अगदी सुरुवातीच्या काळात स्मार्टफोनमध्ये स्पर्धा सुरू झाली ती मोठय़ा स्क्रीनची. जवळपास सर्वच कंपन्यांनी मग मोठय़ा आकाराच्या स्क्रीनचे स्मार्टफोन्स बाजारात आणले. मात्र त्यांची किंमत हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. ही किंमत साधारणपणे ४० हजारांच्या घरात होती. सामान्यांना ती परवडणारी नव्हती.
मोठय़ा स्क्रीनचे आकर्षण
 मात्र मोठय़ा स्क्रीनचे आकर्षण तरीही कायम होते. मग कंपन्यांनी हीच बाब हेरून मोठय़ा आकाराचे मात्र तुलनेने कमी किमतीचे म्हणजेच पूर्वी बाजारात आणलेल्या स्मार्टफोन्सच्या जवळपास अध्र्या किमतीत नवीन स्मार्टफोन बाजारात आणले. मात्र तरीही ते मोठय़ा आकाराच्या स्क्रीनचे आकर्षण काही कमी झालेले नव्हते. मग अलीकडे सर्वाधिक मोठय़ा आकाराच्या स्क्रीनच्या एवढेच शिवाय डय़ुएल कोअर असलेले आणि सर्वाधिक महाग स्मार्टफोनपेक्षा किमान १० हजारांनी स्वस्त असे स्मार्टफोन बाजारात आणण्यास कंपन्यांनी सुरुवात केली आहे. यात आजवर संगणक अर्थात डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लिनोवो या कंपनीने आता जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांनी अलीकडेच बाजारात आणलेल्या स्मार्टफोन्सपैकी सर्वोत्तम मॉडेल असलेला लिनोवो के ९०० ‘लोकसत्ता’कडे रिव्ह्य़ूसाठी पाठविला होता.
गोरिला ग्लास व एचडी स्क्रीन
गोरिला ग्लास हे या स्मार्टफोनच्या वैशिष्टय़ांपैकी एक आहे. त्याचे डिझाईनही आकर्षक असून गोरिला ग्लास उठून  दिसते. महत्त्वाचे म्हणजे स्क्रीनचे रिझोल्यूशन फूल एचडी आहे. १०८० गुणिले १९२० असे त्याचे रिझोल्यूशन आहे.
वजनाने हलका
 हँडसेटचा आकार ६.९ मिमी. असून त्याचे वजन १६२ ग्रॅम्स एवढेच आहे. त्याचा आकार तसा मोठा दिसत असला तरी वजनाने तो हलका आहे. फक्त तो हातात पकडताना निसटून जाण्याची भीती मात्र अनेकदा वाटत राहते, असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले. कदाचित हातात पकडण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण अशी ग्रिप नसल्याने असे होत असावे.
स्टील व पॉलिकाबरेनेट बॉडी
त्याच्या बाह्य़रचनेमध्ये स्टेनलेस स्टील आणि पॉलिकाबरेनेटचा वापर करण्यात आला आहे. ही बाह्य़रचनाही आकर्षक अशीच आहे. खालच्या बाजूस मायक्रो यूएसबी चार्जिग पोर्ट देण्यात आला असून तिथेच हेडफोन जॅकची सोयही आहे, तर डाव्या-उजव्या अशा दोन बाजूंपैकी उजवीकडे वरती पॉवर ऑन-ऑफ बटन, तर त्याच्या खाली मायक्रो सिम कार्डाचा स्लॉट देण्यात आला आहे. त्याच्या विरुद्ध बाजूस आवाज कमी-अधिक करण्याचे बटन देण्यात आले आहे.
इंटेल इनसाइड
इंटेल इनसाइड अशी अनेक डेस्कटॉप किंवा लॅपटॉप्सची जाहिरात केली जाते. मात्र आजवर इंटेलची ही चिप स्मार्टफोनपासून तशी दूरच होती. मात्र आता इंटेलची अ‍ॅटम ही प्रोसेसर चिप वापरणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. त्याचा वेग १.८ गिगाहर्टझ् असून तो डय़ुएल कोअर आहे. त्यामुळे यावर काम करताना कितीही विंडोज किंवा अ‍ॅप्स एकाच वेळेस ओपन केली तरी आपल्याला काम करताना अडचण येत नाही किंवा त्याचा वेगही कमी होत नाही.
२ जीबी रॅम
या स्मार्टफोनसाठी २ जीबी रॅम वापरण्यात आले आहे. त्यामुळे अ‍ॅप्स वापरताना किंवा एकाच वेळेस अनेक अ‍ॅप्स वापरतानाही त्याचा फोनच्या वेगावर कोणताही परिणाम होत नाही.
१६ जीबी मेमरी
हॅण्डसेट सहजी उघडता येत नाही, अशी त्याची रचना आहे. त्यासाठी त्यावर असलेले चार स्क्रू काढून मगच तो उघडता येतो. या हॅण्डसेटला तब्बल १६ जीबीची इंटर्नल मेमरी आहे. मात्र एक्स्टर्नल मेमरीची कोणतीही सोय उपलब्ध नाही. या १६ जीबी मेमरीमधील ९.७ जीबी मेमरी आपल्याला अ‍ॅप्स आणि मीडिया फाइल्ससाठी उपलब्ध आहे.
अप्रतिम यूजर इंटरफेस
लिनोवोच्या या स्मार्टफोनच्या पाहताक्षणी प्रेमात पडावे, असे त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा यूजर इंटरफेस. सध्या दर आठवडय़ाला एक-दोन स्मार्टफोन रिव्ह्य़ूसाठी येतात. या सर्वामध्ये प्रामुख्याने अँड्रॉइडच्या आइस्क्रीम सँडविच किंवा मग जेली बीन यापैकी कोणती तरी एक आवृत्ती ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापरलेली असते. त्यांचा यूजर इंटरफेस बदलण्याच्या किंवा स्वत:ला हवा त्याप्रमाणे करण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही.
जेली बीन कस्टमाइज्ड
मात्र लिनोवोने तसे न करता तो या हँडसेटसाठी अँड्रॉइड जेली बीन २.१ कस्टमाइज्ड केले आहे. त्यात चित्ताकर्षक असे बदल केले आहेत. उदाहरणच घ्यायचे तर यूजर इंटरफेसमध्ये आपण अ‍ॅप्सचा दुसरा गट पाहण्यासाठी टचस्क्रीनवरून बोट फिरवतो त्या वेळेस थ्रीडी प्रमाणे हा यूजर इंटरफेस गोलाकार फिरू लागतो. हा अतिशय चित्ताकर्षक व लोभसवाणा असा प्रकार आहे. असा प्रयत्न कुणी केलेला नाही. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टम एकदम वेगळी भासते.
एन्डय़ुरन्स
यूजर इंटरफेसमधील आणखी एक महत्त्वाचा आणि उपयुक्त प्रकार म्हणजे एन्डय़ुरन्स. यात आपला फोन सुरू करताना दर खेपेस शिल्लक असलेले बॅटरीचे प्रमाण समोर दिसते. त्याचप्रमाणे भरपूर बॅटरी खर्ची घालणारी अ‍ॅप्स पाहतानाही ते आपल्याला शिल्लक बॅटरीचा अंदाज देण्याचे काम करते. ही उपयुक्त अशी सोय आहे. इतरत्रही अशी सोय असते. मात्र त्यासाठी आपल्याला सेटिंग्जमध्ये आत शिरून शोध घ्यावा लागतो. इथे हे होम स्क्रीनवरच पाहायला मिळते.
१३ मेगापिक्सेल
के ९०० मध्ये तब्बल १३ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा वापरण्यात आला आहे. त्यासाठी सोनी एक्समोर बीएसआय सेन्सर वापरण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर त्यासोबत अनेकविध सेटिंग्जही सोबत देण्यात आली आहेत. त्यात कमी प्रकाशात करावयाच्या शूटपासून ते पॅनारोमापर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. कमी प्रकाशात शूट करताना अडचण नको म्हणून दोन एलईडी लाइटस्चा फ्लॅशही देण्यात आला आहे. याचाच वापर प्रसंगी बॅटरी म्हणूनही करता येतो.
