अॅप्पल, सॅमसंग, ब्लॅकबेरीच्या तुलनेत अगदी स्वस्तात अद्ययावत स्मार्टफोन उपलब्ध करून देणाऱया शिओमी या चिनी मोबईल कंपनीने आता लॅपटॉप निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केल्याची माहिती समोर आली आहे. अॅप्पलच्या मॅकबुक आणि लेनोव्होच्या थिंकपॅडला टक्कर देणारा ‘अॅडव्हान्स लॅपटॉप’ बाजारात आणण्याचा शिओमीचा मनसुबा आहे. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार शिओमीचा अॅडव्हान्स लॅपटॉप पुढील वर्षात दाखल होण्याची शक्यता आहे. सॅमसंग कंपनीसोबत लॅपटॉपमधील मेमरी चिप आणि डिस्प्लेच्या पुरवठ्याबाबत चर्चा करीत असून हा लॅपटॉप देखील आपल्या इतर स्मार्टफोनप्रमाणेच इतरांच्या तुलनेने अगदी स्वस्तात उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर असणार आहे. दरम्यान, ‘मॅकबुक एअर’ला टक्कर देणारा शिओमीच्या लॅपटॉपची छायाचित्रे मागील वर्षीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावेळी कंपनीने ही छायाचित्रे अधिकृत नसून केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. मात्र, ब्लूमबर्गच्या आत्ताच्या अहवालानुसार तंत्रप्रेमींमध्ये शिओमीच्या अॅडव्हान्स लॅपटॉपची उत्सुकता निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. या लॅपटॉपची संभाव्य वैशिष्ट्ये आणि लूकबाबत आत्तापासून नेटकरांमध्ये चर्वितचर्वण सुरू झाले आहे.

Story img Loader