भारतात सध्या सर्वाधिक विक्री होणारी वस्तू म्हणजे मोबाईल. जगभरातील मोबाईल उत्पादकांच्या नजरा सध्या भारतावर खिळलेल्या आहेत, कारण हीच जगातील सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ आहे. शिवाय ही सर्व प्रकारच्या मोबाईल मॉडेलच्या गरजा भागविणारी अशी बाजारपेठ आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांना असे वाटते की, सुयोग्य बाजारपेठ आहे. इथे आयुष्यात प्रथमच फोन वापरणारे आजी- आजोबा किंवा इतर मंडळीही आहेत. स्मार्टफोनच्या प्रेमात असलेला तरुण वर्गही आहे आणि आपले व्यावसायिक काम स्मार्टफोनच्या मार्फत करणारी मंडळीही आहेत. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंग आघाडीवर आहे (आणि उत्पादनाच्या तक्रारींच्या बाबतीतही) तर एकेकाळी आघाडीवर असलेली नोकिया खूपच पिछाडीवर आहे. बाजारपेठेत तग धरून राहण्यासाठी मध्यंतरी नोकियाने दोन प्रकारचे प्रयत्न केले. सर्वप्रथम त्यांनी िवडोज आठ या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे लुमिआ हे स्मार्टफोन्स बाजारपेठेत आणले. लुमिआला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अनेक ग्राहक तर त्याच्या डिझाईनच्याही प्रेमात होते. पण लुमिआची किंमत न परवडणारा असाही एक मोठा वर्ग भारतात आहे, त्यांच्यासाठी नोकियाने आशा नावाची मालिका बाजारात आणली. ती त्या वर्गात चांगली लोकप्रियही आहे. मात्र सर्वानाच सध्याच्या जमान्यात हवा असतो तो स्मार्टफोनचा अनुभव. शिवाय स्मार्टफोन हातात असणे हे स्टेटस सिम्बॉलही झाले आहे. हे सारे लक्षात घेऊनच आता नोकियाने प्रत्यक्षात फीचर फोनच्या किंमतीत स्मार्टफोनचा अनुभव देणारा असा नोकिया आशा ५०१ बाजारात आणला आहे. हा फोन स्वस्तातील अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षाही तुलनेने बराच स्वस्त आहे. रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आलेले याचे काही विशेष पुढीलप्रमाणे..

डिझाईन
नोकिया आशा ५०१ दिसायला अतिशय आकर्षक असून तो तजेलदार रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. नजरेच्या पहिल्या फटक्यात तर हे नोकियाचे लुमिआ मॉडेलच आहे, असे वाटते. त्याचे हे डिझाईन हा ग्राहकांना आकर्षित करणारा महत्त्वाचा भाग ठरू शकतो. त्याच्या पाठच्या भागासाठी पॉलिकाबरेनेटचा वापर करण्यात आला आहे. तर समोरच्या बाजूला असलेली काच ही एरवी स्मार्टफोनना असणाऱ्या चांगल्या काचेप्रमाणेच आहे.
समोरच्या बाजूस याला केवळ एकच ‘बॅक’ बटन देण्यात आले आहे. तर फोनच्या उजव्या बाजूस पॉवर ऑन झ्र् ऑफ, लॉक अनलॉक बटन आहे. वरच्या बाजूस मायक्रो यूएसबी पोर्ट आणि चार्जिंग व इअरफोन लावण्यासाठीची सोय देण्यात आली आहे. मागच्या बाजूस खालती एक बटन असून ते दाबल्यानंतर मागच्या बाजूचे कव्हर बाहेर काढता येते. त्याशिवाय मागच्या बाजूस वरती एक कॅमेराही देण्यात आला आहे.

चांगले स्क्रीन रिझोल्युशन
एवढय़ा कमी किंमतीत मिळणाऱ्या फोनना चांगले रिझोल्युशन असलेले स्क्रीन सहसा वापरले जात नाहीत. मात्र नोकियाने या मॉडेलसाठी वापरलेल्या स्क्रीनचे रिझोल्युशन ३२० गुणिले २४० पी एवढे असून हा स्क्रीन ३ इंचाचा आहे. नोकियाने त्यासाठी उजळ रंगांचा वापर या स्क्रीनवर केला आहे.

मेमरी
या फोनची इंटर्नल मेमरी केवळ १२८ एमबी एवढी कमी असली तरी विशेष चिंता करण्याचे कारण नाही. कारण मेमरीची क्षमता वाढविण्यासाठी त्याला एक स्लॉट देण्यात आला असून त्या माध्यमातून तब्बल ३२ जीबीपर्यंत ही क्षमता वाढविता येऊ शकते. त्याचप्रमाणे या फोनसोबत नोकिया तुम्हाला ४ जीबीचे मेमरी कार्ड मोफत देते. त्यामुळे लगेचच बाजारात जाऊन नवे मेमरी कार्ड विकत घेण्याची घाई टाळता येईल.
कॅमेरा
नोकिया आशा ५०१ मध्ये वापरलेला कॅमेरा ३.१५ मेगापिक्सेल क्षमतेचा आहे. तो  स्मार्टफोनमधील कॅमेऱ्या इतका चांगला नसला तरी त्यावर सरासरी फोटो बऱ्यापैकी येतात. शिवाय मूल्यवर्धित बाब म्हणून कंपनीने त्यात विविध इफेक्टही सोबत दिले आहेत. त्यामुळे त्या इफेक्टस्वर कॅमेरा सेट करून तुम्हाला मजेशीर इफेक्ट असलेले फोटो टिपता येतात. अंधारात फोटो टिपताना थोडी पंचाईत होऊ शकते कारण याला फ्लॅसची जोड मात्र देण्यात आलेली नाही.

