संगणकाशी संबंधित विविध उपकरणे तयार करणाऱ्या ‘आयबॉल’ या प्रसिद्ध कंपनीने मोबाईल हॅण्डसेट निर्मितीच्या क्षेत्रातही प्रवेश केला असून अगदी अलीकडे प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. खरेतर त्याचवेळेस हे अनेकांच्या लक्षात आले होते की, कंपनीने आता स्वतला तरुणाईशी जोडून घेतले असून त्यांना भावतील, अशी उत्पादने आता कंपनीतर्फे बाजारपेठेत आणली जाणार आहेत. आता ते खरेही ठरले आहे. कंपनीने खास युवकांना आकर्षित करेल असा स्मार्टफोन ‘अ‍ॅण्डी ५सी’ आता  बाजारात आणला आहे.मोठा स्क्रीन असलेला स्मार्टफोन तरुणांना आवडतो हे लक्षात ठेवून याचा स्क्रीन ५ इंचाचा ठेवण्यात आला आहे. सोबत आहे पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा. हा कॅमेरा ऑटोफोकस आहे, हे विशेष. अनेकदा अंधारात फोटो काढताना पंचाईत होते. ती टाळता यावी यासाठी याच्या मागच्या बाजूस एक बिल्ट इन फ्लॅशही देण्यात आला आहे. शिवाय त्यात फोटोग्राफी सोयीची जावी किंवा आकर्षक व्हावी असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. ही सेटिंग्ज असून त्या सेटिंग्जवर ठेवून फोटो काढल्यास ते चांगले येतात. त्यात पॅनोरमापासून ते पोर्ट्रेट अशा अनेक पर्यायांचा समावेश आहे. समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा थ्रीजी व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जाईल, अशी योजना करण्यात आलीोहे.
या मोबाईलसाठी एक गिगाहर्टझ प्रोसेसर वापरण्यात आला असून तो अँड्रॉइडच्या अद्ययावत ४.० या नव्या आईस्क्रीम सँडविच या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. याशिवाय त्यात बिल्ट इन जीपीएस, एचएसयूपीए ५.७६ मेगा बाईटस् प्रतिसेकंद थ्रीजी सह आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी ही त्याची वैशिष्टय़े आहेत. या उपकरणामध्ये जी- सेन्सर, प्रॉक्झिमिटी आणि लाइट सेन्सरचाही वापर करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा डय़ुएल सिम स्मार्टफोन आहे. स्मार्ट फोनमध्ये फारच कमी मॉडेल्सना डय़ुएल सिमचा पर्याय उपलब्ध आहे. सध्याची तरुणाई बहुसंख्येने डय़ुएल सिम वापरत असल्याने कंपनीने हा विचार केलेला असावा.  हा क्वाड बॅण्डवर चालणारा फोन असल्याने त्याचा वापर जगभरात कुठेही केला जाऊ शकतो. याशिवाय फेस अनलॉक, कंट्रोल ओव्हर नेटवर्क डेटा, गॅलरी अ‍ॅप, फोटो एडिटर, रेड आय रिमुव्हर आदी सोयीही यात देण्यात आल्या आहेत. त्याची मूळ किंमत रु. १५,९९९ असून सध्या कंपनीने तो रु. १२,९९९ या किंमतीस मर्यादित काळापुरता उपलब्ध  करून दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा