प्रत्येकालाच आस असते ती नव्याची. त्यात गरिब- श्रीमंत असा भेद नसतो कधीच.. त्यामुळेच सध्याच्या युगात परवडत नसला तरी प्रत्येकाला आपल्या हाती स्मार्टफोन असावा, असे वाटत असते. पण अनेकांच्या मनात या स्मार्टफोन नामक प्रकाराबद्दल काहीशी धाकधूक असते. आजवर फीचर फोन वापरलेला असतो. त्यामुळे मग तो टचस्क्रीन आपल्याला जमेल का, इथपासून ते स्मार्टफोन वापरायचा कसा आणि नाही जमलाच वापरायला तर मग काय असायचे असे अनेक प्रश्न सतावत असतात. त्यामुळेच अनेकदा थेट मोठय़ा ब्रॅण्डेड स्मार्टफोनकडे थेट न जाता एखाद्या तुलनेने लहान असलेल्या कंपनीचा स्मार्टफोन घेऊन सुरुवात करावी आणि मग सरावल्यानंतर ब्रॅण्डेड कंपन्यांच्या मोठय़ा स्मार्टफोनकडे जावे, असे अनेकांना वाटत असते. भारतामध्ये असे वाटणारा वर्ग मोठा आहे. शिवाय मोठे ब्रॅण्डेड फोन न परवडणाऱ्या ग्राहकांची संख्याही अधिक आहे. हे सारे लक्षात घेऊनच मध्यंतरी बाजारात आलेल्या कार्बन, मायक्रोमॅक्स यांच्यासारख्या कंपन्यांनी या मधल्या फळीतील ग्राहकवर्गासाठी नवीन अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम असलेले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. अनेक कंपन्यांनी फीचर फोनच्या किमतीत परवडतील असे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या स्पर्धेतील एक महत्त्वाची कंपनी म्हणजे कार्बन. कार्बननेही आता अद्ययावत असलेल्या अँड्रॉइड ४.४ किटकॅट या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केलेला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
प्रथमदर्शनी हा स्मार्टफोन दिसायला आयफोनसारखाच आहे. क्षणभर फसगत होऊ शकते असे डिझाइन आहे. मात्र आयफोनला मध्यभागी असलेले गोलाकार बटन ही त्याची खासियत आहे ती यात नाही हे लक्षात आल्यावर खरी बाब आपल्या लक्षात येते. स्क्रीन कपॅसिटीव्ह पद्धतीचा आयपीएस डिस्प्ले असलेला आहे. स्क्रीन ४ इंचांचा आहे. मोबाइलच्या उजव्या बाजूला वरती ऑन-ऑफचे बटन तर त्याखाली चाìजग डॉक आहे. वरच्या बाजूस हेडफोन जॅक तर डाव्या बाजूला वरती व्हॉल्यूम कंट्रोलची सोय आहे. इअरफोनच्या बाजूला व्हीजीए कॅमेरा आहे. तर मागच्या बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्याच बाजूला फ्लॅशची सोयही आहे. तर खालच्या बाजूस मागे स्पीकर्स आहेत.
पूर्वी मोठय़ा व्यावसायिकांमध्ये एक ट्रेंड होता तो म्हणजे व्यवसायासाठी वेगळे आणि खासगी कामासाठी वेगळे सिमकार्ड वापरले जायचे. प्रत्यक्षात दोन फोन वापरले जायचे. मात्र नंतर एकाच उपकरणात दोन सिम कार्डांची सोय असलेले डय़ूएल सिम फोन बाजारात आले. आता तर हा ट्रेंड जनसामान्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे आता सामान्य माणसेही डय़ूएल सिम फोन वापरतात. हा ट्रेंड लक्षात घेऊन कार्बननेही हा स्मार्टफोन डय़ूएल सिमच ठेवलेला आहे. या डय़ुएल सिम फोनसाठी १.३ गिगाहर्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर वापरला आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम अद्ययावत किटकॅट वापरण्यात आली आहे. क्वाड कोअर प्रोसेसरच्या वापरामुळे सिस्टीम हँग होणे टाळले जाते आणि स्मार्टफोन चांगल्या वेगात काम करतो.
स्मार्टफोनमध्ये ४ जीबी इंटर्नल मेमरी असून एसडी कार्डाच्या माध्यमातून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. ५ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासोबत दिलेला फ्लॅश ही चांगली उपयुक्त बाब आहे. घरातील फोटो बेतास बात आले तरी बाहेरचे चित्रण मात्र चांगले येते असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले.
सध्या मोटो जी आणि मायक्रोमॅक्सचा युनाइट टू या दोन्हींच्या स्पर्धेत सध्या हा कार्बन टायटॅनिअम एस ९९ उतरला आहे. याचा स्क्रीन ४ इंचांचा असून म्हणूनच किंमतही एक हजार रुपयांनी कमी ठेवली आहे. वैगुण्य एकच की, १४०० एमएएच असलेली बॅटरी अनेकदा थ्रीजी वापरताना वेगात खाली येते.
फीचर फोनवरून ज्यांना स्मार्टफोनच्या दिशेने उडी घ्यायची आहे आणि ज्यांचा थ्रीजीचा वापर फारसा असणार नाही त्यांच्यासाठी कार्बन टायटॅनिअम एस ९९ चांगला पर्याय ठरू शकतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ५,९९०.
डिस्प्ले – ४ इंच
स्क्रीन – कपॅसिटिव्ह
प्रोसेसर – .३ गिगाहर्ट्झ
रॅम- ५१२ एमबी
समोरचा कॅमेरा – आहे
पाठीमागचा कॅमेरा- ५ मेगापिक्सेल
फ्लॅशची सोय – आहे
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.४
इंटर्नल स्टोरेज – ४ जीबी
एक्स्पान्डेबल मेमरी – ३२ जीबीपर्यंत
कनेक्टिव्हिटी – वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ
एफएम – सोय आहे
बॅटरी – १४०० एमएएच
कार्बन टायटॅनिअम एस९९
प्रत्येकालाच आस असते ती नव्याची. त्यात गरिब- श्रीमंत असा भेद नसतो कधीच.. त्यामुळेच सध्याच्या युगात परवडत नसला तरी प्रत्येकाला आपल्या हाती स्मार्टफोन असावा, असे वाटत असते.
First published on: 22-08-2014 at 06:37 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karbonn titanium s99