बॅकअप हा टेकलाइफमधला परवलीचा शब्द आहे. घडामोडी, घटना, माहिती, पुरावे, कागदपत्रं, व्यवहार, संदेशवहन अशा सगळ्याची एकत्रित साठवणूक आणि नंतर जपणूक करणं हे जणू अपरिहार्य आहे. आणि म्हणूनच स्टोअरेज सिस्टीमला (संचय यंत्रणा) सध्याच्या घडीला खूप मागणी आहे. हार्डडिस्क, पेनड्राइव्ह, कॉम्प्युटर वगैरे हार्डवेअरपेक्षा विश्वासू जागा म्हणजे क्लाउड सिस्टम. आपली सगळी माहिती सुरक्षित राहील अशी अज्ञात जागा म्हणजे ही क्लाउड सिस्टम.
ऑनलाइन बॅकअपची सुविधा म्हणजे आपली माहिती सुरक्षित राहण्याची खात्रीलायक जागा. हार्डडिस्क किंवा हार्डवेअरच्या बाबतीत ती खराब होण्याचे किंवा माहिती पुसली जाणे, डिलीट होणे, हार्डवेअर क्रॅश होण्याची शक्यता अधिक असते. आणि म्हणूनच ह्य क्लाउड सिस्टीम्स म्हणजे मोठाच आधार आहे. गुगलची गुगल ड्राइव्ह, अॅपलची आयक्लाउड, शाओमीची एमआय क्लाउड, ड्रॉपबॉक्स ह्य काही प्रचलित क्लाउड सुविधा आहेत. पण त्या व्यतिरिक्तही अनेक अशा यंत्रणा आहेत ज्या क्लाउड स्टोअरेजची उत्तम सुविधा देतात. मुळात क्लाउड स्टोअरेज, ऑनलाइन बॅकअप आणि सिन्क सव्र्हिसेस या दोन संकल्पनांमध्ये गल्लत करता कामा नये. गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्ससारख्या यंत्रणा ह्य क्लाउड स्टोअरेज असून सामान्यत: सिन्क सव्र्हिस देतात. ज्यामध्ये ठरावीक माहितीच क्लाउडवर स्टोअर होत असते. सर्वच्या सर्व माहिती स्टोअर करण्यासाठी जरा खटाटोप करावा लागतो. थोडक्यात सिन्किंग हा क्लाउड स्टोअरेजचा एक भाग आहे.
ऑनलाइन बॅकअप सुविधा जरा वेगळी असते. यामध्ये कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर त्या विशिष्ट सुविधेचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं असतं. ते सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवरच्या फाइल्स स्कॅन करत असतं आणि त्यापैकी स्टोअरेजयोग्य अशा महत्त्वाच्या फाइल्स एनक्रिप्ट करून क्लाउडवर सेव्ह करत असतं. समजा एखादी फाइल कॉम्प्युटरवरून गायब झालीच तर ऑनलाइन बॅकअपमधून ती पुन्हा मिळवता येऊ शकते. सामान्यत: ऑनलाइन बॅकअपमधील डेटा वेबब्राऊजर किंवा मोबाइलवरूनही अॅक्सेस करता येतो.
कशाचा आणि कधी बॅकअप घ्यावा
ब्लॅकब्लेझसारख्या सुविधा आपोआप बॅकअप घेत असतात. त्यांच्या अल्गोरिदमनुसार कॉम्प्युटरवरच्या महत्त्वाच्या फाइल्स स्कॅन करून त्यांचा बॅकअप घेतला जातो. तर स्पायडरओक वनसारख्या यंत्रणा फाइल निवडण्याचा निर्णय तुमच्यावर सोपवतात. त्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या माहितीचा बॅकअप आपण घेऊ शकतो.
अनेकदा दोन-तीन कॉम्प्युटर्सचा वापर आपण कामासाठी करत असतो. अशावेळी वेगवेगळ्या कॉम्प्युटर्सवरचा बॅकअप घेण्याची गरज असते. त्याचबरोबर एका कॉम्प्युटरवरून घेतलेला बॅकअॅप दुसऱ्या कॉम्प्युटरवर डाऊनलोड करण्याचीही आवश्यकता भासते. काही ऑनलाइन बॅकअप यंत्रणा ह्य माहिती क्लाउडवरच अॅक्सेस करण्याची सुविधा देतात. ती माहिती डाऊनलोड करून एडिट करता येत नाही. त्यामुळे ही बाबही ध्यानात घेणं गरजेचं आहे.
बॅकअप कधी घ्यावा याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे दिवसातून, आठवडय़ातून, महिन्यातून एकदा. हा बॅकअप बहुतांशवेळा आपोआप घेतला जातो. पण कन्टिन्युअस बॅकअप ही पद्धत स्तुत्य आहे. याचं कारण म्हणजे कुठलीही फाइल सेव्ह केली की तात्काळ तिचा बॅकअप घेतला जातो आणि आधीच्या फाइलवर ओव्हरराइट केलं जातं. काबरेनाइट आणि क्रॅशप्लॅन ह्य दोन यंत्रणा अशा पद्धतीचा वापर करतात.
डेटा बॅकअपचं क्षेत्र तसं मोठं आहे. मात्र त्यातली जुजबी आणि तितकीच महत्त्वाची माहिती इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. साधारणत: वर उल्लेखलेल्या यंत्रणा ५ जीबीपर्यंतची मोफत जागा उपलब्ध करून देतात. तर क्रॅशप्लॅन, एसओएस ऑनलाइन बॅकअप, काबरेनाइट, अॅक्रॉनिस ट्रू इमेज, ब्लॅकब्लेझ या यंत्रणा पैसे आकारून अमर्यादित जागा पुरवतात. त्यामुळे आपल्या गरजेनुसार जागेचा शोध घेऊन महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवा.
शुल्क आकारणाऱ्या सुविधा
ऑनलाइन बॅकअप असो किंवा क्लाउड सिस्टीम, ह्यतल्या सगळ्याच यंत्रणा ठरावीक जीबीची जागा विनाशुल्क देतात. मात्र अधिक जागेसाठी ज्यादा पैसे भरावे लागतात. हे पैसे भरताना त्यांची नियमावली नीट वाचून घेणं गरजेचं असतं. सबस्क्रिप्शन पद्धतीने यांची शुल्क आकारणी होत असते. सहा महिने, एक वर्ष किंवा दोन वर्षांचे शुल्क आकारले जाते. अनेकदा या यंत्रणा मासिक शुल्काची जाहिरात करतात. पण हे मासिक शुल्क म्हणजे वार्षिक शुल्काची विभागणी असते. उदाहरणार्थ, ५०० जीबीसाठी १५० रुपये प्रतिमहिना अशी जाहिरात असते. पण याचा अर्थ १८०० रुपये वार्षिक भरून ही ५०० जीबी जागा मिळत असते. वास्तवात मासिक शुल्क २५० रुपये असू शकतं. त्यामुळे शुल्क भरताना काळजीपूर्वक माहिती वाचा आणि पावलं उचला.
दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच यंत्रणा ह्य एकाच कॉम्प्युटरसाठी सुविधा देतात. म्हणजे एक अकाऊंट हे एकाच कॉम्प्युटरसाठी वैध असतं. उदाहरणार्थ, क्रॅश प्लॅन, काबरेनाइट, बॅकब्लेझ, ओपनड्राइव्ह. तर ईएमसी मोझीहोमसारख्या यंत्रणा ह्य एका अकाऊंटवर दोनपेक्षा जास्त कॉम्प्युटर्सची वैधता उपलब्ध करून देतात. आयड्राइव्ह, शुगरसिन्क, स्पायडरओक वन सारख्या यंत्रणा अमर्यादित मशिन्ससाठी वापरता येतात. त्यामुळे यापैकी कुठल्याही सुविधेचा लाभ घेण्याआधी स्टोअरेज स्पेस आणि शुल्क तपासून बघा. शेवटी जागा विकत घेताना जशी सावधानता बाळगतो तसंच प्रकरण आहे हे.