‘अलीकडे कॉलेजची मुले मनगटी घडय़ाळांचा वापर तसा कमीच करतात. त्यामुळे कोणत्याही कॉलेजमध्ये वर्गात जाऊन प्रश्न केला की किती जण मनगटी घडय़ाळ वापरतात, तर फारच कमी हात वरती येतील..’ स्टीव्ह जॉब्जनंतर अॅपलचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे टिम कूक सांगत होते.. ‘पण अजून दोन वर्षांनी विचारलेत तर ही परिस्थिती अशी दिसणार नाही.. कारण ‘रिस्ट इट इंटरेस्टिंग’ अशी त्यावेळची स्थिती असेल’ टिम कूक यांच्या या विधानांचा मथितार्थ अगदी सरळ आहे तो म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये अॅपली ही कंपनी त्यांचे नवे कोरे उत्पादन घेऊन बाजारपेठेत येणार आहे, ते म्हणजे डिजिटल घडय़ाळ. सध्या ‘आयवॉच’ या नावाने त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
या डिजिटल घडय़ाळाच्या माध्यमातून तुम्हाला फोन करताही येईल आणि आलेला कॉल घेताही येईल अर्थात त्यासाठी प्रामुख्याने ब्लूटूथचा वापर होईल इतकेच. शिवाय त्यात घडय़ाळासाठी स्मार्टटचस्क्रीन असेल. केवळ टचस्क्रीन नव्हे तर तो मल्टिटच असेल म्हणजे स्मार्टफोनवर आपण दोन बोटे एकमेकांपासून दूर नेत फोटोचा आकार कमी- अधिक करतो, त्याचप्रमाणे.. त्यावर स्मार्टफोनप्रमाणे अॅप्सही असतील. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्याचा कॅमेरा. अतिशय चांगल्या रिझोल्युशनचा कॅमेरा यामध्ये समाविष्ट असेल. अर्थात ही सारी घडय़ाळे ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतील. त्यातील बहुसंख्य गुगलच्या अँड्रॉइडवर चालणारी असतील.
टिम कूक यांच्याच नव्हे तर डिजिटल बाजारपेठेच्या अंदाजानुसार येत्या काही महिन्यांत एक एक करत सर्वच कंपन्या स्मार्ट वॉच अर्थात मनगटी घडय़ाळांच्या या बाजारपेठेत उतरत असून त्याचा पहिला फटका सध्या सर्वाधिक खप होत असलेल्या टॅब्लेट पीसीला बसणार आहे. टॅब्लेट बाजारात आल्यानंतर त्याचा फटका डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या खरेदीला बसला होता तसाच अनुभव टॅब्लेटलाही येईल. कारण त्यावेळेस डिजिटल घडय़ाळ ही ‘इन’ असलेली फॅशन असेल. सध्याची तरुणाई नवे काय याच्याच शोधात असते. डिजिटल घडय़ाळ हा रूपाकार त्यांना आवडणारा आणि आधुनिकतेला साजेसा असणार आहे, त्यामुळे आज स्मार्टफोनमुळे मनगटी घडय़ाळ न वापरणारी ही पिढी पुढे स्मार्टफोनऐवजी डिजिटल मनगटी घडय़ाळ वापरताना दिसेल. म्हणून तर टिम कूक म्हणतात.. रिस्ट इज इंटरेस्टिंग !
पण केवळ अॅपल हीच कंपनी काही या डिजिटल घडय़ाळांच्या शर्यतीत नाही. यापूर्वीच सोनी कंपनीने त्यांची डिजिटल घडय़ाळे बाजारपेठेत आणली आहेत. पण त्यात फोनची सोय नाही. पण आता येणाऱ्या काळात सॅमसंग, गुगल आदी सर्व कंपन्या या नव्या बाजारपेठेत उतरलेल्या दिसतील. यातील सॅमसंगने यापूर्वीच त्याच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला असून सॅमसंग गॅलेक्सी गीअर असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. तर गुगलचे डिजिटल घडय़ाळ येत्या काही महिन्यांतच बाजारपेठेत दाखल होईल, अशी चर्चा आहे.
मनगटी घडय़ाळांचा जमाना काहीसा मागे पडल्यानंतर आजही अनेक कंपन्या या स्टेटस सिम्बॉल असलेली अतिमहागडी घडय़ाळे बाजारात आणताना दिसतात. मग आता डिजिटल घडय़ाळांचा नवा जमाना सुरू होत असताना या कंपन्या मागे कशा काय राहतील. यातील नामवंत असलेल्या ओमेट, हायेथिस या सारख्या कंपन्यांनी त्यातही बाजी मारली आहे. हायेथिसने तर त्यांचे पहिले डिजिटल घडय़ाळ त्याच्या सर्व तांत्रिक बाबींसह अलीकडेच जगासमोर आणले. त्यात स्मार्टफोनप्रमाणे अधिक चांगले रिझोल्युशन असलेला कॅमेरा वापरण्यात आला आहे. एरवी ८ मेगापिक्सेल कॅमेरा असला तरी आपल्याला तो खूप मोठा वाटतो. या डिजिटल घडय़ाळामध्ये तर तब्बल ४१ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा वापरण्यात आला आहे.
गुगलच्याबद्दलची चर्चा अशी आहे की, यापूर्वी ताब्यात घेतलेल्या मोटारोला या कंपनीच्या माध्यमातून गुगल त्यांचे डिजिटल मनगटी घडय़ाळ बाजारात आणणार आहे. ते आणत असताना गुगल त्याची जुळणी स्मार्टपणे त्यांच्या गुगल ग्लासबरोबर करणार आहे. म्हणजे डोळ्यांवर गुगल ग्लास आणि हातावर गुगल घडय़ाळ अशी त्यांची योजना आहे. अॅपलही त्यांच्या आयपॉड आणि आयफोनसोबत जुळणी असणारे असेच आयवॉच बाजारात आणणार आहे. सध्या नायकेसारख्या काही कंपन्यांची डिजिटल मनगटी बॅण्डस प्रसिद्ध आहेत. डिजिटल मनगटी घडय़ाळांची बाजारपेठ खुली झाल्यानंतर आरोग्याची माहिती स्क्रीनवर देणारे हे बॅण्डस् मागे पडतील आणि मग डिजिटल घडय़ाळांचाच जमाना असेल, असे म्हटले जाते. त्यामुळे आता, श्वास रोखून धरा आणि वाटा पाहा.. वॉच इट!
vinayak.parab@expressindia.com
वॉच इट!
‘अलीकडे कॉलेजची मुले मनगटी घडय़ाळांचा वापर तसा कमीच करतात.
First published on: 06-09-2013 at 08:16 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch it