नोटबुक आणि नेटबुकमध्ये सध्या वेगात परिवर्तन होते आहे. आता तरुण पिढीदेखील खूपच चोखंदळ झाली आहे. त्यामुळे केवळ ब्लूटूथ आहे, असे सांगून भागत नाही. कारण त्यांचा पुढचा प्रश्न असतो, कोणते व्हर्जन आहे. त्यामुळे आता सर्वच कंपन्यांनी त्यांची नोटबुक्स आणि नेटबुक्स नवीन व्हर्जन्ससह आणण्यास सुरुवात केली आहे. अन्यथा अगदी सहा महिन्यांपर्यंत अशी अवस्था होती की, ब्लूटूथ आहे असे सांगितले की, तेवढेही पुरेसे असायचे. मात्र आता नेटसॅव्ही पिढीने अनेक धडे गिरवले आहेत.
तरुणाईसमोरचा प्रश्न हा केवळ अपडेटेड व्हर्जन पुरताच मर्यादित नसतो तर ते सारे किती बजेटमध्ये मिळणार हेही तेवढेच महत्त्वाचे असते. कारण पॉकेटमनी मॅटर्स..
पण आता पालकांनाही हे कळून चुकले आहे की, आपल्या पाल्यासाठी लॅपटॉप हा गरजेचा आहे. त्यामुळे लॅपटॉपच्या खरेदीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये एक ब्रॅण्ड सध्या विद्यार्थी वर्गात सर्वाधिक लोकप्रिय ठरतो आहे तो म्हणजे एसर अॅस्पायर.. आयुष्यात काही तरी होऊ पाहणाऱ्या अशा या पिढीसाठी एसरने घेतलेले हे नावही तेवढेच सार्थ वाटावे..
‘कमीत कमी किंमतीत उत्तमोत्तम गोष्टी ठासून भरलेल्या’ असेच एसरच्या अॅस्पायर मालिकेचे वर्णन विद्यार्थी वर्गाकडून केले जाते. १७ हजार रुपयांपासून या मालिकेतील नोटबुक्सची सुरुवात होते. त्यातही आता विद्यार्थी वर्ग आणि त्या तरुण वयातील त्यांची आवड लक्षात घेऊन एसरने नोटबुक्समध्ये काही नवीन चांगल्या बाबीही समाविष्ट केल्या आहेत, ज्याचा संबंध संगीत, सिनेमा आणि गेम्स यांच्याशी आहे.
मोठा कीबोर्ड
alt एसरने अलीकडे बाजारात आणलेले डी २७० हे नोटबुक आकाराने छोटेखानी असले तरी की बोर्डच्या बाबतीत मात्र आपल्याला खूप चांगले वाटेल, असेच आहे. लहान आकाराच्या नोटबुक्सना सध्या बाजारात सर्वाधिक मागणी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा छोटेखानी आकार आणि कमी वजन. त्यामुळे ते कुठूनही, कुठेही नेणे हे सोपे पडते. मात्र या लहान, छोटेखानी नोटबुक्सची रचना करताना अनेक कंपन्यांनी नोटबुक्सच्या कीबोर्डचा आकारही खूपच लहान केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष टायिपग करताना मात्र विद्यार्थ्यांची किंवा वापरकर्त्यांची तारांबळ उडते. कारण एरवी सवय असते ती डेस्कटॉपची. त्यामुळे हाताच्या बोटांना त्या नव्या की बोर्डच्या आकाराची सवय होईपर्यंत अडचणच असते. आजवरच्या काही सर्वेक्षणांमध्ये असे लक्षात आले आहे की, या लहान आकाराच्या की बोर्डच्या बाबतीत वापरकर्ते नाराज आहेत. त्यामुळेच एसरच्या या मॉडेलमधील कीबोर्डचा आकार लहान करणे टाळण्यात आले आहे. हा कीबोर्ड नेहमीच्या की बोर्डच्या आकाराच्या ९३ टक्के एवढा आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. आणि नेहमीचा मोठाच की बोर्ड वापरत आहोत, असे वाटेल. ही बाब वापरकर्त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
आकर्षक रंग
एरवी काळ्या किंवा करडय़ा रंगाचा लॅपटॉप किंवा नोटबुक वापरले जात असे. मात्र आता तरुणाई नानाविध रंगांना पसंती देताना दिसते. त्यामुळे पूर्वी कदाचित कुणी विचारही केला नसता अशा रंगांमध्ये ही उत्पादने बाजारात येत आहेत. त्यातही तरुणाई हाच खरेदी करणारा वर्ग असेल तर मग रंग हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो. एसरचे हे नोटबुक अॅक्वामरीन, एक्स्प्रेसो ब्लॅक, लाल, सीशेल व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
डय़ुअल कोअर प्रोसेसर
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा प्राण असतो तो त्याचा प्रोसेसर. हे नोटबुक इंटेलच्या डय़ुअल कोअर अॅटम प्रोसेसरवर चालते. त्यामुळे एकाच वेळेस ऊर्जा बचत करून वेगात काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.
एचडीएमआय पोर्ट
१०.१ इंच स्क्रीन असलेल्या या नोटबुकच्या हार्डडिस्कची क्षमता ही ५०० जीबीची आहे. त्यामुळे यावर मल्टिमीडिया फाइल्स व्यवस्थित स्टोअर करता येऊ शकतील. शिवाय या नोटबुकला वेगळा एचडीएमआय पोर्टही देण्यात आला आहे. त्यामुळे थेट मोठय़ा स्क्रीनवर अर्थात टीव्हीवर तुम्हाला एचडी चित्रपटही पाहाता येतील.
कनेक्टिविटी
एसर अॅस्पायर वन डी २७० मध्ये वायर आणि वायरलेस अशा दोन्ही कनेक्टिविटीची सोय आहे. त्यामुळे इ- मेल्स पाहणे किंवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ‘अपडेट’ राहणे सहज शक्य आहे.
वेबकॅम
हल्ली अनेकजण स्काइपसारखी अॅप्लिकेशन्स वापरतात. या पिढीसाठी हल्ली प्रत्येक नेटबुकला समोरच्या बाजूस एक वेबकॅमही देण्यात येतो. अशी सोय या मॉडेलमध्येही आहे. त्याशिवाय या मॉडेलसोबत असलेला मायक्रोफोनही चांगल्या क्षमतेचा आहे. थ्रीडी वन कनेक्टिविटी आणि त्याचबरोबर ४.०१ व्हर्जनचे ब्लूटूथ यामुळे डेटा शेअरिंग वेगात होते.
एनजीपेक्षा लहान
छोटेखानी आकार म्हणजे किती? असा प्रश्न पडलेला असेल तर या नोटबुकचा आकार जगप्रसिद्ध नॅशनल जिओग्राफिक अर्थात एनजी या मासिकाच्या आकारापेक्षाही लहान आहे. त्यामुळे आपल्या पाठीवरील सॅकमध्ये किंवा अगदी लहानशा हॅण्डबॅगमध्येही ते सहज मावू शकते. महत्त्वाचे म्हणजे याचे बॅटरी लाइफ हे तब्बल आठ तासांचे आहे.
बाजारपेठेतील किंमत : रु. १७,२५१/-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा