एके काळी साध्या मोबाइलच्या मार्केटमध्ये आधिराज्य गाजविलेल्या नोकिया या कंपनीला स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये मात्र खूपच खस्त्या खाव्या लागल्या. या सर्वावर मात करीत नोकियाने मायक्रोसॉफ्टशी सहकार्य करीत िवडोज फोन बाजारात आणले. याआधी आशा सीरिजही बाजारात आणली. या फोन्सनी नोकियाला स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये जागा निर्माण करून दिली. पण ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोन जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत कंपनीला मार्केटचा संपूर्ण ताबा मिळवणे कठीण जाईल. हे लक्षात येऊन त्यांनी नोकिया एक्स हा आपला पहिला अँड्रॉइड फोन बाजारात आणला आहे. जाणून घेऊ या कसा आहे हा नवा फोन.
हार्डवेअर
हा फोन नोकियाचा नवीन आशा फोन आशा ५ एक्सएक्ससारखाच दिसतो. याचबरोबर त्याचा बाहेरचा लूक आपल्याला आयफोन ४ सारखा भासतो. हा फोन आपल्याला लाल, पांढरा, काळा, निळा, हिरवा आणि पिवळा या रंगांत उपलब्ध आहे. याच्या चार इंच स्क्रीनच्या पुढच्या भागावर केवळ एक कॅपेसिटिव्ह बटण आहे. याचा वापर आपण बॅक आणि होम या दोन कृती करण्यासाठी करू शकतो. या फोनच्या डाव्या बाजूस तुम्हाला एकही बटण नाहीए. आवाज कमी करणे किंवा वाढविणे तसेच स्टँडबाय ही सर्व बटणे तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या भागात दिसतात. हॅडसेटसाठी वरच्या बाजूस जॅक देण्यात आला आहे. तर याच्या तळाच्या बाजूस मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये १५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून आतमध्ये दोन सिमकार्डसाठी जागा देण्यात आली आहे. या दोन कार्डाच्या मध्येच मेमरी कार्डसाठीही जागा देण्यात आली आहे. या फोनची किंमत ज्या पटीत आहे, त्या पटीत मिळणाऱ्या इतर फोनच्या तुलनेत फोनचा दर्जा खूप चांगला आहे. या फोनच्या चारही बाजूंना कट कॉर्नर्स देण्यात आलेले नाहीत. यामुळे कमी पशाचा असला तरी हा फोन महागडय़ा फोनसारखा भासतो.
स्पेसिफिकेशन
नोकिया एक्समध्ये त्याच्या किमतीचा विचार करता आपल्याला खूप चांगल्या दर्जाचे स्पेसिफिकेशन मिळेल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. या फोनमध्ये १ गीगाहार्टझचा क्वालकॉम स्नॅपडेगन एस४ प्रोसेसर देण्यात आला आहे. यातील जीपीयू हा थोडा निराशाजनक वाटतो. कारण यामये एडीनो २०३ जीपीयू देण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेली रॅम ही केवळ ५१२ एमबीची आहे. हा फोन गेिमग किंवा मल्टिमीडियासाठी उपयुक्त नसल्यामुळे देण्यात आलेले हार्डवेअर तसे पुरेसे आहे. यामध्ये ४ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. याची विभागणी अॅप आणि फाइल स्टोअरेजमध्ये करण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला मेमरी कार्डचा वापर अनिवार्य आहे. यामध्ये तुम्ही ३२ जीबीपर्यंतचे मेमरी कार्ड वापरू शकता. याची स्क्रीन ८०० गुणिले ४८० रिझोल्युशन असलेली आहे. यामध्ये थ्रीजी डेटा सपोर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर वाय-फाय, ब्ल्यू टय़ूथही देण्यात आले आहे. यामध्ये आपल्याला एफएम रेडिओचीही सुविधा देण्यात आली आहे. कॅमेरामध्ये मात्र हा फोन सध्याच्या फोनच्या तुलनेत मागे पडताना दिसतो. याला फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. याचबरोबर जो मुख्य कॅमेरा देण्यात आलेला आहे तो केवळ तीन मेगापिक्सेलचा आहे. यामुळे या फोनमधून तुम्हाला व्हिडीओ चॅट करता येणार नाही. हा फोन अँडॉइड अॅप्स सपोर्ट करीत असला तरी यामध्ये नोकिया एक्स ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे.
इतर फायदे
या फोनमध्ये आपल्याला सामान्यत: देण्यात येणारे घडय़ाळ, कॅल्क्युलेटर, म्युझिक प्लेअर असे प्राथमिक अॅप्स यामध्ये इनबिल्ट देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये आपल्याला नोकिया अॅप स्टोअरचा तसेच अँड्रॉइड अॅप स्टोअरचा फायदा घेता येऊ शकतो. म्हणजे एकाच फोनवर आपण दोन्हींवर चालणारी विविध अॅप्स वापरू शकतो.
काही त्रुटी
या फोनमध्ये अॅनिमेशन, स्टुट्टर यांसारख्या गोष्टी एकदम सहजतेने वापरता येऊ शकत नाहीत. यासाठी आपल्याला काही वेळ वाट पाहावी लागते. याचबरोबर आपण जेव्हा जास्त अॅप्स वापरतो तेव्हा अनेकदा ‘प्लीज वेट’ असे सांगितले जाते. यामध्ये देण्यात आलेली रॅम थोडी जास्त असती तर अशा अडचणी आल्या नसत्या. पण किंमत आणि त्यामध्ये देण्यात आलेल्या सुविधांचा विचार करता त्या पुरेशा आहेत, असे म्हणावयास हरकत नाही.
थोडक्यात
नोकियाने या फोनच्या माध्यमातून अँड्रॉइड फोनभोवतालचे योग्य ते वातावरण तयार करण्यास मदत केली आहे. पण यामध्ये वापरकर्त्यांला अनेक मर्यादा येतात. यामुळे हा फोन अँड्रॉइड फोनला पर्याय ठरू शकेल असे आपण स्पष्ट नाही म्हणू शकत.
Tech – नॉलेज : बॅटरी क्षमता वाढविण्यासाठी उपाय सूचवा
माझ्याकडे सॅमसंगचा फोन आहे. त्याची बॅटरी खूप लवकर लो होते. बॅटरीची क्षमता कशी वाढवता येईल किंवा दुसरी जास्त क्षमतेची बॅटरी आपण यामध्ये वापरू शकतो का?
– दिनेश संपत
उत्तर- बॅटरी लो होणे हा सर्व अॅन्ड्रॉइड फोनचा प्रॉब्लेम आहेच. यामुळे कंपन्यांनी किमान १५०० एमएएचची बॅटरी देणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या फोन्समध्ये ही क्षमता खूप कमी देण्यात आली आहे. यामुळे ही अडचण अनेकांना जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो. ती म्हणजे प्रवासात आपण आपले इंटरनेट बंद ठेवले तर बॅटरीची क्षमता वाढू शकते. जर आपण इंटरनेट सुरू ठेवले तरी सिंक ऑफ करून ठेवा. ज्या वेळेस आपल्याला गरज असेल तेव्हा आपण सिंक ऑन करून आपले आलेले सर्व ई-मेल पाहू शकतो. यामुळे आपली बॅटरी कमी खर्च होऊ शकते. याशिवाय आपण अॅप्स बंद करताना बहुतांश वेळा होमस्क्रीनचे बटण वापरतो. त्यामुळे आपले अॅप्स पूर्ण बंद न होता ते सुरूच राहतात. यामुळे अॅप्स वापरून झाले की आपण कधीही बॅकचे बटण दाबावे, जेणेकरून ते अॅप्स पूर्ण बंद होतील. तसेच बॅटरी जेव्हा लो अगदी २० टक्के वगैरे असते आणि लवकर चाìजग उपलब्ध होणार नसेल तेव्हा ब्राइटनेस थोडा कमी करून ठेवावा. जेणेकरून बॅटरी कमी खर्च होत राहील. तुम्ही विचारले की, जास्त क्षमतेची दुसरी बॅटरी वापरता येईल का, तर तसे करणे आपल्याला शक्य नाही. कारण फोनमधील हार्डवेअर हेही बॅटरीची क्षमता लक्षात घेऊन काम करत असते. यामुळे आपल्याला दुसरी बॅटरी वापरणे तसे शक्य होणार नाही. याचबरोबर आपण बॅटरीची क्षमता वाढवूही शकत नाही.
– तंत्रस्वामी
या सदरात प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला lstechit@gmail.com या मेल आयडीवर ई-मेल पाठवा.