कार्यचालन
सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो फोनच्या काम करण्याचा म्हणजे कार्यचालनाचा. त्या बाबतीत बोलायचे तर नोकियाने यासाठी आशा १.० हा खास यासाठीच निर्माण केलेली ऑपरेटिंग सिस्टिम वापरली आहे. एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकदा फीचर फोनमध्ये मल्टिटास्कींग पाहायला मिळत नाही. पण या फोनमध्ये मात्र त्याचा समावेश करण्यात आला असून त्या मल्टिटास्कींगचे श्रेय या ऑपरेटिंग सिस्टिमकडेच जाते. खरे तर आता बाद झालेल्या मीगो या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमचा प्रभाव या नव्या ऑपरेिंटग सिस्टिमवर पाहायला मिळतो. पण नोकियाने त्यात अनेक चांगले बदल केल्याचेही जाणवते.

टच अ‍ॅण्ड स्वाइप
स्मार्टफोनचा मिळणारा अनुभव या फोनमध्ये टच अ‍ॅण्ड स्वाइप या माध्यमातून घेता येतो. स्क्रीन अनलॉक करण्यासाठी स्क्रीनवर दोनदा टकटक केले की, पुरते अशी सोय करण्यात आली आहे. तर उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे स्वाइप केले की, मग आपल्याला अ‍ॅप्स मेन्यू किंवा होम मेन्यूमध्ये जाता येते.
अ‍ॅप्स
स्मार्टफोनचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे विविध प्रकारची अ‍ॅप्स. ही अ‍ॅप्स यापूर्वी फीचर्स फोनमध्ये कधीच नसायची. पण आता नोकियाने या फीचर फोनमध्ये स्मार्टफोनचा अनुभव देण्यासाठी अ‍ॅप्सचा समावेश केला आहे. त्यात फेसबुक, ट्विटर यांचा समावेश आहे. मात्र अलीकडे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉटस् अ‍ॅपचा त्यात समावेश नाही ही मात्र कमी आहे.

गेमिंगची आवड असलेल्यांसाठी
पण त्याशिवाय मेलबॉक्स, नोटस्, कॅलक्युलेटर, कॅलेंडर, म्युझिक प्लेअर हे सारे यात उपलब्ध आहे. ज्यांना मोबाईलवर गेम्स खेळण्याची आवड आहे, अशांसाठी यात नोकियाने ४० मोफत इए गेम्स उपलब्ध करून दिले आहेत. सिवाय अ‍ॅप्स नाव या स्टोअरमध्ये तर वीचॅट सारखी अ‍ॅप्सही उपलब्ध आहेत.

कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटीसाठी नोकियाने याला टूजी, वाय- फाय, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी असे पर्याय दिले आहेत. यातील मायक्रो यूएसबीच्या माध्यमातून फोन चार्ज करण्याची सोयही उपलब्ध आहे.

नोटिफिकेशन बार
स्मार्टफोनचा अनुभव देणारे आणखी एक महत्त्वाचे फीचर म्हणजे नोटिफिकेशन बार. हा पाहिला की, प्रथमदर्शनी त्याचे डिझाईन आणि फोनचे डिझाईन या दोन्ही मुळे क्षणभर आपण विंडोज फोन तर वापरत नाही ना, अशी रास्त शंका येते. या नोटिफिकेशन बारमुळे तुमच्या हाती हा फोन पाहिल्यानंतर कुणालाही तो स्मार्टफोनच वाटेल.

एफएम व निष्कर्ष
अलीकडच्या तरुणाईला आवडता एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे एफएम. रिव्ह्य़ूच्या दरम्यान आलेला एफएमचा अनुभव मात्र उत्साहवर्धक नाही. अनेकदा फ्रिेक्वेन्सीच नीट पकडत नसल्याचा अनुभव वारंवार येत होता. ही एकमात्र त्रुटी वगळता हा फोन त्यासाठी मोजली जाणारी किंमत केवळ रास्तच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक आपल्याला काही देत असल्याचा अनुभव येतो.
भारतीय बाजारपेठेतील
किंमत : रु. ५,५००/-

फोनचे विशेष- उपलब्ध प्रकार
कनेक्टिव्हिटी : डय़ुएल बॅण्ड जीएसएम, जीपीआरएस, एज, वाय- फाय बी/ जी, ब्लूटूथ व्ही ३.०
सिम : डय़ुएल मायक्रोसिम
ऑपरेटिंग सिस्टिम : नोकिया आशा १.०
स्क्रीनचा आकार : ३ इंच
स्क्रीनचा प्रकार : कपॅसिटीव्ह टचस्क्रीन- १३३ पिक्सेल्स घनता
सेन्सर : प्रॉक्झिमिटी, अ‍ॅक्सिलेरोमीटर
इंटर्नल मेमरी : ४० एमबी
रॅम : ६४ एमबी
एक्सटर्नल मेमरी क्षमता : ३२ जीबी (४ जीबी कार्ड मोबाईलसोबत मोफत )
ब्राऊझर : नोकिया एक्स्प्रेस
अ‍ॅप्स : नोकिआ स्टोअर
मागचा कॅमेरा : ३.१५ मेगापिक्सेल, क्यूव्हीजीए १५ फ्रेम्स प्रतिसेकंद दराने.
बॅटरी क्षमता : १२०० एमएएच लिथिअम आयन बॅटरी
लाऊडस्पीकर : सोय उपलब्ध आहे.

Story img Loader