टाटा समूहाची इनफिनिटी रिटेल ही संस्था क्रोमा नावाची ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने चालवते. या संस्थेच्या वतीने येत्या दोन आठवडय़ात खासगी उत्पादन असलेले थ्री जी अनुकूल टॅबलेट व उच्च दर्जाचे रेफ्रिजरेटर दिवाळीअखेरीस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कंपनीने किफायतशीर दरात क्रोमाची उत्पादने असलेले स्मार्टफोन विकणे सुरू केले आहे. अर्थात हे स्मार्टफोन चिनी बनावटीचे आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजित जोशी यांनी सांगितले की, आम्ही आमची खासगी उत्पादने येत्या काही दिवसात वाढवणार आहोत. त्याचाच भाग म्हणून येत्या एक दोन आठवडय़ात थ्री जीवर चालणारे टॅबलेट उपलब्ध करून दिले जातील. कंपनी हे टॅबलेट तैवान व चीनमधून आणणार असून त्यांची किंमत ९९९० रूपये इतकी असेल. इनफिनिटी रिटेलच्या वतीने सध्या टू जी टॅबलेट हे ६९९० रूपये किंमतीला विकले जात आहेत. दिवाळीपर्यंत जरा जास्त किमतीचे रेफ्रिजरेटर्सही उपलब्ध केले जाणार आहेत.
क्रोमाचे स्मार्टफोनही येत असून पहिले एक हजार फोन बाजारात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता चीनकडून आणखी स्मार्टफोन मागवण्यात आले आहेत. क्रोमा स्मार्टफोनची किंमत ही ८९९० ते १०९९० रूपये या दरम्यान आहे. वेगवेगळी वैशिष्टय़े असलेली स्मार्टफोनची आणखी मॉडेल बाजारात आणण्याचे काम सुरू आहे. नामांकित ब्रँडचे स्मार्टफोन श्रीमंतांची गरज भागवित आहेत, पण तुलनेने कमी उत्पन्न गटातील लोकांना अजूनही स्मार्टफोन हे स्वप्नच आहे, असे जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही क्रोमाची वॉशिंग मशीनही बाजारात आणली आहेत. गेल्यावर्षी अशा खासगी उत्पादनातून १८० कोटींची उलाढाल अपेक्षित होती पण ती १३० कोटी इतकी झाली. २०१३-१४ मध्ये  २०० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. सध्या तरी साठ टक्के वस्तू या भारतीय बनावटीच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा