नोकिया कंपनी आपल्या ताब्यात घेतल्यापासून भारतातील निम्नकिंमत श्रेणीतील ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने गेल्याच आठवडय़ात ‘नोकिया एक्स २’ बाजारात दाखल केला आहे. ‘नोकिया एक्स’ कुटुंबातील सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म २.०वर चालणारा हा स्मार्टफोन नोकिया, मायक्रोसॉफ्ट यांसोबतच अँड्रॉइडच्या अॅप्लिकेशन्सही चालवू शकतो. या फोनचा यूजर इंटरफेस अधिक सुलभ आणि आकर्षक असल्याचा कंपनीचा दावा आहे. ४.३ इंचाचा क्लीअर ब्लॅक डिस्प्ले, ऑटो फोकस आणि फ्लॅश असलेला पाच मेगापिक्सेल मागील कॅमेरा, व्हीजीए फ्रंट कॅमेरा, एक जीबी रॅम, १.२ गिगा हर्ट्झ डय़ुअल कोअर प्रोसेसर अशी या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. या फोनची बॅटरी १८०० एमएएच क्षमतेची असून त्यातून 2जीवर १०, तर 3जीवर १३ तासांचा टॉकटाइम असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. हा डय़ुअल सिम फोन आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात व्हिज्युअल मल्टिटास्किंगची सुविधा आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन अॅप्लिकेशन्सवर काम करणे वापरकर्त्यांना सहज शक्य होणार आहे. शिवाय मायक्रोसॉफ्टने एअरटेलशी करार केला असून या फोनसोबत वापरकर्त्यांना सहा महिन्यांसाठी अँड्रॉइड अॅप्स मोफत डाउनलोड करता येणार आहे. या प्लॅनअंतर्गत वापरकर्त्यांना ५०० एमबीचा मोफत डाटावापर मिळतो. याशिवाय क्लाउड स्टोअरेजची सुविधाही या फोनमध्ये उपलब्ध असून त्यासाठी या फोनमध्ये वनड्राइव्हमार्फत १५जीबीची स्टोअरेज स्पेस पुरवण्यात आली आहे. भारतात या फोनची किंमत ८६९९ रुपये इतकी आहे.
जिओनीचा जीपॅड जी५
आयबॉलचा 3जी बिझनेस टॅब्लेट