अन्न ही माणसाची मूलभूत गरज असली तरी रुचकर, सुग्रास, आणि आरोग्यपूर्ण पदार्थ करून आपल्या माणसांना वाढणे ही एक कला आहे, एवढेच नव्हे तर त्याला ‘पूर्णब्रह्म’ असे नाव आहे.  असे चवदार, दिसायला सुंदर खाद्यपदार्थ कसे बनवायचे हे सांगणारे अनेक कार्यक्रम दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर चालू असतातच. काही वाहिन्या तर याच विषयाला वाहिलेल्या आहेत. पण आपल्याला ज्या वेळेला एखादा विशेष पदार्थ बनवण्याची हुक्की येते, विशेषत: तो पहिल्यांदाच बनवायचा असतो तेव्हा मार्गदर्शनाची गरज असते. त्या वेळेला तोच पदार्थ दूरदर्शनवर कोणी शिकवत असेल ही शक्यता विरळा. अशा वेळी पाककलेवरील पुस्तकांचा आसरा घ्यावा लागतो. परंतु एखादा पदार्थ बनवताना डोळ्यांनी बघणं वेगळं आणि पुस्तकात वाचणं वेगळं. याबाबतीत इंटरनेटवरील या विषयावरील साइट्स तुमचा आदर्श गुरू ठरू शकतात. तुमच्या मनातला पदार्थ बनवायला शिकवणारे व्हिडीओ येथे उपलब्ध असू शकतात.
पदार्थ शिकवणाऱ्या या साइट्सवर पूर्वतयारीपासून ते पूर्ण तयार झालेला पदार्थ व्हिडीओच्या माध्यमातून बघायला मिळतो. या साइट्सवर महाराष्ट्रीय, पंजाबी, राजस्थानी इत्यादी भारतीय तसेच इटालियन, चायनीज आणि मेक्सिकन असे इतर देशांतील लोकप्रिय पदार्थ उपलब्ध आहेत. व्हिडीओ बघता बघता तुम्ही पदार्थ करायला घेऊ शकता. गरजेनुसार पॉझ, आणि प्ले करू शकता.  पुन्हा मागे जाऊन बघू शकता. तुम्ही कोणता ही पदार्थ बनताना टप्प्याटप्प्याने बघू शकत असल्याने आणि त्यानुसार कृती केल्यामुळे तुमचा पदार्थ स्वादिष्ट बनण्यास मदत होऊ शकते. तो पदार्थ पुन्हा बनवण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच पदार्थ बनवताना कोणती काळजी घ्यायची याबद्दलच्या उपयुक्त टीप्सदेखील येथे मिळतात. आज आपण अशाच काही साइट्सबद्दल जाणून घेणार आहोत.
http://www.madhurasrecipe.com/
या साइटवरील पाककृतींचे सर्व व्हिडीओ इंग्रजी भाषेत आहेत. तुम्ही घरी करून पाहिलेला एखादा चवदार, नावीन्यपूर्ण पदार्थ या साइटवर शेअरदेखील करू शकता. या साइटवर सबस्क्राइब केल्यास साइटवर अपलोड झालेली नव्या पाककृतींबद्दलची माहिती तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येते. आवडलेली पाककृती तुम्ही pdf  रूपात डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा िपट्र करून घेऊ शकता. तसेच ती इतरांना शेअर करू शकता. एखाद्या पाककृतीबद्दल सूचना, अभिप्राय देऊ शकता आणि शंकाही विचारू शकता.
http://nishamadhulika.com/
http://www.tarladalal.com/
या साइट्सवरील पाककृतींचे व्हिडीओ िहदी भाषेत उपलब्ध आहते. येथेदेखील पाककृतीबद्दल सूचना, अभिप्राय देऊ शकता आणि शंका विचारू शकता.
या साइट्सवरील सर्व व्हिडीओ https://www.youtube.com  वर उपलब्ध आहेत. याशिवाय यूटय़ूबवरच Being Marathi आणि RuchkarMejwani  असे सर्च केल्यास येथे तुम्हाला मराठी भाषेतून खास पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थाच्या कृती  बघायला मिळू शकतात.
नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांपासून ते पाककृतींमध्ये नवनवे प्रयोग करू इच्छिणाऱ्या अशा सर्वाना या साइट्स नक्की उपयुक्त ठरतील.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा