क्वाड कोअर एलजी ऑप्टिमस
अलीकडे बाजारात क्रेझ आहे ती, हाय- एण्ड अशा स्मार्टफोन्सची. गेल्या तीन महिन्यांमध्ये सॅमसंगने मार्केटिंगच्या बाबतीत घेतलेल्या आघाडीमुळे इतरही कंपन्यांची खूच पंचाइत झाली आणि अखेरीस त्यांनाही सॅमसंगच्या मागोमाग त्या स्पर्धेमध्ये उतरण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. अगदी सुरुवातीस सॅमसंगने मोठय़ा प्रमाणावर जाहिराती केल्या. झिरो पर्सेंट इंटरेस्ट रेट आणि झिरो पर्सेंट सरचार्ज अशा पानभराच्या जाहिराती केल्यानंतर ४० हजारांच्या घरात असलेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीमध्ये सॅमसंगला चांगला फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर आणि त्याचा परिणाम झाल्यानंतर अ‍ॅपलनेही आघाडी उघडली. आता ब्लॅकबेरीही त्यात सहभागी झाली आहे. हाय-एण्ड स्मार्टफोन वापरावा, अशी इच्छा तर प्रत्येकाला असतेच. पण प्रत्येकालाच ते खिशाला परवडणारे नसते. अगदी झिरो पर्सेंट व्याज असे म्हटले तरी तेवढे पैसे खिशात नसतात. हा वर्ग एलजीने गेल्या दीड- दोन वर्षांमध्ये नेमका हेरलेला दिसतो. त्यामुळे नेहमीच्या स्मार्टफोनपेक्षा अधिक किमतीचे आणि हाय- एण्ड स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीत मात्र तोच अनुभव देणारी अशी मालिका एलजीने बाजारात आणली असून त्या मालिकेस बाजारपेठेने चांगला प्रतिसाद दिला आहे. याच मालिकेत आता एलजीने ऑप्टिमस जी हे मॉडेल बाजारात आणले आहे.
मोठा स्क्रीन डिस्प्ले ही सामान्यांची असलेली आवड लक्षात घेऊन यासाठी ४.७ इंचाचा स्क्रीन डिस्प्ले ठेवण्यात आला आहे. यासाठी अँड्रॉइडची जेली बीन ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. या स्क्रीन डिस्प्लेसाठी आयपीएस हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे कोणत्याही कोनातून तुम्ही मोबाइल पाहिलात तरी त्यावरील चित्र व्यवस्थित, चांगले आणि सुस्पष्ट दिसते हे त्याचे वैशिष्टय़ आहे. शिवाय यात वापरण्यात आलेल्या स्नॅपड्रॅगन एस४ प्रोमुळे ब्राऊझिंग किंवा गेिमगदरम्यान आपला वेग जराही कमी होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
हल्ली स्मार्टफोन विकत घेताना ज्या काही महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जातो, त्यात कॅमेरा ही अतिमहत्त्वाची बाब असते. अधिक मेगापिक्सेल असलेला चांगला कॅमेरा असेल तरच ग्राहक त्या मॉडेलला पसंती देतात. एलजीच्या या मॉडेलच्या बाबतीत बोलायचे तर या मॉडेलमध्ये असलेल्या कॅमेऱ्याची क्षमता ही तब्बल १३ मेगापिक्सेल आहे. शिवाय ३२ जीबी एवढी इंटर्नल मेमरी क्षमता आहे. याची बॅटरी हीदेखील २१०० एमएएच असून त्यामुळे ती दीर्घकाळ टिकणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : ३४,५०० /-

वायरलेस ट्रुबीट्स
हल्ली अनेकजण फोन कानाला लावून बोलण्याऐवजी इअरफोन वापरणे पसंत करतात. त्यामुळे हात तर मोकळे राहतातच पण चांगले इअरफोन हेदेखील स्टेट्स सिम्बॉल म्हणून वापरता येतात. त्यामुळे अनेकांचा कल इअरफोन वापरण्याकडे असतो. त्यातही आता ब्लूटूथ इअरफोन हे ‘इन’ आहेत. अगदी महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील याच ब्लूटूथ इअरफोनच्या वापरास पसंती देतात. यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असून पूर्वी संगणकाशी संबंधित सहउपकरणांच्या संदर्भात आघाडीवर असलेल्या अ‍ॅमकेटे या कंपनीच्या उपकरणांनाही आता चांगली मागणी आहे. त्यांनी ट्रुबीट्स नावाचे वायरलेस इअरफोन बाजारपेठेत आणले आहेत.
