सध्याची दुनिया ही स्मार्टफोनची आणि त्याचीच चलती असलेली असली तरीही आजही अनेकजण असे आहेत की, ज्यांना स्मार्टफोन परवडत नाही. मात्र असे असले तरी त्यांना दिसायला स्मार्टफोन आणि त्यातही खिशाला परवडणारा बजेटफोन असा योग जुळलेला हवा असतो. अशांसाठी आता नोकियाने एक नवीन बजेटफोन बाजारात आणला आहे, तो आहे नोकिया आशा ५०१.
गेल्या काही महिन्यांत सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत एक जोरदार आघाडी उघडली आहे. शिवाय त्यांनी बजेटफोन असतील अशा किमतीतही अनेक फोन बाजारपेठेत आणले आहेत. मात्र असे असले तरी मोबाइल बाजारपेठ भारतात सुरू झाली त्या वेळेस इथे सर्वात आधी प्रवेश करणाऱ्या नोकियाने अद्यापही अनेकांच्या मनात घर केले आहे. खास करून मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणून करणाऱ्या अनेकांना आजही नोकियाचा यूजर इंटरफेसच जवळचा वाटतो. त्यांना वाटते की, नोकियाचा फोन आपल्याला वापरता येऊ शकतो आणि इतर फोन मात्र आपल्याला जमणार नाहीत. अशांसाठी नोकियाचे बजेटफोन हा चांगला पर्याय आहे. आशा मालिका ही अशांसाठीच आहे.
याच आशा मालिकेमध्ये नोकियाने आणलेला ५०१ आशा हा मोबाइल मात्र बजेटफोनबरोबरच तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यातही यशस्वी ठरला आहे. खास करून शाळेतून महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना तो अधिक जवळचा वाटेल. आई- वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीमध्ये हा परवडणारा असू शकतो. शिवाय त्याची किंमत ही स्मार्टफोनच्या तुलनेत कमी असली तरी तो दिसायला मात्र स्मार्टफोनसारखा राखण्यात नोकियाला यश आले आहे.
रंगीबेरंगी आणि टिकाऊ असे कव्हर व समोरच्या बाजूस असलेली चरे न पडू देणारी स्क्रीनची काच ही या फोनची दोन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. स्मार्टफोन हा नेहमीच वजनाला हलका असतो, त्याचप्रमाणे हा नोकिया आशा ५०१ देखील वजनाला हलका म्हणजेच अवघा ९८ ग्रॅम्स एवढय़ाच वजनाचा आहे.
तरुणाई आणि सामान्यजन अशा दोन्हींच्या असलेल्या गरजा लक्षात घेऊन या फोनमध्ये दोन प्रकारचे स्क्रीन्स देण्यात आले आहेत होम आणि फास्टलेन. होम स्क्रीन या मोडमध्ये तीन इंचाच्या कपॅसिटिव्ह स्क्रीनचा पूर्ण वापर करता येतो. त्यात नेहमीप्रमाणेच स्क्रीन दिसतो. तर फास्टलेनचा स्क्रीन हा स्मार्टफोनप्रमाणे दिसणारा आहे. त्यावर तुम्हाला स्मार्टफोनच्याच स्क्रीनप्रमाणे सातत्याने अपडेटस् दिसत राहतात. तरुणाईला हा स्क्रीन अधिक आवडणारा असाच आहे.
हे मॉडेल लाल, पिवळा, काळा व पांढरा अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – ५,१९९/-
नोकिया आशा ५०१ ची वैशिष्टय़े
आकार उंची ९९.२ मिमी
रुंदी ५८ मिमी
जाडी १२.१ मिमी
वजन केवळ ९८ ग्रॅम्स
स्क्रीनचा आकार ३ इंच
स्क्रीनचे वैशिष्टय़ ब्राइटनेस कंट्रोल, आरजीबी स्ट्रीप,
नोकिया ग्लान्स स्क्रीन, स्क्रीन डबल टॅप
मुख्य कॅमेरा ३.२ मेगापिक्सेल
कॅमेरा रिझोल्युशन २०४८ ७ १५३६ पिक्सेल्स
बॅटरी क्षमता टूजी स्टॅण्डबाय टाइम- ११५२ तास
टूजी टॉकटाइम १७ तास
फक्त संगीत ५६ तास
ऐकण्यासाठीची क्षमता
– विनायक परब