एखादे पुस्तक किंवा लेख वगैरे वाचताना आपल्यासमोर असे काही शब्द येतात ज्यांचा अचूक किंवा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो. वाचत असलेल्या लेखाचा संदर्भ घेऊन माहीत नसलेला शब्द ज्या वाक्यात आला आहे त्या वाक्याचा अर्थ आपण समजून घेतो; परंतु जेव्हा त्या शब्दाचा नेमका प्रचलित अर्थ आपल्याला हवा असतो तेव्हा डिक्शनरी बघण्याला पर्याय उरत नाही.
सर्वसाधारणपणे डिक्शनरीत किमान पन्नास हजारांपेक्षा जास्त शब्दांचा समावेश असतो आणि ती डिक्शनरी कमीत कमी पंधराशे ते दोन हजार पानांची असतेच. एवढे मोठे पुस्तक सतत स्वत:सोबत बाळगणे कठीणच. अशा वेळी Dictionary.com आणि Dictionary-Merriam-Webster ही दोन इंग्रजी डिक्शनरीची अॅप्स आपल्याला मदतीला येतात. या अॅप्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
Dictionary.com (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.dictionary) या अॅपमधे वीस लाखांहून अधिक व्याख्या आणि समानार्थी शब्दांचा समावेश आहे. हे अॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे. हवा असलेला शब्द सर्च बारमध्ये टाइप केल्यास त्या शब्दाशी संबंधित सर्व माहिती बघायला मिळते. उदाहरणार्थ ‘present’ हा शब्द शोधल्यावर त्याचा उच्चार ऐकता येतो. त्याखालोखाल डिक्शनरी आणि थेसॉरसमध्ये हा शब्द नाम, विशेषण, क्रियापद इ. यापैकी काय काय आहे हे सांगून त्या शब्दाचा अर्थ दाखवला जातो. त्याचे समान अर्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिसतात.
लर्नरखाली अर्थात नवशिक्यांसाठी त्या शब्दांचा अर्थ अधिक सोपा करून सांगितला जातो. तसेच त्या शब्दाचा वापर करून तयार केलेली उदाहरणेदेखील बघायला मिळतात. काही शब्द पुन:पुन्हा शोधावे लागू नयेत म्हणून ते फेवरिटसमध्ये मार्क करून ठेवता येतात. एखाद्या शब्दाचा उच्चार माहीत असेल, परंतु स्पेलिंग माहीत नसल्यास सर्च बारमधील स्पीकरचे बटण दाबून त्या शब्दाचा स्पष्ट उच्चार करा. तो शब्द आपल्याला स्क्रीनवर दिसेल. शोधलेले शब्द आणि त्यासंबंधित माहिती तुम्ही शेअर करू शकता. Word of the day च्या माध्यमातून दर दिवशी नवा शब्द या अॅपद्वारे शिकता येतो. तसेच येथे विविध विषयांवरील ब्लॉग्ज आणि स्लाइड शोजदेखील बघायला मिळतील. या अॅपचा एक मोठा फायदा म्हणजे हे अॅप तुम्हाला ऑफलाइन असतानादेखील वापरता येते. त्यासाठी अॅपमधील सेटिंग्जमध्ये ऑफलाइन डिक्शनरी सुरू करण्याची सोय आहे.
Dictionary – Merriam-Webster (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.merriamwebster) या अॅपमध्येदेखील अशाच प्रकारच्या सर्व सुविधा आहेत. हे अॅपदेखील ऑफलाइन वापरता येते. तसेच यामधे स्ट्राँग व्होकॅब्युलरी टेस्ट, ट्रु-फॉल्स, नेम दॅट थिंगसारखी पझल्सदेखील आहेत.
इंग्रजी भाषेत नियमित लेखन-वाचन करणाऱ्या मंडळींपासून नवशिक्यांपर्यंत सर्वाना ही अॅप्स उपयुक्त आहेत.
manaliranade84@gmail.com