अन्न किंवा खाद्य पदार्थ हा म्हणजे भारतीयांच्या आवडीचा विषय. भारतात राहिल्यानंतर इतरत्र विदेशातील खाद्य पदार्थ तर अंमळ अळणीच वाटतात. खाद्य पदार्थाची ही आवड काही फक्त पूर्वीच्या म्हणजे ज्येष्ठांच्या पिढीपुरतीच मर्यादित नाही तर ती आताच्या तरुण पिढीलाही आहेच आहे. या तरुण पिढीला भारतीय खाद्य पदार्थाबाबत मात्र फारशी मात्र नसते. पण कधी वेळ मिळाला तर ते करून पाहण्याची हौसही असते. बहुतांश तरुण पिढी ही स्मार्टफोनच्या जमान्याती असल्याने आता स्मार्टफोन्ससाठी भारतीय खाद्य पदार्थाशी संबधित नवीन अ‍ॅप्स विकसित करण्यात आली आहेत. त्यात स्वीट अ‍ॅण्ड स्पायसी इंडियन अ‍ॅप्सचाही समावेश आहे.
दरखेपेस भारतीय रेसिपींसाठीचे पुस्तक सोबत ठेवणे काही शक्य नसते. अशा वेळेस तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेले हे अ‍ॅप तुमच्या साठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. ते एखदा डाऊनलोड केलेत की मग तुम्हाला पुस्तके सोबत नसली तरी चालतील. अ‍ॅप्सचे नाव टाइप केल्यानंतर तुम्हाला याच्या दोन आवृत्त्या दिसतील, त्यातील एक आयफोनसाठी तर दुसरी अँड्रॉइडसाठी आहे. तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टिम पाहून अ‍ॅप डाऊनलोड करा.
डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपमध्ये साधारणपणे ४५०० एवढय़ा मोठय़ा संख्येने भारतीय रेसिपीज पाहायला मिळतील. त्यांची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेसिपी करतानाचे तबब्ल ४०० हून अधिक व्हिडिओजही देण्यात आले आहेत. या दोन्हींचा डेटाबेस वाढतोच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला अधिकाधिक रेसिपीज इथे पाहायला मिळतील.
यात आणखी एक महत्त्वाची सोय दिलेली आहे. ती म्हणजे या रेसिपींसाठी लागणाऱ्या बाबी तुम्हाला उपलब्ध नसतील. तर मग काय वापरायचे असा प्रश्न असतो. तर इथे तुम्ही पर्याय म्हणून काय वापरू शकता, तेही याच अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहे.   
आजच्या तरुण पिढीचा ओढा काहीसा डाएट फूड कडेही असतो. तेही हे अ‍ॅप विकसित करणाऱ्यांनी लक्षात घेतले आहे. त्यामुळे डाएट फूडसाठी काय कराल, त्याची जंत्रीही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे हे अ‍ॅप तरुणांना आवडेल, असेच झाले आहे.
हे अ‍ॅप अँड्रॉइड व आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

Story img Loader