आयपॅड बाजारात आल्यानंतर एकूणच टॅब्लेट या प्रकाराविषयी समाजात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.अगदी सुरुवातीच्या काळात हा प्रकार केवळ अधिक पैसे असलेल्यांसाठीच आहे, असा एक सार्वत्रिक समज निर्माण झाला होता. टॅब्लेटची गरज किती असणार, याविषयीदेखील सामान्यांमध्ये चर्चा होत असे. लॅपटॉपला पर्याय म्हणून अनेकांनी त्याचा स्वीकार केला. त्यात यापूर्वीच्या लॅपटॉपधारकांचाच अधिक समावेश होता.
पण त्याच वेळेस आयआयटीअन्सनी विकसित केलेल्या ‘आकाश’ या कमी किमतीतील टॅब्लेटने सामान्यजनांना एक आशेचा किरण दाखवला. केवळ पाच हजार रुपयांमध्येही टॅब्लेट विकसित करता येऊ शकतो, असे लक्षात आले आणि ‘आकाश’ने त्याला शैक्षणिक उपकरण म्हणून सामोरे आणले.
शाळा- महाविद्यालयांमध्ये टॅब्लेट
त्यानंतर शाळा- महाविद्यालयांमध्ये टॅब्लेट वाटपाच्या घोषणाही काही राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये केल्या. काहींनी प्रत्यक्ष वाटपास सुरुवातही केली. वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर मात्र त्यावर टीकेची झोड उठली आणि आकाशच्या कॉन्फिगरेशनबद्दल आणि पर्यायाने त्याच्या कामाच्या वेगाबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या. दरम्यान, आकाश- दोन्ही भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. त्याचे मात्र चांगले स्वागत झाले.
इ-लर्निग
एव्हाना इतरही अनेक कंपन्यांना यामध्ये संधी दिसू लागल्या होत्या. भारतीय शाळांमध्ये टॅब्लेटचे वाटप झाले. तर त्यात आपलाही वाटा असावा, असे वाटणे साहजिक होते आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही ही चांगली संधी होती. मग आणखी एक नवीन लाट आली, ती म्हणजे टॅब्लेटसोबत शैक्षणिक अध्ययनासाठीच्या बाबी देण्याची. हा इ-लर्निग या वर्गात मोडणारा प्रकार होता. म्हणजे तुमच्या मुलाने टॅब्लेटच्या माध्यमातून अभ्यास करायचा. हा प्रकार येणाऱ्या काही वर्षांत तुफान लोकप्रिय होईल, अशी या क्षेत्रातील तज्ज्ञांना अपेक्षा आहे. कारण दृक्श्राव्य माध्यमातून केलेल्या बाबी, गृहपाठादी मुलांना चांगल्या लक्षात राहतात, असे संशोधनाअंती लक्षात आले आहे. आता मायक्रोमॅक्स, लावा आदी कंपन्यांनी यात उडी घेतली आहे. गेली अनेक वर्षे संगणकाशी संबंधित सहउपकरणे तयार करणाऱ्या आयबॉल या प्रसिद्ध कंपनीनेही गेल्या दोन वर्षांत मोबाइल आणि टॅब्लेट या क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी एज्यू स्लाइडच्या माध्यमातून शैक्षणिक टॅब्लेट्सच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आय-१०१७ असा त्याचा मॉडेल क्रमांक आहे.
१०.१ इंची स्क्रीन डिस्प्ले
खास विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून याची निर्मिती करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचा स्क्रीन मोठय़ा आकाराचा १०.१ इंचाच आहे. तर त्याचे रिझोल्युशन १२८० गुणिले ८०० या क्षमतेचे आहे.
डय़ुएल कोअर
यासाठी कोर्टेक्स ए९ हा डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून त्याचा वेग १.५ गिगाहर्ट्झ एवढा आहे. शिवाय त्यासाठी जी ४०० माली हा ग्राफिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
जेली बीन
या टॅब्लेटसाठी अँड्रॉइड ४.१ जेली बीन ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. या टॅब्लेटची रॅम क्षमता एक जीबीची असून इंटर्नल मेमरी ८ जीबीची आहे. तर त्याला एक मायक्रो एसडी कार्डाचा स्लॉट देण्यात आला असून त्या माध्यमातून तब्बल ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येईल.
