इसवी सन २००च्या सुमारास चीनमध्ये सर्वप्रथम छपाईला सुरुवात झाली असं म्हणतात.
तेव्हा वूडब्लॉक प्रिंटिंगच्या माध्यमातून छपाई व्हायची. मात्र इसवी सन २०० ते २००० या १८०० वर्षांच्या प्रचंड मोठय़ा काळात पुलाखालून बरीच शाई वाहून गेलीये. घरातल्या एका कोपऱ्यातही आता सटासट छपाई होऊ लागलीये. केवळ कागदावरची छपाई इतक्यापुरतंच प्रिंटरचं कार्य मर्यादित राहिलेलं नाही. थ्रीडी प्रिंटर ही संकल्पनाही आता नवीन म्हणण्याजोगी राहिलेली नाही. सांगायचा मुद्दा हा की प्रिंटर ही अगदी निकडीची गोष्ट नसली तरी अचानक कधी तरी गरज भासते. तेव्हा मग प्रिंट काढण्यासाठी धावपळ होते. अशा वेळीविचार येतो की एक छोटासा बजेट प्रिंटर घेऊनठेवावा.
लेझर प्रिंटर हे सामान्यत
ऑफिसेससाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. डॉक्युमेंट्स पटकन आणि स्वस्तात प्रिंट करून देण्यात हे प्रिंटर पटाईत आहेत. इंकजेटपेक्षा यांचं प्रिंटिंग उठावदार असतं. तसंच या प्रिंटरमधून आलेली प्रिंट ओली जरी झाली तरी शाई पसरत नाही. सध्याच्या घडीला हा परवडणारा असा प्रिंटरचा प्रकार आहे. मात्र कलर लेझर टोनर रिप्लेस करायची वेळ आलीच तर मात्र खिशाला मोठा फटका बसतो. खूप कागदपत्रं प्रिंट करायची असतील तर लेझर प्रिंटरसारखा प्रिंटर नाही.
ऑल इन वन आणि पेपर ट्रे
स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स, कॉपीअर (झेरॉक्स) असे मल्टिफंक्शनल प्रिंटर्सही सध्या बाजारात आहेत. आपापल्या गरजेनुसार हे असे ऑल इन वन प्रिंटर विकत घेत असताना किमतीकडे मात्र लक्ष असू द्या. साधारण अडीच हजारापर्यंतसुद्धा घरगुती कामासाठीचे ऑल इन वन प्रिंटर्स उपलब्ध आहेत.
प्रिंटर घेताना आणखी एक गोष्ट नक्की बघा आणि ती म्हणजे पेपर ट्रे. कुठल्या साइजचा कागद प्रिंटरमध्ये जाऊ शकतो हे एकदा नक्कीच बघून घ्या. सामान्यत: सगळेच प्रिंटर्स ८.५ बाय ११ इंचाचे कागद प्रिंट करतात. त्याशिवाय ट्रेची साइज जितकी मोठी तितके जास्त कागद ट्रेमध्ये राहू शकतात.
नेटवर्क आणि मेमरी कार्ड
पारंपरिकरीत्या प्रिंटर हा यूएसबी वायरने लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटरला जोडला जातो. आजही तशी सुविधा उपलब्ध आहेच. पण बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यात बरीच नवीन फंक्शन्स आली आहेत. इथरनेट वायरने राऊटर आणि कॉम्प्युटरला कनेक्ट करण्याचं तंत्रज्ञानही आता जुनं झालंय. सध्या जमाना आहे तो वायफाय आणि मेमरी कार्ड प्रिंटर्सचा.
वायफाय डायरेक्टसारख्या सुविधा देणारे प्रिंटर्स तर एका क्लिकवर कनेक्ट होतात. (राऊटरमध्येही तशी सुविधा असणं आवश्यक असतं.) त्यामुळे लॅपटॉपच नाही तर अगदी स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट्सवरूनही थेट प्रिंटिंग शक्य आहे. याशिवाय नवीन प्रिंटर्समध्ये मेमरी कार्ड स्लॉटही उपलब्ध असतो. त्यामुळे कॅमेरामधले फोटोज थेट प्रिंट करणंही शक्य आहे.
इप्सॉन, एचपी तसंच कॅननसारख्या प्रतिष्ठित कंपन्या प्रिंटर्सची व्हरायटी उपलब्ध करून देतात. त्यामुळे एकदा ब्रँड निश्चित झाला की बजेटनुसार प्रिंटर विकत घेता येऊ शकतो.
हा छोटासा, बजेट प्रिंटर निवडायचा कसा?
प्रिंटरबाबत निर्णय घेण्याच्या आधी एक मूलभूत प्रश्न स्वत:ला विचारायचा. आपल्याला काय आणि किती प्रिंट करायचं आहे. काय म्हणजे फोटो, डॉक्युमेंट्स, कलर, ब्लॅक अँड व्हाइट वगैरे वगैरे. आणि किती म्हणजे क्वांटिटी आणि वापरण्याची वारंवारता. या प्रश्नाचं उत्तर ठरलं की मग निवड करणं सोप्पं जातं. होम प्रिंटर्समध्ये प्रामुख्याने इंकजेट आणि लेझर हे दोन प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. त्यातही इंकजेट प्रिंटर्सचा मार्केटमध्ये बोलबाला आहे. याचं कारण असं की इंकजेट प्रिंटर्स हे अगदी कुठल्याही प्रकारचं प्रिंटिंग करू शकतात. प्रेझेंटेशनमधले ग्राफ्स असो, फोटोज असो की रिसर्च डॉक्युमेंट्स. पण इंकजेट प्रिंटर्सच्या छपाईचा दर्जा फारसा चांगला नसतो. म्हणजे अगदीच खराब असतो अशातला भाग नाही. पण लेझर प्रिंटरमधून काढलेली प्रिंट ही इंकजेट प्रिंटरच्या प्रिंटपेक्षा अधिक उठावदार असते. दुसरी गोष्ट म्हणजे इंकजेट प्रिंटर्स हे तुलनेने थोडे मंद गतीने काम करतात. एक कागद प्रिंट होऊन बाहेर यायला १५ ते २० सेकंदांचा कालावधी लागतो. नुकतेच बाजारात आलेले काही प्रिंटर्स याला अपवाद आहेत. इंकजेट प्रिंटर्सची किंमत कमी असली तरी त्याची मेंटेनन्स कॉस्ट जास्त असते. हा प्रिंटर सतत वापरला नाही तर त्यातली शाई सुकून जाते. (शाई सुकलेलं काटिर्र्ज एका सीलबंद प्लास्टिक बॅगमध्ये व्यवस्थित ठेवा आणि ती प्लास्टिक बॅग कोमट पाण्यात काही काळ ठेवा. असं दोन-तीन वेळा केल्याने काटिर्र्ज व्यवस्थित काम करू शकतं. अर्थात हा उपाय १०० टक्के यशस्वी होईल याची गॅरंटी नाही.) त्यामुळे शाई भरण्याच्या खर्चाचा भरुदड सहन करावा लागतो.
पुष्कर सामंत – pushkar.samant @gmail.com