 सध्या बाजारात असलेल्या इअरफोनच्या वापरामध्ये काही महत्त्वाच्या समस्या असल्याचे लक्षात आल्यानंतर आता अनेक कंपन्यांनी त्यातील त्रुटी वगळणारे तंत्रज्ञान वापरून नवीन इअरफोन्स बाजारात आणले आहेत. या नव्या इअरफोन्सचा विचार करताना आपल्याला प्रामुख्याने दोन बाबी लक्षात येतात. अगदी सुरुवातीच्या काळात बाजारात इअरफोन आले तेव्हा ते मोठय़ा आकाराचे होते. हेडफोन असाच त्याचा प्रकार असायचा. मात्र नंतर ते अगदी लहान आकारात आले आणि मग इअरफोन असा प्रकार अस्तित्वात आला. मात्र आता पुन्हा एकदा आताच्या तरुण पिढीने हेडफोनप्रमाणे असणाऱ्या त्या इअरफोन्सच्या मॉडेल्सना अधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सध्या बाजारात हेडफोनच्या आकारातील इअरफोन्सची अधिक चलती असलेली पाहायला मिळते.
हे सारे नवे बदल लक्षात घेऊन अ‍ॅमकेटे या कंपनीने ट्रुबीटस् हे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. ते हेडफोन या प्रकारात मोडणारे आहे. नव्या मॉडेलमध्ये कंपनीने लॉसलेस ऑडिओ हे तंत्रज्ञान वापरले आहे. म्हणजेच आपण एखादे गाणे ऐकत असताना किंवा फोनवरचे बोलणे ऐकत असताना आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या आवाजामुळे फोनवरचे बोलणे किंवा आवाज नीट ऐकू येत नाही. अशा अवस्थेत बाहेरचे आवाज टाळून तुम्हाला फोनमधील गाणे अथवा संभाषणच ऐकू येईल, असे हे नवे तंत्रज्ञान आहे. या मॉडेलमध्ये या लॉसलेस ऑडिओचा वापर करण्यात आला असून त्याशिवाय उत्तम दर्जाच्या डिजिटल ऑडिओ तंत्राचा समावेश करण्यात आला आहे. वायरफ्री हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
हा केवळ हेडफोन किंवा इअरफोन नाही तर यामध्ये चांगल्.ा प्रतीचा मायक्रोफोनही आहे. त्यामुळे दुहेरी संवाद साधणे सहज शक्य होते. व्हीओआयपीच्या माध्यमातून वापरले जाणारे स्काइप, जी- टॉक किंवा एमएसएन किंवा याहू मेसेंजर आदी विविध सेवांचा वापर करणे सहज शक्य होईल. कानामध्ये आवाज येतो त्या ठिकाणी विशिष्ट आकाराची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे हे यंत्र कानाला लावल्यानंतर कान झाकले जातात आणि उत्तम आवाजाचा अनुभव आपल्याला घेता येतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २८९५/-

थर्मोडो वापरा आणि तापमान जाणून घ्या!
अनेकजण नेहमीचेच आयुष्य जगताना अगदी सजग असतात. म्हणजे दरदिवशी सकाळी ते न चुकता ‘आजचे तापमान किंवा हवामान’ अथवा ‘आजचा हवामानाचा अंदाज’ जाणून घेतात. मग त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. युरोप- अमेरिकेमध्ये अनेक देशांमध्ये हवामान सतत बदलते असते त्यामुळे तिथे तर लोकांना अशी सवय आहेच. शिवाय ती गरज लक्षात घेऊन तेथील रेडिओ आणि टीव्ही चॅनल्सवरही त्याची माहिती सतत दिली जाते. आपल्याकडेही टीव्हीवरील बातम्यांनंतर सकाळी आणि सायंकाळी असा हवामानाचा अंदाज देण्याची प्रथा आहेच. पण आपल्याला स्वतलाच जर हे हवामान समजून घ्यायचे असेल तर? तर आपली निश्चितच पंचाईत होईल. कारण त्या हवामानाच्या अंदाजासाठी आपल्याला अनेक चांगली उपकरणे लागतात. ती आपल्याकडे नाहीत. शिवाय ती घेणे हे वैयक्तिकरित्याही आपल्याला परवडणारे नसते. त्यामुळे मग असा प्रयत्न अनेकदा सोडूनच द्यावा लागतो. पण आता एक नवीन उपकरण आले आहे, त्याचे नाव आहे थर्मोडो ते आपल्या डेस्कटॉप संगणकाला किंवा मग आपल्या लॅपटॉपला जोडून तुम्ही परिसरातील तापमान समजून घेऊ शकता. हे अगदी छोटेखानी असे उपकरण असून ते तुम्ही तुमच्या लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या ऑडिओ जॅकमध्ये घालून ते वापरू शकता. त्यासाठी त्या उपकरणाला कोणतीही बॅटरी वापरावी लागत नाही. तर तुम्ही ते ऑडिओ जॅकमध्ये घातल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर या उपकरणातील पॅसिव्ह सेन्सर काम करू लागतो आणि तो तुम्हाला परिसराचे तापमान सांगतो. म्हणजे खरे तर एक लहानशी वेधशाळाच तुमच्या खिशात घेऊन तुम्ही फिरत असता. भारतीय बाजारपेठेतील किंमत : उपलब्ध नाही.

एचसीएलचा स्मार्ट डेस्कटॉप
बीनस्टॉक एडीव्ही १००४०
अलीकडे लोक मोठय़ा प्रमाणावर लॅपटॉप, नोटबुक्स किंवा टॅब्लेटस् यांची खरेदी करू लागले असले तरी अद्याप आपल्याकडे डेस्कटॉपचे महत्त्व कमी झालेले नाही. डेस्कटॉप घरात असायलाच हवा, हे मात्र सर्वचजण हमखास मान्य करतात. गेल्या अनेक वर्षांमध्ये जसे लॅपटॉप्स किंवा टॅब्लेटस् या प्रकारात नानाविध बदल झाले तसेच ते डेस्कटॉपच्या बाबतीतही होत गेले. फक्त एवढेच की, डेस्कटॉपच्या बाबतीत झालेले बदल हे इतरांच्या मानाने खूप कमी आहेत. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑल इन वन पीसी. या अशा प्रकारच्या पीसीसाठी कमी जागा लागते. त्यासाठी वेगळा सीपीयू आणि इतर गोष्टींची गरज भासत नाही. त्यातही अनेकदा ‘टच’मुळे तर आता माऊस आणि की बोर्ड हा प्रकारही बाद होण्याच्या बेतात आला आहे. अर्थात डेस्कटॉपसाठी मात्र आजही की बोर्ड मोठय़ा प्रमाणावर वापरला जातोच. असो, अशी ही सर्व नवीन वैशिष्टय़े असलेला ऑल इन वन डेस्कटॉप आता एचसीएल या कंपनीने बाजारात आणला आहे. एचसीएल ही डेस्कटॉप कॉम्प्युटिंगच्या बाबतीत नावाजलेली अशी कंपनी आहे. त्यांनी बाजारात आणलेले बीनस्टॉक एडीव्ही१००४० हे मॉडेल तर दिसायलाही अतिशय देखणे आहे. त्याच्या स्क्रीनचा आकार २१.५ इंच एवढा असून हा ऑल इन वन डेस्कटॉप पीसी आहे. त्याची बिल्ट इन बॅटरी तब्बल दीड तास वीजेशिवाय पीसी वापरण्याची सोय करते. त्यामुळे त्या काळात म्हटले तर लॅपटॉपसारखा त्याचा वापर करता येतो. या मॉडेलच्या स्क्रीनसाठी न चकाकणारा असा खास पृष्ठभाग विकसित करण्यात आला आहे. शिवाय कोणत्याही कोनातून पाहिले तरी त्यावरील चित्र सुस्पष्टच दिसेल, अशीही त्याची रचना करण्यात आली आहे. याशिवाय़ इतर कनेक्टिव्हिटीसाठी वाय- फाय, ब्लूटूथ आणि एचडीएमआयचा पर्यायही उपलब्ध आहेच.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ३३,५००/-

