मानव हा स्वत:ला या पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो. अशा या बुद्धिमान प्राण्याला स्वत:चा बुद्धिमानांक मोजण्याचा मोह पडणे साहजिकच आहे. अंदाजे शंभर वर्षांपूर्वी (१९१२ साली) मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न याने इंटेलिजन्स कोशंट (आयक्यू) म्हणजेच बुद्धिमानांक ही संकल्पना प्रथम मांडली. या संकल्पनेनुसार सर्वसामान्य मानवाचा बुद्धिमानांक शंभर धरला गेला. त्या वेळी केलेल्या पाहणीनुसार दोन तृतीयांश लोकांचा बुद्धिमानांक ८५ ते ११५ या दरम्यान होता, तर पाच टक्के लोकांचा १२५च्या वर, तर पाच टक्के लोकांचा ७५च्या खाली होता. आज माणसाचा बुद्धिमानांक ४० ते १६० असतो असे मानले जाते.
गेल्या शंभर वर्षांच्या काळात बुद्धिमानांक मोजण्याच्या चाचण्यांमध्ये बदल होत गेला. आजच्या आकडेवारीनुसार बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून आधुनिक मानसशास्त्रानुसार त्यांचे शंभराहून अधिक प्रकार आहेत. त्यातील काही ठळक प्रकार म्हणजे संख्या, हिशोब, शब्द, चित्रे, तार्किक, नातेसंबंध, लिपी, निर्णयक्षमता इत्यादी.
आज आपण स्मार्टफोनवरील जे अ‍ॅप पाहणार आहोत त्याचे नाव आहे ‘आयक्यू टेस्ट सागा’ (IQ TEST SAGA) चे आयक्यू टेस्ट-व्हॉट्स माय आयक्यू हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.mindgames.ak.aj.iqtestwithanswers&hl=en ही लिंक वापरा.
यात बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रकारांतील प्रश्न एकत्र करून चाचण्या तयार केलेल्या आहेत. अ‍ॅप सुरू केल्यावर ही चाचणी कशी द्यावी याची माहिती इन्स्ट्रक्शन्स मेनूखाली थोडक्यात दिलेली आहे. यातील सूचना पाहून झाल्यावर तुम्ही चाचणी देण्यास सुरुवात करू शकता.
या बहुपर्यायी चाचणीमध्ये १० मिनिटांमध्ये १५ उत्तरे द्यायची असतात. जर एखादे उत्तर तुम्हाला येत नसल्यास तुम्ही पुढच्या प्रश्नावर जाऊ शकता आणि नंतर वेळ उरल्यास मागे येऊ शकता. तुमचे उत्तर चुकले असल्यास योग्य उत्तर स्पष्टीकरणासह दाखवले जाते.
या चाचणीद्वारे आलेला आपला आयक्यू गुणांक तारखेसह संचित करण्याची सोय असून तो इतरांबरोबर तुम्ही शेअर करू शकता. यात कद चाचणीशिवाय रॅपिड फायर टेस्टही येथे दिलेली आहे ज्यात एकामागोमाग एक कूट प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एका मिनिटात सोडवायचा असतो. या वेळात बरोबर उत्तर दिल्यास पुढचा प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही चुकीचे उत्तर दिल्यास टेस्ट थांबते. तुमचा मेंदू न थकता किती काळ सलग अचूक काम करत राहता हे या चाचणीत बघितले जाते.
बुद्धिमानांक मोजणारी बरीच अ‍ॅप्स तुम्हाला प्ले स्टोअरवर दिसतील. वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारा मिळणारे तुमचे IQ सारखे असतील असे नाही. याचे कारण या बुद्धिमत्ता चाचण्या समाजातील कुठल्या गटाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या आहेत यावर त्या चाचण्यांचे निष्कर्ष अवलंबून असतात. व्यक्तीचे समाजातील स्थान, वय, परिसर, चालीरीती यानुसार त्याची बुद्धिमत्ता विकसित होत असते. त्यामुळे समाजातील विविध समूहांच्या बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या लावाव्या लागतात. या अ‍ॅप्सद्वारे मिळणारा बुद्धिमानांक हा पूर्णपणे अचूक नसला तरी तो सामान्यपणे मार्गदर्शक ठरू शकतो. शिवाय या प्रकारच्या चाचण्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा