येणारा जमाना हा मिररलेस कॅमेऱ्यांचाच असणार हे पुरते स्पष्ट झाल्यानंतर ऑलिम्पस या प्रसिद्ध कंपनीने या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या वर्षभरातच त्यांनी मिररलेस कॅमेऱ्याच्या क्षेत्रात अनेक मॉडेल्स बाजारात आणली आहेत. आणि गेल्या महिन्यात तर त्यांनी त्यांच्या या मालिकेतील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी असे ऑलिम्पस ओएम- डी ई- एम ५ हे मॉडेल बाजारात आणले आहे. त्याच्या १२ – ५० मीमी लेन्ससह ते ‘लोकसत्ता’कडे रिव्ह्य़ूसाठी आले होते. मिररलेस मालिकेतील हे सर्व कॅमेरे मायक्रो फोर- थर्ड कॅमेरा म्हणून ओळखले जातात.
डिझाईन
कोणत्याही कॅमेऱ्याची सुरुवात त्यांच्या बाह्य़ांगापासून म्हणजेच त्याच्या डिझाईनपासून होते. फार कमी वेळा असे होते की, ग्राहक बाह्य़ांगावर न जाता त्याचे अंतरंग पाहून एखादे उत्पादन विकत घेतो. ओएमडीच्या बाबत विचार करताना आपल्याला लक्षात येते की, या कॅमेऱ्याला काहीसा जुना असा रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न ऑलिम्पसने केला आहे. ७०-८०च्या दशकात ऑलिम्पसने बाजारात आणलेले ओएम कॅमेरे त्यावेळेस खूपच गाजले होते. कदाचित त्याची आठवण आणि पुन्हा एकदा त्या सोनेरी दिवसांना उजाळा देण्यासाठी ऑलिम्पसने हा कॅमेरा मालिकेलाही तेच प्राथमिक नाव दिले आहे. शिवाय त्याच ओएम मालिकेसारखी तडाखेबंद विक्री या मॉडलनेही करावी, अशी ऑलिम्पसची अपेक्षा असावी. कॅमेऱ्याच्या बाह्य़ांगामध्ये ग्रीप फोटोग्राफरसाठी सर्वाधिक महत्त्वाची असते. या कॅमेऱ्याला उभी व आडवी अशा दोन्ही प्रकारच्या ग्रिप्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कॅमेरा हातातून खाली सटकण्याची शक्यता कमी असते.
१६ मेगापिक्सेल
या कॅमेऱ्याचा महत्त्वाचा विशेष म्हणजे त्याची क्षमता १६ मेगापिक्सेलची आहे. त्यासाठी ट्रूपिक सिक्स इमेज सेन्सर वापरण्यात आला आहे. त्याला वेगवान अशा प्रोसेसरची जोड मिळाली आहे. त्यामुळे ९ फ्रेम्स प्रतिसेकंद या वेगात छायाचित्रे टिपली जातात.
ओएलइडी व रॉ पिक्चर्स
हा कॅमेरा बाजारपेठेत आणताना ऑलिम्पसने त्यांचे उद्दिष्ट पक्के केलेले होते ते म्हणजे याचा वापर हा व्यावसायिकांसाठीही असेल. व्यावसायिक मंडळी आजही डिजिटल एसएलआरलाच अधिक पसंती देतात. कारण मिररलेस तंत्रामुळे यांचा आकार तर लहान असतोच आणि सेन्सरही लहान वापरला जातो. त्याचा परिणाम अनेकदा चित्रणावर होतो. म्हणूनच हा कॅमेरा बाजारात आणताना चित्रणावर झालाच तर चांगला परिणाम होईल, अशा यंत्रणेची जोड कंपनीने त्याला दिली आहे. याचा दुसरा एक विशेष म्हणजे व्यावसायिक मंडळी रॉ फॉर्मॅटचा अधिक पसंती देतात. त्यामुळे या कॅमेऱ्यामध्ये एकाच वेळेस रॉ व जेपेग अशा दोन्ही फॉर्मॅटस्मध्ये चित्रण केले जाईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
५० सेटिंग्ज
कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूस दोन चकत्या असून या चकत्यांच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या विविध सेटिंग्जचे नियंत्रण करता येते. मूव्ही रेकॉर्डसाठीचे एक लाल रंगाचे बटण असून एफ१ आणि एफ२ या दोन बटणांच्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० प्रकारची सेटिंग्ज बदलता किंवा निश्चित करता येतात. अनेकदा व्यावसायिक कॅमेऱ्यांना भरपूर सेटिंग्ज देण्यात येतात, त्यामुळे विविध प्रकारच्या शक्यतांमध्ये शूट करणे छायाचित्रकाराला शक्य होते. ते गृहीत धरूनच या कॅमेऱ्याकडे व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी हा फंडा वापरण्यात आला असावा.
आर्ट फिल्टर्स
हल्ली जवळपास सर्वच कॅमेरे विविध प्रकारच्या सेटिंग्ज सोबत आर्ट फिल्टर्सही देतात. ऑलिम्पसच्या या मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या आर्ट फिल्टर्सची संख्या ही तब्बल १० आहे. आणि हे सर्वच्या सर्व फिल्टर्स उत्तम काम करतात, असे लक्षात आले. त्यातही ड्रामॅटिक, ग्रेनी हे पर्याय चांगले आहेत. छांदिष्टांसाठी ही चांगली सोय आहे. शिवाय एक क्लिक केल्यानंतर समोरचे चित्रण दहा वेगवेगळ्या फिल्टर्सच्या माध्यमातून समोर पेश करण्याची सोयही यात आहे. म्हणजे तुम्ही फोटो एकच क्लिक करता पण प्रतिमा दहा टिपल्या जातात, प्रत्येक फिल्टरनुसार. छांदिष्टांना खूप आवडेल अशी ही सोय आहे.
फाइव्ह अ‍ॅक्सिस स्टॅबिलायझेशन
या कॅमेऱ्याच्या महत्त्वाच्या विशेषांपैकी एक म्हणजे फाइव्ह अ‍ॅक्सिस मेकॅनिकल स्टॅबिलायझेशन हे तंत्र. हल्ली जवळपास सर्वच कॅमेऱ्यांमध्ये इमेज स्टॅबिलायझेशनचे तंत्र वापरले जाते. मात्र ऑलिम्पसने त्यात भर घालून त्याचे अ‍ॅडव्हान्स व्हर्जन वापरले आहे. यात पाचवा अ‍ॅक्सिस अर्थात अक्ष खूप महत्त्वाचा आहे, तो रोलिंगचा आहे. त्यामुळे हात हलत असतानाही या कॅमेऱ्यातून कोणत्याही प्रकारे टिपलेले चित्र हे उत्तमच येते. या कॅमेऱ्यामध्ये वापरण्यात आलेले ऑटो फोकस तंत्रही वेगवान असल्याचे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले.
ओएलइडी टचस्क्रीन  
अलीकडच्या कॅमेऱ्यांना व्ह्य़ू फाईंडर नसतो व सारे काही मागच्या बाजूस असलेल्या स्क्रीनवरच पाहिले जाते. या कॅमेऱ्यामध्येही ओएलइडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून टचस्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही शूट करू शकता किंवा मग तुम्ही जुनेजाणते व्यावसायिक असाल आणि तुम्हाला व्ह्य़ू फाईंडरशिवाय तुमचे पानही हलणार नसेल तर आता ऑलिम्पसने आय सेन्सेटिव्ह इलेक्ट्रॉनिक व्ह्य़ूफाईंडरची सोय दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा ओएलइडी स्क्रीन हा ८० व ५० अंशामध्ये वळू शकतो. त्यानुसार तुम्हाला फोटोचा अँगल निश्चित करता येतो. अगदी टचस्क्रीनवरून शूट करणेही तुम्हाला सहज शक्य आहे. एरवी एसएलआर कॅमेऱ्याला असते त्याप्रमाणे एक सेटिंग व्ह्य़ूफाईंडरच्या वरच्या बाजूस देण्यात आले असून तिथे फ्लॅशही लावता येतो आणि ब्लूटुथचा ट्रान्समीटर किंवा मग ऑलिम्पसने या मिररलेस कॅमेऱ्यांसाठी क्लोजअप शूट करण्यासाठी आणलेले खास एलइडी लाइटस्
व्हिडिओ
ऑलिम्पसने या मॉडेलमध्ये एचडी मूव्ही शूट करण्याची महत्त्वाची सोय करून दिली आहे. शिवाय तुम्हाला एकाच वेळेस मूव्ही शूट करताना असे वाटले की, फोटो टिपावा, तर तेही सहज शक्य आहे. एकाच वेळेस दोन्ही कामे. फक्त मूव्ही शूट करतानाच जेव्हा आपण फोटो टिपण्यास जातो तेव्हा समोरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या फ्रेमच्या आकारात फरक पडतो आणि शूट करणारा काहीसा गोंधळून जातो. मात्र सवयीने यात अंदाज येऊ शकतो.
वैगुण्ये
दोन महत्त्वाची वैगुण्ये या रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आली ती म्हणजे अतिशय कमी प्रकाशात फोकसिंग करताना काहीसा त्रास जाणवतो. त्याचप्रमाणे कमी प्रकाशातील चित्रणही तेवढे चांगले येत नाही. यात नॉइज पातळी अधिक असते. शिवाय सातत्यपूर्ण फोकसिंग परफॉर्मन्समध्ये या कॅमेऱ्याची यंत्रणा काहीशी कमी पडते. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे इतर मिररलेस कॅमेऱ्यांपेक्षा इ- एम ५ बराच चांगला आहे.
निष्कर्ष
छांदिष्टांसाठी हा कॅमेरा खूप चांगला किंबहुना त्यातील सेटिंग्जच्या भरपूर पर्यायांमुळे त्यांना व्यावसायिक छायाचित्रकार झाल्याचा फील देणारा आहे. मात्र त्यासाठी त्यांना मोजावे लागणारे पैसे हे मात्र खचितच अधिक आहेत. आजवर बाजारात आलेल्या मिररलेस कॅमेऱ्यांना व्यावसायिकांनी नाके मुरडली होती आणि आपण यापुढेही डीएसएलआर कॅमेराच वापरू असे सांगितले होते. मात्र हा असा पहिला मिररलेस कॅमेरा आहे की, जो हाताळावा, असे त्यांना नक्कीच वाटेल.. मात्र पुन्हा एकदा प्रश्न येतो तो पैशांचा. त्यासाठी त्यांना मोजावे लागणारे पैसे हे मात्र नक्कीच अधिक आहेत. त्या पैशांत बाजारात इतर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

Story img Loader