एओसीचा एचडी मॉनिटर
मध्यंतरीच्या काळात टीव्हीच्या संदर्भात एक क्रेझ सर्वत्र आली ती होती एचडी टीव्ही. आता देशभरातील टीव्ही प्रसारणामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सध्या सुरू असलेले अ‍ॅनालॉग प्रसारण येत्या काही दिवसांत बंद होणार आहे. त्यानंतर फक्त आणि डिजिटल प्रसारणच देशभरात सुरू असेल. हे डिजिटल प्रसारण हायडेफिनेशन अर्थात एचडी असणार आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला घरात असलेला टीव्हीदेखील एचडीच असावा लागेल. अन्यथा टीव्ही अ‍ॅनालॉग असेल तर त्या डिजिटल प्रसारणाचा आनंद व्यवस्थित घेता येणार नाही. डिजिटल प्रसारण हे अतिशय चांगला सुस्पष्टतेचा आनंद देणारे असते. पुढच्या वर्षांपर्यंत संपूर्ण भारत असा डिजिटल होणार आहे. त्यामुळे हे जाणून देऊनच टीव्ही उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर एचडीटीव्ही बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली.
आता ही क्रेझ केवळ टीव्हीपुरती मर्यादित राहिलेली नसून ती आता तुमच्या संगणकाच्या मॉनिटर स्क्रीनपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता या वर्षी संगणकाच्या मॉनिटर स्क्रीनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यादेखील पुढे सरसावल्या असून त्यांनीहगी एचडी स्क्रीन असलेले मॉनिटर्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. कारण संगणकाच्या बाबतीतील भविष्यही एचडीच असणार हे आता पुरते स्पष्ट झाले आहे.
आता कोणताही कॅमेरा मग तो एसएलआर असो किंवा मग साधा डिजिकॅम त्यावर तुम्ही केलेले व्हिडिओ शूटदेखील एचडीच असते. त्यामुळे संगणकाच्या बाबतीतही एचडीला पर्याय नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात विकत घेतले जाणारे सर्व मॉनिटर्स हे बहुसंख्येने एचडी असणार आहेत. या मालिकेत एओसी या प्रसिद्ध कंपनीने आता नवा २७ इंची एचडी मॉनिटर बाजारात आणला असून हा फ्लॅट मॉनिटर एलइडी प्रकारात मोडणारा आहे. आय२७५७एफएच हा त्याचा मॉडेल क्रमांक आहे. या पॅनेलमध्ये आयपीएस तंत्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अँगलने या स्क्रीनकडे पाहिलेत तरी तुम्हाला अतिशय चांगले सुस्पष्ट चित्रणच पाहायला मिळणार, हा त्या तंत्राचा फायदा आहे.
सध्या बॉर्डरलेस डिझाईन ही नवी फॅशन आहे. हा मॉनिटर स्क्रीन देखील तसाच आहे. शिवाय यामध्ये एचडीएमआयचे दोन पोर्टस् देण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस एचडीएमआय दोन जोडण्या करता येऊ शकतात. त्यातील एखादे गेमिंग कन्सोलला जोडलेले असू शकते तर दुसरे डीव्हीडी प्लेअर किंवा एचडीटीव्हीला जोडलेले असू शकते. यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॉवर सेव्हिंग मोडची सुविधाही देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १९,९९०/-

Story img Loader