स्मार्टफोनच्या शर्यतीत भारतीय कंपन्याही मागे नाहीत, हे मायक्रोमॅक्स आणि कार्बन यांनी दाखवून दिलं आहेच. आता झेन ही कंपनीही यात सामील होण्याच्या प्रयत्नात आहे. आतापर्यंत कमी मूल्यश्रेणीतील मोबाइलद्वारे बाजारात आपले स्थान टिकवू पाहणाऱ्या झेनने  पहिल्यांदाच १५ हजार रुपयांवरील किमतीचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. तरीही कंपनीचे लक्ष्य सामान्य वर्गातील मोबाइल ग्राहक हेच असल्याचे दिसून येते. झेनने आणलेला अल्ट्राफोन अमेझ म्हणजे सॅमसंग, सोनी, अ‍ॅपल यांच्या उच्चतम श्रेणीतील
(४० हजार रुपयांपुढील) स्मार्टफोनची वैशिष्टय़े असलेला फोन आहे. १३ मेगापिक्सेल मागील कॅमेरा, आठ मेगापिक्सेल पुढील कॅमेरा, १०८० पिक्सेलची पाच इंची स्क्रीन, १.५ गिगाहट्र्झचा प्रोसेसर आणि १४० ग्रॅम वजन असलेला हा मोबाइल या वैशिष्टय़ांवरून उच्चतम श्रेणीतील असला तरी त्याची किंमत १७,९९९ इतकीच आहे. या स्मार्टफोनची इंटर्नल मेमरी १६ जीबी असून ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. मध्यम ते जास्त वापर केल्यानंतर याची बॅटरी एक दिवसपर्यंत चालू शकते. मायक्रोमॅक्सने अलीकडेच आणलेल्या कॅनव्हासला सध्या बाजारात चांगली मागणी आहे. त्याच धर्तीवर स्वस्त दरात जास्त वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी झेनने हा फोन आणला आहे.

Story img Loader