मोठा डिस्प्ले, चांगला वेग व उत्तम कॅमेरा!
सध्या जमाना आहे तो मोठय़ा आकाराच्या स्क्रीनचा. पूर्वी चांगला मोबाइल म्हणजे आकाराने आटोपशीर, हातात मावेल असा छोटेखानी, कामाला वेगवान आणि वारंवार हँग न होणारा असे समीकरण होते. पण आता तो जमाना केव्हाच मागे पडला आहे. सध्या जमाना आहे तो मोठा डिस्प्ले असलेल्या मोबाइलचा. आापल्या मोबाइलचा डिस्प्ले स्क्रीन हा आकाराने कमीतकमी ४ इंचाचा तरी असावा, असे हल्ली प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच आता अनेक कंपन्यांनी बाजारात आणलेल्या मोबाइलचे डिस्प्ले स्क्रीन्स हे ४.३, ४.५ किंवा ५.३ अथवा ५.५ इंचाचे आहेत. मध्यंतरीच्या काळात ४.३ आणि ४.५ हे स्टँडर्ड झाले होते. मात्र आता गेल्या काही महिन्यांत सॅमसंग गॅलेक्सी एस ४ आणि सॅमसंग गॅलेक्सी नोट-टूची चलती वाढल्यानंतर तो डिस्प्ले स्क्रीन कमीतकमी ५ इंचाचा तर असावाच, असं वाटणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पाच इंचांचा स्क्रीन हाच जवळपास स्टँडर्ड झालेला पाहायला मिळेल.
पण दुसरीकडे स्क्रीनचा आकार वाढला की, त्यानुसार मोबाइलची किंमतही वाढत जाते. पाच इंचांच्या वरचे अनेक कंपन्यांचे मोबाइल हे १७ ते १८ हजारांच्या पुढे विक्रीसाठी आहेत. हे लक्षात ठेवूनच आता मॅक्स मोबाइल या कंपनीने त्यांची एएक्स८ रेस आणि एएक्स९ झेड रेस अशी दोन मोठय़ा आकाराच्या स्क्रीनची मॉडेल्स बाजारात आणली आहेत.
एएक्स९झेड रेस हा थ्रीजी/ जीएसएम अधिक जीएसएम असा डय़ुएल सिम स्मार्टफोन असून तो अँड्रॉइडच्या जेली बीन ४.१.१ या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. याचा डिस्प्ले ५.३ इंचांचा असून तो फाइव्ह पॉइंट मल्टिटच कपॅसिटीव्ह स्क्रीन आहे. यामध्ये थ्रीजी आणि टूजी दोन्हींचा वापर करणे सहज शक्य आहे.
५.३ इंचांचा क्यूएचडी डिस्प्ले – सध्या मोठय़ा आकाराच्या स्क्रीनची असलेली आवड गृहीत धरून कंपनीने या स्मार्टफोनसाठी ५.३ इंचांचा डिस्प्ले ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा क्यूएचडी डिस्प्ले असून त्याचे रिझोल्युशन ९६० गुणिले ५४० एवढे आहे. त्यामुळे यावरील चित्रण चांगले आणि सुस्पष्ट दिसते.
सेन्सर्स – एएक्स९ झेडमध्ये विविध प्रकारचे सेन्सर्स वापरण्यात आले आहेत. त्यात प्रॉक्झिमिटी, अ‍ॅक्सिलेरोमीटर, लाइट सेन्सर आदींचा समावेश आहे. याशिवाय ग्रॅव्हिटी सेन्सरही देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही फोन उजवीकडे, डावीकडे किंवा खाली-वर असा फिरवलात तर ते फोनमधील यंत्रणेच्या सहज लक्षात येते आणि त्यानुसार समोर असलेला डिस्प्ले स्क्रीन स्वत:हून कार्यरत होतो.
चांगला कॅमेरा – हा स्मार्टफोन दिसायला सुंदर तर आहेच, पण त्याचे बाह्य़रूपही तितकेच आकर्षक आहे. याचा पुढच्या बाजूस व मागच्या बाजूस असलेला असे एकूण मिळून दोन्ही कॅमेरे हे चांगल्या रिझोल्युशनचे आहेत. ही खूप महत्त्वाची अशी बाब आहे. कारण सध्या बाजारपेठेत मेगापिक्सेलच्या नावाने ग्राहकांना उल्लू बनविण्याचे धंदे सुरू आहेत.
८ मेगापिक्सेल व चांगले रिझोल्युशन – सामान्य ग्राहकाला काही कॅमेरा आणि मोबाइलमधील फारसे कळत नाही. मग मेगापिक्सेल अधिक दाखवायचे आणि ग्राहक आपल्याकडे खेचायचे, असा फंडा वापरला जातो आहे. ग्राहकांना फक्त मेगापिक्सेलचे आकडे दाखवले जातात. म्हणजे २ पेक्षा ४ मेगापिक्सेल अधिक चांगले असेच ग्राहकाला वाटत असते. पण त्या ४ मेगापिक्सेलवर टिपलेला फोटो आकाराने मोठा करताना त्याचे पिक्सेल्स फाटतात त्या वेळेस अनेकांना लक्षात येते की, मेगापिक्सेल अधिक सांगितलेले असले तरी त्याचे रिझोल्युशन अतिशय वाईट आहे. मॅक्सने मात्र त्यांच्या या मॉडेलमध्ये मागच्या बाजूस तब्बल ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देताना ३२६४ गुणिले २४४८ पिक्सेल्सचे रिझोल्युशन दिले आहे. त्यामुळे फोटो आकाराने मोठे केल्यानंतरही फारसे फाटत नाहीत.
ऑटो फोकस व एलईडी फ्लॅश – या मॅक्स एएक्स९ झेड रेसचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या कॅमेऱ्यामध्ये अँटिफ्लिकर म्हणजेच तुमचा हात हलत असतानाही स्पष्ट चित्रण करणे, ऑटो फोकस आदी फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. शिवाय विविध प्रकारचे फिल्टर्स आणि इफेक्ट्सचाही समावेश आहेच. त्याशिवाय कमी प्रकाशात फोटो टिपत असाल तर त्यासाठी एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.
समोरच्या बाजूस २ मेगापिक्सेल – समोरच्या बाजूस असलेल्या कॅमेऱ्याचा वापर हा अनेकदा व्हिडीओ कॉलिंगसाठीच केला जातो. त्यामुळे अनेक चांगल्या स्मार्टफोन्समध्येदेखील या समोरच्या कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. हा कॅमेरा केवळ व्हीजीए देण्यात येतो. मात्र मॅक्सने या मॉडेलमध्ये असे केलेले नाही. त्यांनी समोरचा कॅमेराही दोन मेगापिक्सेल दिला आहे. मात्र प्रत्यक्ष रिव्ह्य़ूदरम्यान त्याचे रिझोल्युशन तेवढे चांगले वाटले नाही. पण या फीचरमध्ये काही उन्नीसबीस असेल तर त्याने वापरकर्त्यांला फारसा फरक पडत नाही.
म्युझिक व व्हिडीओ फॉरमॅट्स – एमपीथ्री, एएसी, डब्लूएव्ही, एएमआर, एमफोरए, ओजीजी या म्युझिक फॉरमॅट्सबरोबरच एमपीफोर, थ्रीजीपी, एव्हीआय, एमकेव्ही आणि एमओव्ही हे व्हिडीओ फॉरमॅट्सही यात देण्यात आले आहेत.
डय़ुएल कोअर – यासाठी १.२ गिगाहर्ट्झ वेग असलेला ए९एमटीके ६५७७ हा डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तो चांगला व वेगवान आहे.
रॅम – स्मार्टफोनच्याच बाबतीत असे नव्हे तर एकूणच सर्वच फोनच्या बाबतीत त्याचे रॅम किती एमबी किंवा जीबीचे आहे ते महत्त्वाचे ठरते. फोनवरची कामे वेगात व्हायची असतील तर हे रॅम अधिक असावे लागते. चांगला वेग मिळण्यासाठी रॅम कमीतकमी ५१२ एमबी असावे. या मॅक्स स्मार्टफोनने हा निकष पाळलेला आहे.
इंटर्नल मेमरी – या स्मार्टफोनला ४ जीबीची इंटर्नल मेमरी असून मायक्रो एसडी कार्डाच्या माध्यमातून ती तब्बल ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
कनेक्टिव्हिटी – कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये जवळपास सर्वच पर्याय तुम्हाला देण्यात आले आहेत. त्यात एज, जीपीआरएस, डब्लूलॅन (वाय-फाय ८०२.११ बी/ जी/ एन) आणि वाय-फाय हॉटस्पॉट यांचा समावेश आहे. शिवाय ब्लूटूथ व्ही २.१ अधिक ईडीआर आणि ब्लूटूथ टिथरिंग यांचाही समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फाइल्स वेगात शेअर करता येतील. अलीकडे अनेक स्मार्टफोन्सना एनएफसी नावाचे फीचर देण्यात येते. ते फीचर मात्र यात अंतर्भूत नाही. याशिवाय मायक्रो यूएसबी व्ही २.१ आणि यूएसबी टिथिरगचाही समावेश आहे.
प्री-लोडेड अ‍ॅप्स व एफएम – या मॅक्स स्मार्टफोनमध्ये अनेक चांगल्या प्री-लोडेड अ‍ॅप्सचा समावेश आहे. त्यात व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, चॅट, निम्बूझ, ट्विटर, गुगल प्ले स्टोअर आदींचा समावेश आहे. त्याशिवाय जीमेल आदी ई-मेल, एमएमएस, एसएमएस यांचाही समावेश आहेच.
बॅटरी क्षमता – एएक्स९ झेड रेसची बॅटरी क्षमताही चांगली आहे. टॉक टाइम क्षमता साडेचार ते पाच तासांची आहे, असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले. तर स्टँडबाय टाइम २०० ते ३०० तास असू शकतो. अर्थात अनेकदा बॅटरी क्षमता ही आपण मोबाइल कसा वापरतो यावरही अवलंबून असते. याची मूळ क्षमता चांगली आहे.
निष्कर्ष – डय़ुएल कोअर असल्यामुळे आणि यामधील रॅम ५१२ एमबी असल्याने अतिशय वेगात काम करणे किंवा वापर करणे सहज शक्य होते. आपण विनाअडथळा वापर करू शकतो. यासाठी जेली बीन ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आल्याने वापर करताना अधिक उपयुक्त सोयी मिळतात. याचा कॅमेरा चांगल्या क्षमतेचा आणि चांगल्या रिझोल्युशनचाआहे. त्यामुळे त्यावर टिपलेले फोटो आणि व्हिडीओ दोन्ही चांगल्या क्षमतेचे आहेत. वानगीदाखल सोबत दिलेले या कॅमेऱ्यावर टिपलेले फोटो पाहावेत. स्मार्टफोनच्या वापरामध्ये बॅटरी अधिक सक्षम असावी लागते. त्याकडेही कंपनीने लक्ष पुरविल्याने सलग वापरही चांगलाच अनुभव देणारा येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची किंमत ही इतर स्मार्टफोनच्या तुलनेत खूपच परवडणारी आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १६,६६६/-
(सोबत स्टायलिश लेदर कव्हर व स्क्रॅचगार्ड मोफत मिळते.)

मॅक्स एएक्स९झेडची वैशिष्टय़े
स्क्रीनचा आकार
डिस्प्ले रिझोल्युशन
फोनचा आकार
प्रोसेसर
ऑपरेटिंग सिस्टिम
मागचा कॅमेरा
समोरचा कॅमेरा
रॅम
इंटर्नल मेमरी
वाढविता येणारी मेमरी (मायक्रो एसडी कार्ड)
सेन्सर
कनेक्टिव्हिटी

बॅटरी क्षमता    
५.३ इंच
९६० ७ ५४० पिक्सेल्स
१४८.५ ७ ७८ ७ १०.५
१ गिगाहर्टझ् डय़ुएल कोअर ए९एमटीके ६५७७
जेली बीन ४.१.१
८ मेगापिक्सेल
२ मेगापिक्सेल
५१२ एमबी
४ जीबी
३२ जीबी
प्रॉक्झिमिटी, अ‍ॅक्सिलेरोमीटर, लाइट व जी सेन्सर
ब्लूटूथ, वाय- फाय, मायक्रो यूएसबी, थ्रीजी, एज, जीपीआरएस, जीपीएस
२३०० एमएएच बॅटरी

Story img Loader