्थ नाही. मात्र, अलीकडच्या काळात केवळ भारतच नव्हे, तर जगभरात ज्या वेगाने ‘मोबाइल गेमिंग इंडस्ट्री’ विस्तारत चालली आहे, तो वेग निश्चितच दखलपात्र आहे. अँड्राइड किंवा अॅपलच्या स्टोअरवर ‘फ्री’ उपलब्ध असलेले हे गेम्स लाखोंच्या संख्येने डाउनलोड होतात, खेळले जातात. पण त्याचबरोबर या स्टोअरवरून गेम खरेदी करून खेळणाऱ्यांची संख्याही अफाट आहे. ‘अॅपअॅनी’ आणि ‘आयएचएस’ या आंतरराष्ट्रीय विपणन संशोधन संस्थांनी जमा केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी-२०१३मध्ये मोबाइल गेम्सवर १६ अब्ज डॉलर खर्च केले गेले. त्याआधीच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम जवळपास तिप्पट आहे. त्यातही आशिया आणि विशेषत: भारत, चीनसारख्या देशांत मोबाइल गेम्ससाठी पैसे मोजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाली आहे. जपानमधील गुंगहो, ब्रिटनची किंग, फिनलँडची सुपरसेल, अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक्स आर्ट्स आणि जपानमधील लाइन या कंपन्या गेल्या वर्षी ‘मोबाइल गेमिंग’च्या बाजारात अव्वल होत्या.
हे सगळं झालं मोबाइल गेमिंगचं अर्थकारण. पण ‘मोबाइल गेम्स’ हे आता एक प्रकारचं व्यसन बनलं आहे. याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर ‘फ्लॅपी बर्ड’ या गेमचं द्यावं लागेल. गेल्या वर्षी मे महिन्यात अॅपलच्या आयओएसवर दाखल झालेल्या या गेमला अल्पावधीतच इतकी लोकप्रियता मिळाली की अवघ्या सात महिन्यांत अमेरिकेतील सर्वाधिक डाउनलोड
केलं जाणारं ‘अॅप’ म्हणून ते प्रसिद्ध झालं. पण या ‘गेम’चं आबालवृद्धांना इतकं व्यसन लागलं की, गेम बनवणाऱ्या ग्युहेन हा दोंग या व्हिएतनामी डेव्हलपरने दोन आठवडय़ांपूर्वी तो बंदच करून टाकला. ‘फावल्या वेळात लोकांनी हा गेम खेळावा असं मला वाटत होतं. पण या गेमचं इतकं व्यसन लागलंय की मलाच ते आवरणं कठीण झालंय’ अशी प्रतिक्रिया या ग्युहेनने दिली. ‘मोबाइल गेम्स’ची आजची अवस्था सांगायला ग्युहेनचे हे शब्द पुरेसे आहेत. केवळ तरुण पिढीच नव्हे तर मध्यमवयीन किंवा त्याहून मोठय़ांमध्येही ‘मोबाइल गेम्स’चं आकर्षण वाढतच चाललं आहे. इतकंच नव्हे तर ‘प्ले फोन’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत मोबाइल गेम खेळणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण ६८ टक्के इतकं आहे आणि त्यातही ७१ टक्के महिला या विवाहित आहेत. या महिलांमध्येही जवळपास निम्म्या महिला ४० ते ६४ या वयोगटातील आहेत. मोबाइल गेम्सची क्रेझ कशी फोफावत चालली आहे, हे सांगायला ही आकडेवारी पुरेशी आहे.
अँड्राइड/आयओएसवरील लोकप्रिय गेम्स
अँग्री बर्ड
मोबाइल गेिमगला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती अँग्री बर्डमुळे. डुकरांच्या पिल्लांना पक्षी फेकून मारण्याचा हा गेम म्हणजे उत्तम ग्राफिक्स आणि जबरदस्त कल्पनाशक्तीचा आविष्कारच म्हणावा लागेल. हा गेम बाजारात लाँच झाल्यापासून आजतागायत अव्वल स्थानी कायम आहे.
अस्फाल्ट ८ एअरबोर्न
रस्त्यांवरील गाडय़ांची शर्यत गेिमगमध्ये आता खूप मागे पडली आहे. याला ‘अस्फाल्ट ८ एअरबोर्न’ हे एक कारण म्हणता येईल. यात केवळ शर्यतच नाही तर गाडीच्या साह्य़ाने हवेत वेगवेगळय़ा करामती करण्याचीही संधी असते.
तीन पत्ती
हे नाव घेतल्यानंतर त्याचं वेगळं वर्णन सांगायला नको. भारतात आजघडीला सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या गेम्समध्ये तीन पत्तीचा समावेश होतो. यात आपल्या मित्रमंडळींसह ऑनलाइन खेळण्याची मजा आहेच. शिवाय यावरील पब्लिक रूमच्या माध्यमातून जगभरातील प्लेअर्सशी आपल्याला ‘तीन हात’ करता येतात.
