मार्बल सॉलिटेयर किंवा पेग्ज या नावाने जगभरात खेळला जाणारा एक पुरातन खेळ. भारतात हाच खेळ खेळण्यांच्या दुकानात ब्रेन व्हिटा म्हणून उपलब्ध आहे. हा एकटय़ाने खेळायचा खेळ. काचेच्या गोटय़ा आणि त्या ठेवण्याचा एक विशिष्ट बोर्ड. बोर्डावर ठिपक्यांच्या रांगोळी प्रमाणे भौमितिक आकारात गोटय़ा ठेवण्यासाठी केलेल्या खाचा आणि प्रत्येक खाचेत एक अशा ठेवलेल्या गोटय़ा. मध्यभागाची एक खाच सोडून सर्व खाचांमध्ये गोटय़ा ठेवलेल्या. विशिष्ट पद्धतीने गोटय़ा हलवून शेवटी बोर्डावर कमीतकमी, शक्यतो एकच गोटी ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असेल. काहीजणांकडे अजूनही या खेळाचे साहित्य असेलही. परंतु आता हा खेळ खेळण्यासाठी तुमच्याकडे याचे साहित्य असायलाच हवे असे नाही. हा खेळ तुम्ही आता मोबाइलवर देखील खेळू शकता, तो देखील वेगवेगळ्या आकाराच्या बोर्डावर. इंग्लिश आणि युरोपियन बोर्ड हे स्टँडर्ड बोर्ड आहेत. इंग्लिश बोर्डवर ३३ खाचा असतात तर युरोपियन म्हणजेच फ्रेंच बोर्डावर ३७ खाचा असतात. या दोन बोर्डव्यतिरिक्त ४५ खाचा असलेला जर्मन बोर्ड, ४१ खाचा असलेला डायमंड आकाराचा बोर्ड, १५ खाचा असलेला त्रिकोणी बोर्ड तसेच असिमेट्रिकल म्हणजेच प्रमाणबद्ध नसलेला बोर्ड असेही बोर्डचे काही प्रकार आहेत. अर्थातच बोर्डाच्या आकाराप्रमाणे तो सोडवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतदेखील वेगळी.
आज आपण याच खेळाशी संबंधित असणारी काही अॅप जाणून घेऊ
१) पॅनागोलाचे मार्बल सॉलिटेयर (Marble Solitaire) हे अॅप. या अॅपवर आठ वेगवेगळे बोर्ड उपलब्ध आहेत. येथे तुम्ही खेळलेली एखादी मुव्ह रद्द करण्यासाठी ‘अनडू’ची (undo) सोय दिलेली आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठीची लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.panagola.game.imarblefree&hl=en
२) ‘पेग्ज’(pegs) हे अॅप. या अॅपमध्ये सोळा वेगवेगळे गट केलेले आहे. प्रत्येक गटात १२ लेव्हल्स असून एकूण ४००० वेगवेगळी पझल्स उपलब्ध आहेत. या अॅपमधे स्टँडर्ड बोर्डसव्यतिरिक्त येथे अनेक छोटे-मोठे विविध भौमितिक आकाराचे बोर्ड आहेत. या अॅपमध्ये आणखी एक सोय दिलेली आहे. खेळाच्या सुरुवातीला मध्यावरची खाच रिकामी असण्याच्या ऐवजी कुठली खाच रिकामी हवी ते तुम्ही ठरवू शकता. यामुळे खेळाची काठिण्यपातळी बदलू शकते. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठीची लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=se.apenet.pegs&hl=en
कुठल्याही बोर्डवर केवळ एकच गोटी शिल्लक ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक चाल ही अतिशय विचारपूर्वकच करावी लागते. त्यामुळे या खेळामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला नक्कीच चालना मिळते. तसेच हा खेळ सर्व वयोगटातील व्यक्ती खेळू शकतात.
या खेळात प्रावीण्य मिळवून आपल्या मित्रमंडळीवर छाप पाडण्यासाठी हे अॅप तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com
अॅपची शाळा : मार्बल सॉलिटेयर
मार्बल सॉलिटेयर किंवा पेग्ज या नावाने जगभरात खेळला जाणारा एक पुरातन खेळ.
Written by मनाली रानडे
आणखी वाचा
First published on: 14-06-2016 at 01:04 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: App ancient game marble solitaire