स्मार्टफोनच्या बाजारात प्रत्येक घटकेला स्पर्धा सुरू असते. एखादा स्पर्धक शर्यतीत मागे पडतो नि त्याच वेळी नवा भिडू दाखल होतो आणि मग नवीन स्पर्धा सुरू होते. अशी ही स्मार्टफोनची शर्यत सध्या टिपेला पोहोचली आहे. एकीकडे, बाजारातील आपला दबदबा कायम राखण्यात अॅपलसारख्या कंपन्या मागे पडत असताना सॅमसंग मात्र प्रचंड वेगाने पुढे जात आहे. जवळपास दर महिन्याला काहीतरी नवीन उत्पादन घेऊन येणाऱ्या सॅमसंगबाबत त्यामुळे प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळेच परवा सॅमसंगने ‘गॅलक्सी ग्रॅण्ड 2’ बाजारात आणण्याची घोषणा केली, तेव्हा तो कधी आणि कितीला मिळणार याविषयी साऱ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. कधी व किती रुपयांना, या प्रश्नांची उत्तरे अद्याप सॅमसंगने जाहीर केली नसली तरी ग्रॅण्ड 2 कसा आहे, हे मात्र उघड करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची वैशिष्टय़े बघता सॅमसंगने पुन्हा एकदा बाजी मारल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सॅमसंगने गॅलक्सी ग्रॅण्ड बाजारात आणला. त्या वेळी सॅमसंगचा आघाडीचा फोन असलेल्या गॅलक्सी एस3च्या तुलनेत मोठी टचस्क्रीन असलेल्या ग्रॅण्डची किंमत मात्र मध्यम किंमत श्रेणीतील होती. त्यामुळे ‘ग्रॅण्ड’ बाजारात दाखल होताच त्यावर उडय़ा पडल्या. त्यापाठोपाठ सॅमसंगने गॅलक्सी ग्रॅण्ड डय़ुओस आणि गॅलक्सी ग्रॅण्ड क्वाट्रो ही ‘ग्रॅण्ड’च्या आसपासच्या किंमत श्रेणीतील स्मार्टफोन्स आणले. मात्र या दोघांनाही ‘ग्रॅण्ड’इतकं यश मिळालं नाही. आता ‘ग्रॅण्ड 2’च्या रूपात सॅमसंग हे यश अधिक वाढवू पाहत आहे.
सॅमसंगने २५ नोव्हेंबर रोजी लाँच केलेल्या ‘ग्रॅण्ड टू’मध्ये आधीच्या ‘ग्रॅण्ड’सारखी अनेक वैशिष्टय़े आहेत. तर काही बाबतीत तो डावा-उजवा ठरतो. आधीच्या ‘ग्रॅण्ड’ फोनच्या तुलनेत सॅमसंगच्या ग्रॅण्ड-टूचा घेतलेला हा आढावा :
*डिस्प्ले : ५.२ इंची टीएफटी टचस्क्रीन हा ‘ग्रॅण्ड टू’चे मोठे आकर्षण आहे. यापूर्वी आलेल्या सॅमसंग ‘ग्रॅण्ड डय़ुओस’च्या तुलनेत ती काहीशी मोठी (०.२ इंच) आहे. मात्र फरक रेसोल्युशनचा आहे. सॅमसंग ग्रॅण्ड डय़ुओसचे रेसोल्युशन ४८०x८०० पिक्सेल्स इतके आहे. तर ग्रॅण्ड टू ७२०x१२८० पिक्सेल्स आहे. शिवाय डय़ुओसच्या तुलनेत ग्रॅण्ड टूची पिक्सेल डेन्सिटीही (२८० पिक्सेल पर इंच) इतकी आहे. त्यामुळे ग्रॅण्ड-टू अधिक चांगला दृश्यानुभव देईल. शिवाय ग्रॅण्ड टूचा स्क्रीन रेशिओ १६:९ इतका असल्याने त्यावर मूव्हीज किंवा व्हिडीओ पाहताना बाजूला काळय़ा पट्टय़ा दिसणार नाहीत. म्हणजे या स्मार्टफोनवर खऱ्याखुऱ्या अर्थाने ‘फुल स्क्रीन’ व्हिडीओ पाहण्याचा आनंद लुटता येतो.
प्रोसेसर/ ऑपरेटिंग सिस्टीम : डय़ुओस हा अँड्राइड जेलीबिन (४.१.२) ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा स्मार्टफोन आहे, तर ग्रॅण्ड टू जेलीबिन ४.३ वर आधारित आहे. परंतु सध्या बाजारात अँड्राइडच्या ‘किटकॅट’ अर्थात ४.४ व्हर्जनची चर्चा सुरू असताना सॅमसंगने जेलीबिनचाच आधार घ्यावा, ही गोष्ट ग्राहकांना खटकणारी ठरू शकते. ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड करता येईल की नाही, याबाबत सॅमसंगने अद्याप तरी खुलासा केलेला नाही.
दुसरीकडे, प्रोसेसरच्या बाबतीत सॅमसंग ग्रॅण्ड टू सरस ठरतो. १.२ गिगाहट्र्झच्या क्वाड कोअर प्रोसेसरमुळे डय़ुओसच्या तुलनेत हा फोन अधिक वेगाने काम करतो.
कॅमेरा : ग्रॅण्ड टूचा मागील कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे, तर पुढील कॅमेरा १.९ मेगापिक्सेलचा पुरवण्यात आला आहे. यातही ग्रॅण्ड टू डय़ुओसच्याही मागे आहे (डय़ुओसमध्ये पुढील कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे). शिवाय दोन्ही फोनमध्ये १०८० पिक्सेल रेझोल्युशनचे व्हिडिओ रेकॉर्ड करता येत असल्याने कॅमेऱ्याच्या बाबतीत ग्रॅण्ड टू डय़ुओसच्या मागेच आहे.
बॅटरी : ग्रॅण्ड टूमध्ये २६०० अॅम्पियर अवर्स बॅटरी आहे. डय़ुओसच्या तुलनेत बॅटरीची क्षमता अधिक आहे. त्यामुळे डय़ुओसपेक्षा ग्रॅण्ड टूची बॅटरी अधिक काळ काम करू शकेल. डय़ुओसची बॅटरी १० तासांचा टॉकटाइम झेलू शकते. हा हिशेब लावल्यास ग्रॅण्ड टूची बॅटरी अधिक तास चालू शकेल, असे दिसते.
अन्य बाबतीत ग्रॅण्ड टू हा डय़ुओससारखाच आहे. त्यामुळे त्यात तुलना होणे शक्य नाही. मात्र ग्रॅण्ड टूमधील अन्य वैशिष्टय़े आकर्षक आहेत. महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एकाच वेळी दोन अॅप्लिकेशन हाताळता येऊ शकतात.
‘ग्रॅण्ड टू’ हा प्रथमदर्शनी ग्राहकाला आकर्षति करणारा स्मार्टफोन वाटतो. मोठी टचस्क्रीन, मल्टिटािस्कग, अधिक वेगवान प्रोसेसर या वैशिष्टय़ांनिशी तो आधीच्या ग्रॅण्डच्या तुलनेत उजवा आहे. मात्र, यासोबत या स्मार्टफोनला काही मर्यादाही आहेत. पण आतापर्यंतच्या ग्रॅण्डच्या किमतीचा विचार करता हा नवा स्मार्टफोनही २० हजार रुपयांच्या श्रेणीतच असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात पुन्हा ‘ग्रॅण्ड’मस्ती दिसेल, यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा