फेसबुक कंपनीनं आपलं नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. स्वतः फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली. यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली. आता फेसबुकच्या मालिकीच्या व्हॉट्सअ‍ॅपचंही नाव बदलणार का? यावर स्वतः व्हॉट्सअ‍ॅपनं ट्वीट करत याबाबत माहिती दिलीय.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “कारण आम्हाला साधं राहायला आवडतं. फेसबुक कंपनीचं नाव मेटा झालंय. व्हॉट्सअ‍ॅप आजही व्हॉट्सअ‍ॅपच आहे.”

हेही वाचा : Facebook चं नवं नाव Meta वरून सोशल मीडियात कहर, नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीला बहर, एकापेक्षा एक मीम्स शेअर

फेसबुकच्या नामांतरावर ट्विटरचा टोला

दरम्यान, फेसबुक इतकंच लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या ट्विटरने या संपूर्ण घडामोडींवर फेसबुकची फिरकी घेत टोला लगावला. ट्विटरने एक ट्वीट केलं त्यात म्हटलं आहे, “मोठी बातमी… लोल.. जस्ट मस्करी करतोय… आम्ही अजूनही ट्विटरच आहोत.” या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय.

फेसबुकनं नाव का बदललं?

फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असं असेल.

मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.

केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे. या चिन्हामधून आणि नवामधून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Story img Loader