नोकिया या प्रसिद्ध कंपनीने आता त्यांची आशा ही फोन मालिका खास भारतीय बाजारपेठेसाठी तयार केली असून या मालिकेतील फोन आता प्रत्यक्ष बाजारपेठेत आलेही आहेत. याच्या नावाप्रमाणेच नोकियाच्याही आशा आता या फोनवर खिळलेल्या आहेत. यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खरेदी याच मालिकेतील फोन्सची होईल, अशी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आशा आहे. शिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या सुमारे वर्षभरात सॅमसंगने भारतीय बाजारपेठेवरच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे नोकियाची पंचाईत झाली आहे. त्यामुळेच येत्या दिवाळीच्या खरेदीवर नोकियाने सारे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी अलीकडेच बाजारपेठेत आणलेली ही मालिका ही स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीची आणि कमी सोयी असलेली असली तरी सध्या बाजारात असलेल्या फीचर्स फोनपेक्षा अधिक चांगली वाटावी अशी आहे. संपूर्ण भारत हा काही एवढय़ाच स्मार्टफोनच्या मार्गाने जाणार नाही आणि त्या सर्वत्र पसरलेल्या मोठय़ा मध्यमवर्गासाठी ही आशा फोन मालिका असल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. त्यातील आशा ३०३ हा सध्या बाजारात चलती असलेला फोन आहे.
क्वर्टी की बोर्ड हे त्याचे वैशिष्टय़ आहे. क्वर्टी की बोर्डमुळे तो स्मार्टफोन असल्याचा भास पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. नेमके तेच अपेक्षित आहे. हा फोन एस ४० या प्लॅटफॉर्मवर चालतो. २.६ इंचाचा टचस्क्रीन हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़ महत्त्वाचे म्हणजे याच्यासाठी एक गिगाहर्टझ्चा चांगला प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यासोबत भरपूरसारी अ‍ॅप्सही देण्यात आली आहेत. त्याच अँग्री बर्ड लाइट, व्हॉटस्अप यांचा समावेश आहे. सोबत नोकिया म्युझिक अनलिमिटेड सव्‍‌र्हिस आहेच सोबत. याशिवाय ब्लूटूथ, वाय- फाय, ३.२ मेगापिक्सेल कॅमेरा, मायक्रो एसडीकार्ड या सोयीसुविधाही देण्यात आल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ८,८९९ /-