अॅपलच्या आय फोन ५ ला टक्कर देणारा स्मार्टफोन या दृष्टीने सॅमसंग गॅलेक्सी एस ४ कडे पाहता येईल. नवी दिल्लीजवळ किंग ऑफ ड्रीम्स या थीम पार्कमध्ये एका शानदार समारंभात गॅलेक्सी एस ४ भारतात दाखल झाला. न्यूयॉर्कपाठोपाठ सॅमसंगने भारतात गॅलेक्सी एस ४ आणला त्यावरून भारतीय बाजारपेठेचे महत्त्व लक्षात येते.
ऑक्टा कोअर प्रोसेसर
आकर्षक स्क्रीन, गती, वैविध्यपूर्ण कॅमेरा यामुळे हा स्मार्ट फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी खात्री कंपनीला आहे. १.६ ॅऌे ऑक्टा कोर प्रोसेसर तसेच २ जीबी रॅम असल्याने एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशन वापरणे सहज शक्य होणार आहे. १६ जीबी, ३२ जीबी आणि ६४ जीबी या क्षमतेमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. त्यामुळे याची साठवण्याची क्षमता (स्टोरेज कपॅसिटी) खूप आहे. याच्या स्क्रीनची काच वेगळ्या पद्धतीची असल्याने त्यावर चरे पडत नाहीत. यामधील ड्रॉप बॉक्स सुविधेमुळे ऑफिसची कागदपत्रे कुठेही जगभरात पाहता येणे शक्य आहे.
सर्वकाही एकाच ठिकाणी
याची २६०० एमएएचची बॅटरी दीर्घकाळ चालणारी आहे. सॅमसंग गॅलेक्सीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सॅमसंग हब. गेम स्टोरेज, पुस्तके वाचण्याची सोय तसेच लर्निग व व्हिडीओ सुविधा आहे. यामध्ये पुस्तके वाचण्याची सुविधा असल्याने ते बरोबर घेऊन फिरावे लागणार नाही. लर्निग स्टोअरमध्ये एखादी नवी गोष्ट शिकायची असेल तर मार्गदर्शक म्हणून तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी एस ४ उपयोगी पडू शकतो. हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता येतात.
स्मार्ट स्क्रोल
स्मार्ट स्क्रोल हे असेच वैशिष्टय़पूर्ण अॅप्लिकेशन आहे. कार्यालयात एखादे सादरीकरण करायचे असेल तर हातवारे करून तुम्ही ते सादर करू शकता. ऑप्टिकल रीडरच्या मदतीने बिझनेस कार्ड किंवा व्हिजिटिंग कार्ड स्कॅन केल्यावर ते पाहता येते. यात स्कॅनिंगची सुविधा आहे. उदा. रोज अनेक लोक भेटतात. अशा वेळी सर्वच व्हिजिटिंग कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. याचा आणखी महत्त्वाचा उपयोग म्हणजे तुम्ही दुसऱ्या गावात असाल, एखादा महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला तातडीने पाठवायचे असेल, तर ते ऑप्टिकल रीडरच्या मदतीने पाठवता येते. उदा. वाहन परवाना, घराची कागदपत्रे पाठवणे शक्य होणार आहे.
दहा भाषांत एस व्हॉइस
ट्रान्सलेटरचा पर्यायही असाच अनोखा आहे. एखादी भाषा जरी येत नसली तरी तुम्ही इंग्रजीत शब्द टाइप केल्यावर तो तसाच स्क्रीनवर दिसण्याची व्यवस्था आहे. एखाद्या गोष्टीचे मार्गदर्शनही घेणे शक्य आहे. उदा. औषध कसे वापरावे हेदेखील आपण यावरून करू शकतो. यातील एस व्हॉइसच्या सुविधेमुळे एखादा प्रश्न विचारल्यावर दहा भाषांत तुम्हाला उत्तरे मिळू शकतात. अनेक भाषा हे याचे वैशिष्टय़ आहे.
डय़ुएल कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये डय़ुएल कॅमेरा असल्याने एकाच वेळी दोन कॅमेऱ्यांतून फोटो टिपले जातात. फोटो टिपणारा डाव्या कोपऱ्यात पाहता येतो. याखेरीज ऑटोमॅटिक एअर व्हूने फोटो, ई बुक स्क्रीन टच न करता केवळ बोटांच्या हालचालीने पाहाता येते. खेरीज चॅट ऑन व्हिडीयो चॅटिंग सेवेचा उपयोग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसारखा करता येणे शक्य आहे. अर्थात त्यासाठी समोरच्याचाही फोन एस ४ असायला हवा.
ग्रुप प्ले
आजच्या तरुणाईला भावणारी ग्रुप प्ले सुविधा हे एस फोरचे आणखी एक वैशिष्टय़. वाय फाय किंवा सेल्युलर सिग्नलच्या मदतीशिवाय जवळपास असलेल्या लोकांमध्ये फोटो, संगीत, गेम्स याचा आनंद घेता येतो. शेअर म्युझिकच्या मदतीने एकच गाणे अनेक फोन्सवर ऐकता येईल.
रिमोट कंट्रोलसारखा वापर
याखेरीज एस ४ चा रिमोट कंट्रोलसारखा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे घरातील टीव्ही रिमोट कंट्रोलला हा एक पर्याय आहे. एस हेल्थ हे अॅप्स धकाधकीच्या जीवनात उपयोगी पडणारे आहे. बाहेर तापमान किती आहे, उकाडा किती आहे याचा तपशीलही एका अॅप्सवर मिळू शकतो. शरीराला कुठल्या अन्नातून जास्त कॅलरीज मिळतात याचा तपशील ठेवणे शक्य होणार आहे. कोणता आहार घ्यावा, किती झोप घ्यावी याचे मार्गदर्शनही होते, त्यामुळे तुमचा तंदुरुस्तीविषयी हा एक उत्तम साथीदार आहे.
स्टोरी अल्बमच्या मदतीने आपल्या आनंदाच्या क्षणाचा एखादा वैयक्तिक अल्बम तयार करणे शक्य आहे. मोठा डिस्प्ले, छोटी पण दीर्घकाळ चालणारी बॅटरी, फ्लीपर कव्हर असल्याने बोलताना कव्हर काढण्याची गरज नाही असा हा सर्वच अंगांनी आकर्षक, जीवन सुखकर करणारा साथीदार असे गॅलेक्सी एस फोरचे वर्णन करावे लागेल. तो अनेक रंगांमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत एकेचाळीस हजार पाचशे आहे.
एस ४ ची वैशिष्टय़े
पाच इंच स्क्रीन फुल एचडी सुपर एमओएलइडी डिस्प्ले, ४४१ पीपीआय
अत्याधुनिक ऑपरेटिव्ह सिस्टम
सॅमसंग हबमध्ये अनेक गोष्टी साठवून ठेवण्याची सुविधा, त्या एका वेळी पाहण्याची सोय
चॅट ऑन व्हिडीओ कॉलिंग सुविधेत व्हिडीओ, व्हॉइस कॉलिंग
प्रोसेसर ऑक्टा कोर असल्याने एकाच वेळी अनेक सुविधा वापरता येणे शक्य
बॅटरी बॅकअप चांगला
ट्रान्सलेटर सुविधेमुळे अनेक भाषांशी व्यवहार शक्य
ऑप्टिकल रीडरमुळे मोबाइलचा वापर स्कॅनरसारखा