हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. शास्त्रीय संगीताप्रमाणेच हिंदी चित्रपट संगीतही भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा मिलाफ करून जुन्या-नव्या अनेक संगीतकारांनी रागदारीवर आधारित अजरामर गाणी दिलेली आहेत. आज आपण ‘बॉलीवूड रागाज’ (Bollywood Ragas) या अॅपविषयी माहिती घेणार आहोत. या अॅपच्या निर्मात्यांनी हिंदी सिनेसंगीताच्या माध्यमातून रागदारीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या अॅपमध्ये आजमितीस शास्त्रीय संगीतातील ६१ लोकप्रिय रागांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. हे राग सामान्यपणे कोणत्या वेळी गायले जातात त्यानुसार रागांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. प्रत्येक रागातील आरोह आणि अवरोहातील स्वर कोणते आहेत याची माहिती दिली गेली आहे. आणि त्याचा ऑडिओ ऐकण्याचीसुद्धा सोय आहे. रागाचा अभ्यास करणाऱ्या इच्छुकांना रागातील वादी-संवादी स्वर आणि त्याची पकड यासारख्या गोष्टीही सांगितलेल्या आहेत.
संगीतप्रेमींचा असाही खूप मोठा वर्ग आहे की, ज्यांना प्रत्यक्ष रागाचे स्वरज्ञान नसले तरी रागांवर आधारित गाणी त्यांना खूप आवडतात. एखादे गाणे अमुक एका रागावर आधारित आहे, हे कळल्यावर मग त्या रागावर आधारित दुसरे गाणे सहज ओळखता येते. या अॅपचे वैशिष्टय़ म्हणजे अंदाजे साडेआठशे लोकप्रिय हिंदी गाण्यांची येथे रागांप्रमाणे वर्गवारी केलेली आहे. उदाहरणार्थ, यमन रागावरील ३१ गाणी, तर पहाडी रागातील ७८ गाण्यांना येथे लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या आवडीप्रमाणे ते ऑडिओ किंवा व्हिडीओरूपात ऐकवले जाते. ही गाणी ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
एखाद्या विशिष्ट सिनेमातील किंवा संगीतकाराचे किंवा रागातील गाणे ऐकण्यासाठी सर्चची सोय या अॅपमध्ये दिलेली आहे. गाण्यांची यादी डिक्शनरीप्रमाणे हवी की जुन्यापासून नव्यापर्यंत हे तुम्हाला सांगता येते. दर्दी मंडळींना या गाण्यांच्या यादीमध्ये भर घालण्याचेही आवाहन या अॅपमध्ये करण्यात आले आहे. त्यासाठी ‘सजेस्ट अ साँग’ (Suggest a Song) या मेनूखाली सोय करण्यात आलेली आहे. मुख्य म्हणजे ही साइट इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com
अॅपची शाळा : संगीताचा आनंद
शास्त्रीय संगीताप्रमाणेच हिंदी चित्रपट संगीतही भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
Written by मनाली रानडे
First published on: 10-05-2016 at 03:06 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood ragas android apps