दुभाष्या माहित्येय का तुम्हाला. ज्याला दोन भाषा येत असतात आणि तो दोन व्यक्तींमधला संवाद सुरळीत ठेवण्याचं काम करतो. मशीन्सच्या बाबतीत, जास्त करून कम्प्युटर्सच्या बाबतीत असा दुभाष्या म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. अर्थात ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच ओएस हे काही फक्त भाषांतराचं काम करत नाही. कम्प्युटरच्या विविध प्रोसेसेसवर नियंत्रण ठेवायचं काम ओएस करत असते.
पण मुळात ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? आपण जेव्हा कम्प्युटर सुरू करतो, माऊसचा पॉइंटर हलवतो, गेम खेळतो, गाणी ऐकतो तेव्हा काही प्रक्रिया किंवा अॅप्लिकेशन्स कार्यरत होत असतात. जरी आपण या प्रक्रिया हाताळत असलो तरी त्यांच्यावर नियंत्रण मात्र एका वेगळ्याच प्रोग्रामचं असतं आणि तो प्रोग्राम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. ओएस ही एक आज्ञावलींचा संच (सेट ऑफ कमांड्स) आहे. हा प्रोग्रॅम कम्प्युटरमधील मशीनशी अर्थात हार्डवेअर्सशी संवाद साधतो. त्यामधली प्रक्रियांचे क्रमवार नियंत्रण करतो.
रस्त्यांवर वाहतुकीचं नियंत्रण करणारा ट्रॅफिक पोलीस असतो ना! तसंच काहीसं काम ऑपरेटिंग सिस्टम करते. ओएस कम्प्युटरमधील कामकाजाचं नियंत्रण करते. याशिवाय वर म्हटल्याप्रमाणे हार्डवेअर्सशी संवाद साधण्याचं कामही ओएसचंच असतं. ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीला नेमकं कोणतं काम करवून घ्यायचंय हे कम्प्युटरला मशीन लँग्वेजमध्ये सांगण्याचं काम ओएस करते.
ऑपरेटिंग सिस्टमचं काम कसं चालतं
१) थोडक्यात सांगायचं झालं तर प्रोसेस मॅनेजमेंट, मेमेरी मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, स्टोअरेज मॅनेजमेंट, अॅप्लिकेशन इंटरफेस आणि युजर इंटरफेस या ६ विभागांमध्ये ओएसचं कामकाज चालतं.
२) कम्प्युटरमधील इनपुट डिव्हाइसेस
म्हणजेच कीबोर्ड, माऊसद्वारे आलेली सूचना किंवा कमांड ओळखणं.
३) ती कमांड प्रोसस करण्यासाठी आदेश देणं. आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आऊटपूट डिव्हाइसेसच्या (मोनीटर, प्रिंटर) मदतीने माहिती दर्शवणं.
४) कम्प्युटरला जोडलेल्या सर्व साधनांवर नियंत्रण ठेवणं. त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेणं. आणि ते करत असताना कम्प्युटरची टेम्पररी मेमरी (रॅम) आणि डिव्हाइस स्टोअरेज (रॅम) यांचं नियोजन करणं.
कम्प्युटरचा वापर करणाऱ्या व्यक्तीला ऑपरेटिंग सिस्टमबरोबर संवाद साधण्यासाठी एका माध्यमाची गरज असते. ते माध्यम म्हणजे युजर इंटरफेस.
युजर इंटरफेसचे दोन प्रकार आहेत
१) सीयूआय म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस – या इंटरफेसमध्ये कीबोर्डच्या मदतीने कमांड टाइप करावी लागते. यामध्ये कमांडचं स्वरूप हे सांकेतिक भाषेत असतं. समजा कमांड टाइप करण्यात काही चूक झाली तर कम्प्युटर त्या कमांडचं पालन करत नाही.
२) जीयूआय म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस – काही ऑपरेटिंग सिस्टममध्ये कमांड्सचे अर्थ चटकन समजण्यासाठी चित्रं, चिन्हं किंवा अक्षरं स्क्रीनवर दिली जातात. त्या चित्रांवर किंवा चिन्हांवर
माऊसने क्लिक करून मग कमांड्सचं पालन होतं.
ओएसचे प्रकार
ऑपेरेटिंग सिस्टमचे प्रामुख्याने चार प्रकार असतात.
१) रिअल टाइम ऑपेरेटिंग सिस्टम (फळडर)
इनपुट डिव्हाइस म्हणजेच कीबोर्ड, माऊसमधून देण्यात येणाऱ्या कमांड्सना किंवा आज्ञांना लगेच प्रतिसाद देणाऱ्या ऑपेरेटिंग सिस्टिमला रिअल टाइम ऑपेरेटिंग सिस्टम (फळडर) म्हणतात. एचडीटीव्ही रिसीव्हर आणि डिस्प्लेसाठी ही ओएस प्रामुख्याने वापरली जाते.
२) सिंगल युजर सिंगल टास्क – या प्रकारच्या ऑपेरेटिंग सिस्टममध्ये एकच व्यक्ती एकाच प्रकारचे काम प्रभावीपणे करू शकते. मध्यंतरीच्या काळात आलेले पेजर्स किंवा पाम कम्प्युटर्सवर असणारी ओएस ही या प्रकारातली होती.
३) सिंगल युजर मल्टीटास्किंग – या ऑपेरेटिंग सिस्टममध्ये एक व्यक्ती एकाच वेळी अनेक कामं करू शकते. आपण डेस्कटॉप कम्प्युटर्सवर ज्या ऑपरेटिंग सिस्टम्स वापरतो त्या सगळ्या या प्रकारात मोडतात. उदाहरणार्थ, विंडोज ऑपेरेटिंग सिस्टममध्ये एकाच वेळी नोटपॅड किंवा वर्डपॅडमध्ये माहिती टाइप करत असताना आपण नेट सर्फ करू शकतो, गाणी ऐकू शकतो.
४) मल्टीयुजर – यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच वेळी कम्प्युटरचा वापर करू शकतात.
सर्व युजर्सना समान रिसोर्सेस देण्याचं काम
मल्टीयुजर ओएस करत असते. बराच मोठा डेटा स्टोअर करणाऱ्या संस्थांमध्ये मेनफ्रेम कम्प्युटर्स असतात. ज्यात स्टॅटिस्टिक्स, सेन्सस सेव्ह केलेलं असतं. अशा कम्प्युटर्समध्ये मल्टियुजर ओएस वापरली जाते.
या सगळ्यासोबतच आणखी एक गोष्ट ओएसच्या बाबतीत महत्त्वाची आहे. विंडोज, मॅकिन्टॉशसारख्या ओएस या एक्झिक्युटेबल असतात. म्हणजे त्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये इतर कुणाला काहीही बदल करता येत नाही. उलटपक्षी लिनक्स, उबंटुसारख्या ऑपरेटिंग सिस्टम्स या ओपन सोर्स असतात. त्यांच्या प्रोग्राम्समध्ये जाऊन बदल करता येऊ शकतात. या अशा कस्टमाइज्ड ओएस गॅजेट गीक्समध्ये लोकप्रिय असतात. कारण अशी अनेक सॉफ्टवेअर्स असतात जी विंडोज, मॅकिन्टॉशसारख्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये काम करत नाहीत. मात्र ओएसमध्ये थोडेसे बदल
केले की तीच सॉफ्टवेअर्स नीट काम करतात. हा बदल करण्याचा पर्याय लिनक्स, उबंटूसारख्या सिस्टम्समध्ये आहे.
पुष्कर सामंत- pushkar.samant @gmail.com