गेल्या एक दोन-दशकांमधे विविध कारणांसाठी विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढलेली आहे. देशांतर्गत किंवा विदेशातील नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना भेटण्यासाठी, उद्योगधंदा-नोकरीसाठी, विविध परिषदा किंवा कार्यक्रमांना हजर राहण्यासाठी आणि पर्यटनासाठी आज मोठय़ा प्रमाणावर विमान प्रवास केला जातो. जगातील शेकडो देशांच्या हजारांहून अधिक विमान कंपन्या आपापल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करत असतात. याशिवाय मालवाहतूक करणारी, खाजगी तसेच चार्टर विमानेही आकाशात उडत असतातच.

या सर्व वाहतुकीसंबंधीचा डेटा विमानतळ, विमानातील रडारसारखी उपकरणे, आकाशातील कृत्रिम उपग्रह यांसारख्या तांत्रिक माध्यमातून सतत गोळा केला जात असतो. ही माहिती एअरलाइन्स कंपन्यांना तर अत्यावश्यक असतेच, पण त्याचा उपयोग तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर होऊ  शकतो.

समजा तुमचे नातेवाईक विमानाने अमेरिकेतून निघालेले आहेत आणि त्यांना तुम्हाला मुंबईच्या विमानतळावर घ्यायला जायचे आहे. हे विमान वेळेवर आहे का? ते कधी मुंबईला पोहोचेल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला विमानतळाला किंवा विमान कंपनीला फोन करण्याची गरज राहिलेली नाही.

‘फ्लाइटअवेअर’चे ‘फ्लाइटअवेअर फ्लाइट ट्रॅकर’ (FlightAware Flight Tracker)(https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.flightaware.android.liveFlightTracker&hl=en ) हे अ‍ॅप तुम्हाला ही माहिती ऑनलाइन दाखवू शकेल. उदाहरणार्थ अमुक एका कंपनीचे न्यूयॉर्कहून संध्याकाळी ५.३० वाजता निघालेले बोइंग ७७७ हे विमान या क्षणी नेमके कुठे आहे त्याचे नकाशावरील स्थान, विमानाचा मार्ग तुम्हाला दाखवला जातो. सध्या त्या विमानाचा वेग, उंची काय आहे आणि ते मुंबईला पोहोचण्याची अंदाजे वेळ तुम्हाला सांगितली जाते.

तुम्ही एखाद्या विमानतळावर तुमच्या उशिराने सुटणाऱ्या विमानाची वाट पाहात असताना ते किती उशिरा सुटेल याचा अंदाज तुम्हाला देण्यात येतो. तुम्ही या अ‍ॅपमधे मुंबई व दिल्ली अशा दोन विमानतळांची नावे दिल्यास या दोन शहरांमध्ये किती विमानांची ये-जा होणार आहे त्याची यादी दाखवली जाते. ही यादी ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना खूपच उपयोगाची ठरते.

एखादी फ्लाइट गेल्या महिन्याभरात रोज किती वाजता सुटली व किती वाजता पोहोचली याचा तपशीलही आपल्याला पाहता येतो. त्या फ्लाइटच्या नियमितपणाचा आपल्याला अंदाज येतो. याशिवाय ज्या वेळी वादळ, अतिवृष्टी, धुके अशा कारणांमुळे विमानांची वाहतूक विस्कळीत होते तेव्हा एअरपोर्ट डिलेज या मेनूखाली सदर शहरांची यादी दाखवली जाते आणि तेथील विमानांना होणारा अंदाजे विलंब दर्शवला जातो. अशा वेळी नकाशावर प्रवाशांचा ‘मिझरी मॅप’ दाखवला जातो. त्यामुळे एका दृष्टिक्षेपात वाहतुकीच्या विस्कळीतपणाची व्याप्ती समजू शकते.

या आणि अशा प्रकारच्या अनेक सुविधा या अ‍ॅपमधे समाविष्ट आहेत. तसेच या प्रकारची इतरही काही अ‍ॅप्स तुम्हाला प्ले स्टोअरवर दिसतील. विमान प्रवासाशी सतत संबंध येणाऱ्या मंडळींना तसेच जिज्ञासूंना अशा प्रकारची अ‍ॅप्स उपयुक्त ठरतील.

मनाली रानडे

manaliranade84@gmail.com

Story img Loader