वाइड अँगल व मायक्रो
या कॅमेऱ्याचे वैशिष्टय़ म्हणजे यावर चांगले वाइड अँगल फोटोही टिपता येतात. स्मार्टफोन्समध्ये क्लोज अपसाठी मायक्रो सेटिंगची सोय देणारा असेही याचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. यावर टिपलेल्या छायाचित्रांची सुस्पष्टताही वाखाणण्याजोगी आहे.
समोरचा कॅमेरा २ मेगापिक्सेल
आताशा मागचा कॅमेरा जेवढा महत्त्वाचा तेवढाच पुढचा कॅमेराही महत्त्वाचा असतो. येणाऱ्या काळात येऊ घातलेल्या थ्रीजी कॉलिंगच्या सोयीमुळे याला महत्त्व आले आहे. इतर स्मार्टफोन त्यासाठी व्हीजीए कॅमेरा वापरत असताना लिनोवोने मात्र यासाठी या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
बॅटरी क्षमता
लिनोवो के ९०० ची बॅटरी क्षमता हीदेखील त्याची महत्त्वाची अशी जमेची बाजू आहे. त्यासाठी २५०० एमएएच बॅटरी वापरण्यात आली आहे. मोठा स्क्रीन असला तरी फोन पूर्ण चार्ज केलेला असताना आणि वाय-फायचा वापर केल्यानंतरही इतर स्मार्टफोनप्रमाणे तो १२-१५ तासांत गतप्राण होत नाही, तर तो तब्बल दीड दिवस व्यवस्थित चालतो, असा अनुभव रिव्ह्य़ूदरम्यान आला.
निष्कर्ष
मोठय़ा आकाराचा स्क्रीन आणि गोरिला ग्लास ही त्याची प्रमुख बाह्य़ आकर्षणे आहेत, तर कस्टमाइज्ड आकर्षक अप्रतिम ऑपरेटिंग सिस्टम हे प्रेमात पडावे, असे वैशिष्टय़ आहे. बॅटरी क्षमतेच्या बाबतीत तर हा स्मार्टफोन सध्या बाजारात असलेल्या सर्वच स्मार्टफोन्सवर मात करणारा आहे. त्याचे बाह्य़रूप आकर्षक असले तरी डिझाईनमध्ये ग्रिपचा विचार फारसा न झाल्याने तो हातात पकडताना थोडी काळजी घ्यावी लागते.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :  रु. ३२,९९९/-

मोबाइलचा आकार        १५७ ७ ७८ ७ ६.९ मिमी.
वजन                          १६२ ग्रॅम्स
डिस्प्ले                         आयपीएस एलसीडी कपॅसिटिव्ह टचस्क्रीन
स्क्रीनचा आकार            ५.५ इंच.
स्क्रीनचे रिझोल्यूशन     १०८० गुणिले १९२०
प्रोसेसर                          डय़ुएल कोअर २ गिगाहर्टझ्
मेमरी                            १६ जीबी
कॅमेरा    सेन्सर            रिझोल्यूशन १३ मेगापिक्सेल. ४१२८ ७ ३०९६ पिक्सेल्स
ऑपेरटिंग सिस्टम        अँड्रॉइड ४.२ (जेली बीन)
कनेक्टिव्हिटी          ब्लूटूथ, यूएसबी, जीपीआरएस, ईजीपीआरएस, एज, वाय-फाय, ८०२.११ ए/ बी/ जी/ एन
कॅरिअर नेटवर्क क्षमता    टूजी जीएसएम ९००/ १८००/ १९०० थ्रीजी एचएसडीपीए २१००
महत्त्वाच्या सोयी          एसएमएस, एमएमएस, ई-मेल
मीडिया फॉरमॅटस्          एमपीथ्री, डब्लूएव्ही, डब्लूएमए, ईएएसी प्लस
व्हिडीओ फॉरमॅटस्         एमपी फोर, डब्लूएमव्ही, एच.२६४, एच २६३.
बॅटरी क्षमता                   लिथिअम आयन २५०० एमएएच