स्मार्टफोनच्या वापरामुळे इंटरनेटची गंगा मुठ्ठी में अवतरली. मेल चेक करणं, प्रेझेन्टेशन्स तयार करणे, रिझव्र्हेशन करणे, शेअर मार्केटच्या उलाढाली, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री अशी अनेक कामं डेस्कटॉप किंवा लॅपटॉपकडे न जाता प्रवासात, चालता-बोलता होऊ लागली. स्मार्टफोनमधल्या नेट चळवळीमुळे अगदी आतापर्यंत सकलजन आधारू नेटकॅफेची उपयुक्तताही ओसरली आहे. मात्र चांगल्या गोष्टी एकत्र आल्या, सुख नांदू लागलं की अपप्रवृत्तींचे फावते. स्मार्टफोनच्या माध्यमातून नेटिझन्सची संख्या झपाटय़ाने वाढतेय. नेटच्या वापराचा भाग म्हणून असंख्य अॅप्सचा आधार घ्यावा लागतो. आणि इथूनच मालवेअर/व्हायरस नामक टेक्नो-प्राण्याची चंगळ सुरू होते. हा धोका फक्त स्मार्टफोनला नसून विविध कामांसाठी इंटरनेटचा उपयोग करणाऱ्या सगळ्याच डिव्हाइसेसना आहे.
गिझ्मो क्षेत्रातल्या मातब्बर कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिवसेंदिवस या यांत्रिक दुश्मनाचा धोका वाढत चालल्याचे स्पष्ट झालं आहे. प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा निवांतपणे ऑनलाइन सर्फिग करून वस्तू निवडण्याचा कल प्रकर्षांने वाढतोय. यादरम्यान होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारात म्हणजेच आर्थिक देवघेव होताना गोलमाल होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे स्मार्टफोनमधलं नेट वापरताना या टेक्नो-दानव प्रणालीपासून सावधान राहण्याची आवश्यकता आहे. या सर्वेक्षणांमधल्या सावधान करणाऱ्या मुद्दय़ांचा घेतलेला आढावा. अँटि-व्हायरस क्षेत्रातलं ओळखीचं नाव असणाऱ्या क्विकहीलने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात आपल्याला सावधान करणाऱ्या गोष्टी उघड झाल्या आहेत.
० अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली असणाऱ्या फोनमध्ये ४७ नव्या मालवेअर कुटुंबीयांची आणि पर्यायाने २१८ सदस्यांची भर पडली आहे.
० १.२ दशलक्ष सर्वेक्षणापैकी ७०% अँड्रॉइड नमुने अॅडवेअरच्या अर्थात कुख्यात प्रणालींच्या गर्तेत सापडले आहेत.
० यंदाच्या वर्षांतल्या जानेवारी-एप्रिल या टप्प्यानंतर अँड्रॉइड मालवेअर धोक्यांमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
० सणासुदीच्या, सुट्टय़ांच्या कालावधीत ऑनलाइन खरेदी-विक्रीला उधाण येण्याची शक्यता आहे. उधाणपर्वातल्या आर्थिक व्यवहारात टेक्नोदुश्मन डल्ला मारण्याची शक्यता आहे.
० मनोवेधक ग्राफिक्सने भुरळ घालणारे फेक गेम्स आणि अॅप्स विकसित केले जात आहेत. हे गेम्स किंवा अॅप इन्स्टॉल केल्यावर स्मार्टफोन कुप्रवृत्तींची शिकार होण्याची शक्यता वाढली आहे.
० धोक्याचे वारे विंडोज प्रणाली असलेल्या डिव्हाइसेसमध्येही आढळून आले आहेत. विंडोज एक्सपी प्रणाली वापरणाऱ्या डिव्हाइसेसमध्ये किडो वॉर्म हा धोकादायक मालवेअर आढळला आहे.
० सामान्यत: अधिकृत व्हर्जन म्हणजे कोणत्याही व्हायरसची भीती नाही अशी आपली धारणा असते. मात्र थेट अशाच कायदेशीर व्हर्जन्स इन्स्टॉल असणाऱ्या मशिन्सवर आक्रमण करणारे मालवेअर विकसित झाले आहेत.
० क्रिप्टोवॉल नावाचा बग सध्या विंडोज प्रणालीत धुमाकूळ घालताना दिसतोय. त्याला रोखण्यासाठी अँटि-व्हायरस सक्षम आहे; मात्र त्याचा पायरव वाढणे डिव्हाइसची हानी करू शकते.
० अॅडव्र्हटायझिंग हा कोणत्याही खरेदी-विक्रीचा बेसिक फंडा. नेटिझन्सचा हा कच्चा दुवा हेरत मालव्र्हटायझिंग नावाचा धोकादायक प्रकार सुरू झाला आहे. उत्पादनांच्या, सेवेच्या अधिक माहितीसाठी डबल क्लिक करा- अशा छुप्या मार्गाने चालणारी नकारात्मक जाहिरातबाजी आपल्या फोन किंवा पीसी-डेस्कटॉपला धोक्यात आणू शकते.
० पिक्चर-गाणी-व्हिडीओ, कामाच्या फाइल्स शेअर करण्यासाठी कामी येणारी गोष्ट म्हणजे यूएसबी. यूएसबीच्या माध्यमातूनच टेक्नो-दुश्मनांचे स्थलांतर घाऊक प्रमाणावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंटेल सिक्युरिटीचा भाग असणाऱ्या आणि टेक्नो-दानवांचे निर्मूलन करणाऱ्या मॅकअॅफीने व्हेन मिनिट्स काऊंट या आपल्या अहवालात दैनंदिन वापरातल्या मशिन्सवर छोटय़ा प्रमाणावर होणाऱ्या सायबरहल्ल्यांची वाढती तीव्रता मांडली आहे.
० सर्वेक्षणापैकी ७४ टक्के नेटिझन्सनी अशा स्वरूपाचा छोटय़ा स्वरूपातला टेक्नोहल्ला हा आमच्यासाठी काळजीचा विषय झाल्याचे म्हटले आहे.
० ५८% संस्थांनी असे ऑपरेटिंग प्रणाली आणि कामकाजाला भेदणारे दहापेक्षा जास्त टेक्नोहल्ले झाल्याचं सांगितलं आहे.
० मात्र केवळ २४% कंपन्यांना असे हल्ले परतावून लावण्यासाठी सक्षम टेक्नो तटबंदी असल्याचं वाटतंय आणि ही चिंतेची बाब आहे. संशयास्पद गोष्टी टिपण्यासाठी लागणारा वेळच या हल्ल्यांना कारणीभूत असल्याचेही स्पष्ट झालंय.
० असे हल्ले होऊ नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेतली असल्याचे बहुतांश संस्थांचं म्हणणं आहे; मात्र जटिल गुंते निर्माण करणारे आक्रमण रोखण्यासाठी सावधान करणारे अलर्ट करणारी व्यवस्था दमदार हवी असं अनेकांचं म्हणणं आहे.
विदेशातल्या अज्ञात ठिकाणांहून होणारे व्यवहार टाळणे हा मुख्य उपाय आहे. सर्वसाधारण पोर्ट्सव्यतिरिक्त गोष्टींचा वापर हल्ल्याचे कारण ठरू शकते. एकाच वेळी बहुविध होस्टशी संपर्क सायबर हल्ल्याची शिकार होऊ शकते. डिव्हाइस क्लिनर वापरल्यानंतरही पुन्हा पाच मिनिटांत टेक्नोधाड होते.
या सगळ्यापासून आपल्या डिव्हाइसला वाचवण्यासाठी अधिकृत अॅप्स, गेम्स इन्स्टॉल करणं अनिवार्य आहे. छुप्या जाहिराती, डबल क्लिकसारखी प्रलोभनं टाळून सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे झाले आहे. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक नुकसान होण्याचे प्रकार उघडकीस येत आहेतच; मात्र त्याच वेळी गोपनीय माहिती धोकादायक व्यक्तींच्या हाती जाण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्रात, माहिती भरून देण्यासाठीचे मेल, रिमाइंडर त्या संस्थेच्या अधिकृत साइटकडूनच येत असल्याची खातरजमा करावी. तंत्रज्ञान दुधारी शस्त्र आहे. शरीराचा अवयव झाल्याप्रमाणे स्मार्टफोन्स, टॅब आपल्या आयुष्याचा भाग झाले आहेत. शरीरावर होणारे आक्रमण थोपवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हाच सर्वोत्तम उपाय असतो. त्याचप्रमाणे टेक्नो-दानवांपासून डिव्हाइसला बाधा पोहोचू नये यासाठी अँटिव्हायरस इन्स्टॉल करणे, ते वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक झाले आहे. तसं झालं नाही तर टेक्नोआरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा