सध्याचा जमाना ढिन्चॅकचा आहे. या जमान्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेला प्रकार म्हणजे डीजे. या डीजेचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, हा एक चांगला व्यवसाय ठरू पाहातो आहे. म्हणजेच अलीकडची तरुण मंडळी करीयर म्हणूनही डीजे होणे पसंत करतात. डीजे होण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा तुमच्याकडे असाव्या लागतात, त्यात साऊंड मिक्सिंग सॉफ्टवेअर हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी तुम्हाला साऊंड स्टुडिओमध्ये जाणे भाग असते. पण आता येणाऱ्या काळात ही गरज भासणार नाही. कारण आता तुमचा मोबाईलच डीजे स्मार्टफोन झालेला असेल!
यापूर्वी साऊंड मिक्सिंगची काही सॉफ्टवेअर्स किंवा अ‍ॅप्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात आले आहेत. पण याचे वेगळेपण म्हणजे केवळ डीजे आणि साऊंड मिक्सिंग हाच प्राथमिक उद्देश ठेवून आणि त्यासाठीच्या गरजा लक्षात घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नेहमीच्या स्मार्टफोनपेक्षा याचे डिझाईन खूप वेगळे आहे. अर्थात हे सारे करत असतानाच त्याच्यावरून तुम्हाला फोन घेणे, फोन करणे आदी नेहमीच्या बाबीही सर्रास करता येतील, अशीच त्याची रचना करण्यात आली आहे.
अशा प्रकारचा पहिला डीजे स्मार्टफोन जपानी डिझायनर यू हिराओका यांनी तयार केला आहे. त्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. त्या पहिल्या डीजे स्मार्टफोनची छायाचित्रेही त्यांनी जारी केली आहेत. हा नेहमीप्रमाणे दिसणारा स्मार्टफोन नाही, त्याचे डिझाईन वेगळे आहे. हातात आडवा धरल्यानंतर समोरच्या बाजूस तीन स्क्रीन आहेत चौकोनी आकाराचे. तो स्लाईड केला की, खालच्या बाजूसही तीन चौकोन दिसतात. यात मधला चौकोन वगळता बाजूच्या दोन्ही चौकोनामध्ये गोलाकार रचना दिसते. याचा वापर साऊंड मिक्सिंगसाठीचे क्लिक् व्हिल म्हणून करता येतो. की बोर्डऐवजी साऊंड मिक्सिंगसाठी आवश्यक ती रचना करण्यात आली आहे. फोन स्लाइड केल्यानंतर दिसणारे सहाही छोटेखानी चौकोन हे टचसेन्सेटिव्ह असून ते स्पर्शावर काम करतात. केवळ मिक्सिंग नव्हे तर दोन्ही ओळींमध्ये बरोबर मधोमध असलेल्या चौकोनांमध्ये साऊंड एडिटिंगसाठी आवश्यक असलेल्या सोयी अर्थात साऊंड एडिटर देण्यात आला आहे. खालच्या ओळीमध्ये मधोमध असलेल्या चौकोनात मिक्सिंग स्टेशन असून तुम्हाला तिथे नव्याने तयार झालेली साऊंड फाईल पाहण्याची सोयही देण्यात आली आहे.  
यू हिराओका यांनी या डीजे स्मार्टफोनला ग्रँडविझार्ड असे नाव दिले आहे. यावर संगीत ऐकणे म्हणजे एक आगळावेगळा अनुभवच ठरावा. यू हिराओका हे जगभरातील एक प्रसिद्ध डिझायनर आहेत. डिझाईन हाच त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. शोभेची झाडे ठेवण्यासाठीच्या आगळ्या रचनांपासून ते विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बहुपयोगी अशा आगळ्या रचनांपर्यंत अनेक बाबी त्यांच्या नावावर आहे. डीजे संगीताकडे असलेला तरुणाईचा ओढा आणि त्यात निर्माण झालेल्या अधिकच्या व्यावसायिक संधी लक्षात घेऊन हा डीज्ेा स्मार्टफोन तयार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत तो जगभरात सर्वत्र उपलब्ध होईल.

Story img Loader