कॅण्डी क्रश सागा
लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे स्मार्टफोनवर हा गेम न खेळणारा क्वचितच कोणी आढळेल. गेल्या वर्षी आयफोन आणि आयपॅडवर सर्वाधिक डाउनलोड केला गेलेला गेम म्हणून ‘कॅण्डी क्रश’चं वर्णन करता येईल. वेगवेगळय़ा फळांची/मिठायांची संगती साधून जेली फोडण्याच्या या गेमनं लोकप्रियतेच्या बाबतीत फेसबुक आणि यूटय़ुबलाही मागे टाकले आहे. यामध्ये तब्बल ४०० लेव्हल्स असून हाही व्यसन लावणारा गेम आहे. याचं वेड इतकं आहे की, या गेमच्या माध्यमातून ‘किंग’ ही कंपनी दररोज तब्बल ७ लाख डॉलरचा व्यवसाय करते.
फिफा १४
स्मार्टफोनवरील ग्राफिक्स आणि परफॉर्मन्स यांचा योग्य मिलाफ असलेला हा गेम किशोरवयीनांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. कम्प्युटरवरील फुटबॉल गेमप्रमाणे बनवण्यात आलेल्या या गेममधून खराखुरा फुटबॉल खेळण्याइतका आनंद मिळू शकतो.
टेम्पल रन
एका गुहेतून बाहेर आलेल्या माकडांपासून स्वत:चा बचाव करत पळणाऱ्या माणसाचा हा गेम भारतात अतिलोकप्रिय आहे. जगभरात तब्बल १७ कोटी लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे.
सब वे सर्फर
समोरून येणाऱ्या रेल्वेगाडय़ा चुकवत, त्यांच्यावरून उडय़ा मारत नाणी जमा करत निघालेला हा ‘सब वे सर्फर’ अगदी लहान मुलांनाही प्रेमात पाडणारा आहे.
कट द रोप
एका छोटय़ा राक्षसाला कॅण्डी भरवण्यासाठी दोर कापण्याचं आव्हान ठेवणारा हा गेम जबरदस्त रंजक गेम आहे. आजवर ४० कोटीहून अधिक वेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे.
गेम्स फ्री?.. नाहीच!
अँड्रॉइड किंवा अॅपलच्या आयओएसवर असलेले गेम्स मोफत असल्याने ते सर्रास डाउनलोड केले जातात. हे गेम्स ‘फ्री’ असतील तर मग ते बनवणारे डेव्हलपर्स किंवा कंपन्या यांना उत्पन्न कसे मिळते, हा प्रश्न पडतो. पण मोबाइल गेमिंगची ही ‘स्ट्रॅटर्जी’ही हटके आहे. यातील प्रत्येक गेम मोफत डाउनलोड करता येतो. तो खेळता खेळता वापरकर्त्यांला त्याचं व्यसन लागतं. मग, गेममध्ये पुढे येणाऱ्या कठीण लेव्हल्स पार करण्यासाठी त्याला ‘रिअल कॅश’, ‘कॉइन्स’ किंवा तत्सम नावे असलेल्या गोष्टी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. गेममध्ये आकंठ बुडालेले असंख्य लोक अशी खरेदी करतातच. त्यातूनच कंपन्यांची कमाई होते. याशिवाय गेम्स चालू असताना स्क्रीनच्या तळाशी किंवा डोक्यावर झळकणाऱ्या जाहिराती हे उत्पन्नाचं साधन असतंच. हा फॉम्र्युला इतका नामी आहे की अॅपलच्या आयओएससाठी मोफत गेम बनवणाऱ्या काही कंपन्यांची रोजची कमाई पाच लाख डॉलरच्या घरात आहे.
सुरक्षिततेचा मुद्दा
मोबाइलवरील अॅप्स वापरकर्त्यांची माहिती चोरत असल्याचे याआधीच उघड झाले आहे. यात गेम्सही मागे नाहीत. अनेक गेम्स खेळण्यासाठी ‘इंटरनेट कनेक्शन’ आवश्यक असते, ते याच कारणासाठी. गेम ‘इन्स्टॉल’ केल्यानंतर ते ‘तुमची काही माहिती हे अॅप्लिकेशन शेअर करू इच्छिते’ अशा स्वरूपाची सूचना पाठवते. गेम्स खेळण्याच्या नादात आपण याकडे लक्ष देत नाही. मात्र, पडद्यामागे आपली माहिती एका विशिष्ट सव्र्हरला पाठवली जात असते. शिवाय फेसबुक किंवा जीमेलच्या माध्यमातून लॉग इन करून आपले संपर्कही ‘उचलले’ जातात. यामुळे वापरकर्त्यांची सुरक्षा पणाला लागतेच.
मोबाइलवरील गेम्सनी प्रत्येक मोबाइलधारकाला इतकं व्यापून टाकलं आहे की चालता, बोलता, धावता, बसता, जेवता, झोपता अशा प्रत्येक क्रियेदरम्यान जराशी उसंत मिळाली की हाताची बोटं स्मार्टफोनच्या स्क्रीनशी खेळू लागतात.