विविध डॉक्स
टॅब्लेटचा दर्शनी भाग समोर धरल्यानंतर उजव्या बाजूस वरपासून खालपर्यंत अनुक्रमे ऑडिओ जॅक, ओटीजी, मायक्रो एसडी कार्ड, होस्ट, एचडीएमआय, चार्जिग अशी विविध डॉक्स देण्यात आली आहेत. त्याशिवाय खालच्या बाजूस पॉवर ऑन-ऑफ व आवाज कमी-अधिक करण्याची बटणे देण्यात आली आहेत.
कॅमेरा
या टॅब्लेटच्या मागच्या बाजूस बरोबर मधोमध दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा व्हीजीए आहे.
प्री- लोडेड
महत्त्वाचे म्हणजे या टॅब्लेटची निर्मिती ही विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून करण्यात आली आहे. त्यामुळे यात काही बाबी प्री-लोडेड स्वरूपात देण्यात आल्या आहेत. इ-टेकच्या माध्यमातून हा कंटेंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. सीबीएसई आणि एसएससी (महाराष्ट्र बोर्ड) या दोन्हींचा पहिली ते दहावीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या टॅबसोबत कोणत्याही एका वर्षांचाच अभ्यासक्रम तुम्हाला मोफत मिळणार आहे. मराठी माध्यमातील अभ्यासक्रमाचीही सोय यात देण्यात आली आहे. मात्र तो पाचवी ते दहावी या इयत्तांपुरताच उपलब्ध आहे.
सुस्पष्टता
टॅब्लेट वापरताना असे लक्षात येते की, याचे रिझोल्युशन चांगले असून त्यामुळे त्याच्या स्क्रीनवरील प्रतिमेची सुस्पष्टता अधिक आहे. यासाठी कंपनीने आयपीएस डिस्प्ले तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे चित्रणाची सुस्पष्टता वाढत असली तरी त्यासाठी नेहमीपेक्षा अधिक ऊर्जा लागते आणि त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. बॅटरी अधिक वापरली जाते.
निष्कर्ष
वेगाच्या बाबतीत हा टॅब्लेट कुठेही कमी पडत नाही. इंटरनेट सर्फिग आदी सर्व बाबीही उत्तम वेगात करता येतात. त्याचे हार्डवेअर अतिशय उत्तम स्वरूपाचे आहे. फक्त एकच त्रुटी प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे याचा कॅमेरा तुम्हाला चांगले चित्रण देत नाही. पण मुळातच शैक्षणिक बाबींसाठीचा वापर हाच या टॅब्लेटचा प्रमुख उद्देश असेल, तर मग कॅमेरा हा भाग दुय्यम ठरतो. पण अलीकडे जेव्हा टॅब्लेट वापरला जातो तेव्हा त्यात चांगला कॅमेरा आहे किंवा नाही हेही ग्राहकांकडून पाहिले जाते. यातील कॅमेऱ्याचा भाग वगळता वापरासाठी हा चांगला टॅब्लेट आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १४,९९९/-
बेस्ट बाय : रु. १२,९९९/-
एज्यू स्लाइडची वैशिष्टय़े
प्रोसेसर कोर्टेक्स ए ९ डय़ुएल कोअर, १.५ गिगाहर्टझ् प्रोसेसर (सीपीयू)
क्वाड कोअर माली ४०० ग्राफिक प्रोसेसर (जीपीयू)
मेमरी एक जीबी डीडीआर थ्री रॅम
८ जीबी बिल्ट इन मेमरी
अतिरिक्त स्टोरेज मायक्रो एसडी स्लॉट ज्या द्वारे ३२ जीबीपर्यंत क्षमता वाढविता येते.
डिझाईन फूल कपॅसिटीव्ह मल्टिटच
डिस्प्ले २५.६५ सें.मी. (१०.१ इंच) आयपीएस एचडी स्क्रीन (१२८० ७ ८००)
ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड जेली बीन ४.१
संगीत एमपीथ्री प्लेअर इतर लोकप्रिय फॉरमॅटस् सह
व्हिडिओ एचडी व्हिडिओ ब्लेबॅक व इतर लोकप्रिय फॉरमॅटस् सह
पाठीमागचा कॅमेरा २.० मेगापिक्सेल
समोरचा कॅमेरा व्हीजीए
कनेक्टिव्हिटी वाय- फाय ८०२.११ बी/ जी/ एन
मायक्रो यूएसबी ओटीजी आणि होस्ट पोर्ट / एचडीएमआय पोर्ट / थ्रीजी डेटा कार्ड यूएसबी डुंगल सह
बॅटरी ८००० एमएएच लिथिअम आयन बॅटरी