क्वाड कोअर एलजी ऑप्टिमस
अलीकडे बाजारात क्रेझ आहे ती, हाय- एण्ड अशा स्मार्टफोन्सची. गेल्या तीन महिन्यांमध्ये सॅमसंगने मार्केटिंगच्या बाबतीत घेतलेल्या आघाडीमुळे इतरही कंपन्यांची खूच पंचाइत झाली आणि अखेरीस त्यांनाही सॅमसंगच्या मागोमाग त्या स्पर्धेमध्ये उतरण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. अगदी सुरुवातीस सॅमसंगने मोठय़ा प्रमाणावर जाहिराती केल्या. झिरो पर्सेंट इंटरेस्ट रेट आणि झिरो पर्सेंट सरचार्ज अशा पानभराच्या जाहिराती केल्यानंतर ४० हजारांच्या घरात असलेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीमध्ये सॅमसंगला चांगला फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर आणि त्याचा परिणाम झाल्यानंतर अॅपलनेही आघाडी उघडली. आता ब्लॅकबेरीही त्यात सहभागी झाली आहे. हाय-एण्ड स्मार्टफोन वापरावा, अशी इच्छा तर प्रत्येकाला असतेच. पण प्रत्येकालाच ते खिशाला परवडणारे नसते. अगदी झिरो पर्सेंट व्याज असे म्हटले तरी तेवढे पैसे खिशात नसतात. हा वर्ग एलजीने गेल्या दीड- दोन वर्षांमध्ये नेमका हेरलेला दिसतो. त्यामुळे नेहमीच्या स्मार्टफोनपेक्षा अधिक किमतीचे आणि हाय- एण्ड स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीत मात्र तोच अनुभव देणारी अशी मालिका एलजीने बाजारात आणली असून त्या मालिकेस बाजारपेठेने चांगला प्रतिसाद दिला आहे. याच मालिकेत आता एलजीने ऑप्टिमस जी हे मॉडेल बाजारात आणले आहे.
मोठा स्क्रीन डिस्प्ले ही सामान्यांची असलेली आवड लक्षात घेऊन यासाठी ४.७ इंचाचा स्क्रीन डिस्प्ले ठेवण्यात आला आहे. यासाठी अँड्रॉइडची जेली बीन ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. या स्क्रीन डिस्प्लेसाठी आयपीएस हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे कोणत्याही कोनातून तुम्ही मोबाइल पाहिलात तरी त्यावरील चित्र व्यवस्थित, चांगले आणि सुस्पष्ट दिसते हे त्याचे वैशिष्टय़ आहे. शिवाय यात वापरण्यात आलेल्या स्नॅपड्रॅगन एस४ प्रोमुळे ब्राऊझिंग किंवा गेिमगदरम्यान आपला वेग जराही कमी होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
हल्ली स्मार्टफोन विकत घेताना ज्या काही महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जातो, त्यात कॅमेरा ही अतिमहत्त्वाची बाब असते. अधिक मेगापिक्सेल असलेला चांगला कॅमेरा असेल तरच ग्राहक त्या मॉडेलला पसंती देतात. एलजीच्या या मॉडेलच्या बाबतीत बोलायचे तर या मॉडेलमध्ये असलेल्या कॅमेऱ्याची क्षमता ही तब्बल १३ मेगापिक्सेल आहे. शिवाय ३२ जीबी एवढी इंटर्नल मेमरी क्षमता आहे. याची बॅटरी हीदेखील २१०० एमएएच असून त्यामुळे ती दीर्घकाळ टिकणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : ३४,५०० /-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा