गेल्या काही दिवसांमध्ये खास करूनू तीन महिन्यांमध्ये टॅब्लेट युद्धाला सुरुवात झाली आहे. सात इंची टॅब हे त्याचे युद्धक्षेत्र आहे. हे युद्धक्षेत्र आता विस्तारण्याचे काम केले आहे ते विशटेल या कंपनीने. आजवर टॅब्लेटच्या क्षेत्रात सर्व चर्चा सुरू होती ती लॅपटॉप किंवा नेटबुक अथवा नोटबुकपेक्षा हलका, सहज कुठेही नेता येईल असा आकार याची. त्याचप्रमाणे लॅपटॉपप्रमाणे सारे काही करण्याची त्याची असलेली क्षमता याचाही विचार झाला होता. पण त्यामध्ये भारतीयांच्या दृष्टीने एक महत्त्वाची कमी होती. अँड्रॉइडवर चालणाऱ्या या टॅबमध्ये मराठी युनिकोड पाहण्याची सोय होती पण त्यावर मराठीमध्ये किंवा भारतीय भाषांमध्ये टाइप करता येण्याची सोय उपलब्ध नव्हती. संपूर्ण भारतीय बाजारपेठ त्या प्रतिक्षेत होती. आता मात्र येणाऱ्या काळात जवळपास सर्वच टॅब्लेटमध्ये भारतीय बाजारपेठेत ही क्षमता असेल आणि त्याशिवाय भारतीय बाजारपेठेत त्याचा स्वीकार होणे अवघड असेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी ही अनिवार्य बाब झाली आहे. यामध्ये विशटेलने प्रथम आघाडी घेतली आहे.
कमी खर्चात चांगला टॅब्लेट देणारी कंपनी म्हणून विशटेल ओळखली जाते. यापूर्वी त्यांनी आयआरए आणि आयआरए िथग असे दोन टॅब्लेट बाजारात आणले होते. आता त्या पाठोपाठ तब्बल १४ भारतीय भाषांमध्ये टाइप करण्याची सोय असलेला आयआरए िथग टू हा नवा टॅब्लेट भारतीय बाजारपेठेत आणला आहे. १.५ गिगाहर्टझ् क्षमतेच्या प्रोसेसरवर चालणारा हा टॅब्लेट अँड्रॉइड ४.० अर्थात आइस्क्रीम सँडविच या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. त्यासाठी ५१२ एमबी रॅमचा वापर करण्यात आला आहे. काळा, पांढरा या बरोबरच तरुणाईला आकर्षित करणारा पिवळा, गुलाबी, निळा या रंगांमध्येही हा टॅब्लेट उपलब्ध आहे.
विशटेलच्या या टॅब्लेटचे डिझाईन आणि उत्पादन दोन्ही भारतातीलच आहे. अद्ययावत मल्टिमीडिया, भारतीय भाषांमध्ये टाइप करण्याची सोय, कनेक्टिव्हिटी ही त्याची वैशिष्टय़े आहेत. १४ भारतीय भाषांमध्ये मराठी, गुजराथी, बंगाली, कन्नड, मल्याळम, उडिया या भाषांचा समावेश आहे. आयआरए थिंग टू मध्ये एक टीव्ही अॅप देण्यात आले आहे. या टीव्ही अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल १२० विविध भाषांमधील टीव्ही चॅनल्स पाहाता येतात. यात केवळ मालिका दाखविणारी नव्हे तर क्रीडा, भटकंती, लहान मुलांचे कार्यक्रम, संगीत आदींना वाहिलेल्या चॅनल्सचाही समावेश आहे.
सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे भारतीय भाषांमधील टायिपगची सोय. आजवर याच मुळे अनेकांनी टॅब्लेट विकत घेणे टाळले होते. आणि आता याच नव्या सुविधेमुळे टॅब्लेट विकत घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. या टॅब्लेटमध्ये भारतीय भाषांसाठी एक वेगळे सेटिंग देण्यात आले आहे. ते ऑन केल्यानंतर आपल्याला विविध भाषांचा पर्याय विचारला जातो. त्यात आपल्याला हवी असलेली भाषा स्वीकारल्यानंतर युनिकोडमध्ये टाइप करण्याची सोय सुरू होते. महत्त्वाचे म्हणजे एकदा केलेले सेटिंग पुन्हा बदलण्याची सोयही त्यामध्ये आहे. त्यामुळेच एकच टॅब इतर कोणत्याही भाषकाने वापरल्यास केवळ सेटिंग बदलून त्याला त्याच्या भाषेमध्येही तो वापरता येऊ शकतो. पुन्हा तो मराठीत वापरण्यासाठी त्याचे सेटिंग बदलण्याचे कष्ट घ्यावे लागतील इतकेच.
याशिवाय मल्टिमीडिया पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅशप्लेअर आणि पीडीएफची सोयही देण्यात आली आहे. यात जीपीएसची सोय आहे. त्याचा वापर करून आपले स्वतचे ठिकाण तर निश्चित करता येईलच पण त्याचबरोबर हा टॅब गुगलच्या अँड्रॉइडवर चालत असल्याने गुगल मॅप्सचा वापरही करता येईल.
१.३ मेगापिक्सेलचा कॅमेरा हे त्याचे वैशिष्टय़ असून त्याचा वापर करत स्काइप कॉलिंगही करता येईल. याचा कॅमेरा हा फार मोठय़ा क्षमतेचा नसला तरी खट्टू होण्याची काही गरज नाही कारण यावर एचडी मजा मात्र तरीही लुटण्याची सोय तुम्हाला दिलेली आहे. याचा स्क्रीनमात्र एचडी रिझोल्शनसाठी उपयुक्त असा आहे. त्यामुळे एचडी चित्रफीत पाहाताना कोणतीही अडचण तर येत नाहीच. पण त्याचप्रमाणे त्याची मजाही लुटता येते. याशिवाय गुगल सिस्टिम असण्याचे इतर फायदेही तुम्हाला मिळतीलच. म्हणजेच इ-मेल, गुगल चॅट किंवा प्ले स्टोअर सोबत आहेच. प्ले स्टोअरचा वापर करून आपल्याला गरजेची असलेली अॅप्स डाऊनलोड करता येतील.
याला एचडीएमआय पोर्ट देण्यात आला असून त्याच्या मार्फत त्याची जोडणी मोठय़ा स्क्रीनसोबत करता येते. म्हणजेच टीव्ही किंवा प्रोजेक्टरला तो जोडला जाऊ शकतो. त्याच्या द्वारे यावर असलेल्या बाबी तुम्हाला मोठय़ा स्क्रीनवर पाहाता येतील. एचडीएमआय पोर्ट ही चांगली व मोठी सोय आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सलग चार ते पाच तास वापरता येते.
या टॅबला स्वतची अशी ४ जीबींची मेमरी आहे. ती मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सोयदेखील उपलब्ध आहे. यासोबत येणाऱ्या इ- न्यूज अॅप्सच्या माध्यमातून विविध भाषांमधील एकूण ५५ वर्तमानपत्रे आपल्याला पाहाता येतात. याशिवाय इ- बुक्सचा पर्यायदेखील आहेच. कमीत कमी किंमतीत म्हणजेच ६,५०० रुपयांत हा टॅब्लेट भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा