सध्याच्या ‘ऑनलाइन’ जमान्यात तरुणाई २४ तास ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर व्यस्त असते. सतत मोबाइलवर त्यांचे या साइटद्वारे चॅटिंग वा अन्य काम सुरू असते. मात्र एखाद्या सोशल नेटवर्किंग साइटवर काम करायचे असल्यास आपल्याला इतर साइट पाहता येत नाहीत. एका वेळी दोन, तीन किंवा अधिक सोशल नेटवर्किंग साइट पाहायची असल्यास ते शक्यच नाही. पहिली सोशल नेटवर्किंग साइट बंद केल्याशिवाय दुसरी वापरता येणे अशक्यच. मात्र ‘निफ्टी युनिक अॅप्लिकेशन’ (सो हो) या अॅपमुळे ही अशक्य गोष्टही शक्य झाली आहे. सो हो अॅपमुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या साइटवर काय चालले आहे, याची माहिती एकाच वेळी तुमच्या होमस्क्रीनवर मिळते.
वेगवान आणि वेळ वाचवणारे
अनेकदा आपण ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसह विविध अॅप्स ओपन करून बसतो. फेसबुकवरील आपल्या एखाद्या माहितीला, छायाचित्राला वा व्हिडीओला कोणी ‘लाइक’ वा ‘शेअर’ केले आहे किंवा ‘कमेंट’ दिली आहे, हे पाहण्यासाठी आपण फेसबुकमध्ये डोके खुपसून बसतो. मात्र त्याच वेळी ट्विटरवर काय चालले आहे, हे समजत नाही. त्यासाठी ट्विटर ओपन करून पाहावे लागते. या सर्व प्रक्रियांमध्ये वेळही खूप जातो. मात्र सो हो अॅप्समुळे या सर्व प्रक्रिया वेगवान होऊन तुमचा वेळ वाचणार आहे.
सो हो अॅप्सचा वापर कसा कराल?
सुरेख रचना असलेले सो हो अॅप्स अँड्रॉइड मोबाइल वापरकर्त्यांना डाउनलोड करता येईल. थोडय़ाच अवधीत जगभरात प्रसिद्ध झालेल्या या अॅप्सबद्दल मोबाइल वापरकर्ते समाधानी आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर काय चालले आहे, हे होमस्क्रीनवरच तुम्हाला पाहायला मिळणार. या साइटवर येणारे व्हिडीओ, छायाचित्रे किंवा वेबसाइट लिंक जी तुमच्या मित्रांनी शेअर केली असेल, ती तात्काळ तुम्हाला होमस्क्रीनवर पाहता येणार आहे. मोबाइलच्या स्क्रीनवर ‘स्विच नेटवर्क बार’ असेल, त्याद्वारे आपल्याला हवी ती सोशल नेटवर्किंग साइट सुरू करता येते. तुम्हाला ट्विट करायचे असल्यास, तुमचे स्टेटस अपडेट करायचे असल्यास फेसबुकवर ‘लाइक’ वा ‘कमेंट’ करायची असल्यास ती थेट होमस्क्रीनवर करता येते.
अॅप्स कुठून मिळवाल?
इंग्लंडमधील इन्क मोबाइल या कंपनीने सो हो अॅप्सची निर्मिती केली. गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप्स मोफत डाउनलोड करता येते. अँड्रॉइड आयसीएस ४.० किंवा त्यापुढील अँड्रॉइड व्हर्जन असेल, तर या अॅप्सचा वापर करता येतो.
आणखी ‘समगुणी’ अॅप्स
केवळ सो हो अॅप्सच नव्हे, तर आणखी काही अॅप्सद्वारे आपण सोशल नेटवर्किंग साइटचे ‘ऐक्य’ करून ते मोबाइलच्या होमस्क्रीनवर पाहू शकता. सोशल हब, आयगो बबल या अॅप्सचा वापरही सो हो अॅप्ससारखा करता येतो. सोशल हबद्वारे तुम्ही प्रत्येक प्रकारचा संदेश (ई-मेल, एसएमएस, आयएम आदी), ताज्या घडामोडी, बातम्या किंवा फेसबुक, ट्विटर, लिंकडिन यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट मोबाइलच्या होमस्क्रीनवर पाहू शकता. त्यासाठी दरवेळी त्या त्या साइटला भेट देण्याची गरजही नाही. आयगो बबल या अॅप्सचा वापरही अशा प्रकारे करता येतो.
सो हो अॅप्स
सध्याच्या ‘ऑनलाइन’ जमान्यात तरुणाई २४ तास ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर व्यस्त असते.

First published on: 13-12-2013 at 06:34 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now facebook twitter instagram can see jointly by soho apps