तंत्रज्ञान आणि नवीन शोधांच्या माध्यमातून यांत्रिक उपकरणांना प्रतिमानव बनवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ कायमच असतात. रोबोटिक्स हे त्याच्याशी संबंधित असणारं क्षेत्र. यंत्रमानवांची निर्मिती करायची आणि त्यांना आज्ञा द्यायच्या. अर्थात तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले असले तरी अजूनही यंत्रमानव पूर्णत: स्वत:चे निर्णय स्वत: करू शकत नाही. थोडक्यात स्वत: विचार करू शकत नाहीत. मानवामध्ये असणारी ज्ञानेंद्रिये आणि संवेदनांसंबंधी असणारी इंद्रिये अंशत: यंत्रमानवांसाठीही तयार करण्यात आलेली आहेत. म्हणूनच हे प्रतिमानव बऱ्यापैकी स्मार्ट आहेत. आणि त्यामुळेच आपल्या हातात-खिशात असणारे छोटेखानी यंत्रमानव किंवा स्मार्टफोन्स, प्रगत पिढीतले फोन्स ठरतात.
सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्वच स्मार्टफोन्समध्ये सेन्सर्स आहेत. कुठलाही स्मार्टफोन हातात घेतला की त्याच्या फ्रंट कॅमेऱ्याच्या आजूबाजूला दोन-तीन लेन्ससदृश वर्तुळं असतात. ही वर्तुळ म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून सेन्सर्स असतात. स्मार्टफोनमध्ये साधारण आठ-दहा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतात. हे सेन्सर्स कुठले आणि त्यांचे काम काय, हे जाणून घेणे मोठे रंजक आहे.
प्रॉक्झिमिटी सेन्सर
स्मार्टफोनच्या स्पीकर्सच्या जवळ सामान्यत: हा सेन्सर्स असतो. याचे मुख्य काम म्हणजे स्मार्टफोनचा स्क्रीन हा आपल्या शरीरापासून किती जवळ आहे हे सांगायचे. जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा आपला कान आणि मोबाइलचा स्क्रीन यांच्यातले अंतर हा सेन्सर ताडतो आणि त्यानुसार स्क्रीनलाइट बंद करून बॅटरी सेव्ह करतो. स्क्रीनला बोलताना चुकून होणारा स्पर्श, चुकून दाबली जाणारी बटन्स यांना प्रतिबंध करण्याचे काम हा सेन्सर करतो. बॉडी प्रेझेन्स डिटेक्ट करत असल्यामुळे फोनवर बोलत असताना बेव सर्फिग, म्युझिक किंवा व्हिडीओ बंद होते आणि बॅटरी वाचते. तसेच संभाषण संपले की या गोष्टी पुन्हा सुरू होतात.
अॅम्बियन्ट लाइट सेन्सर
भवताली असणारा नैसर्गिक प्रकाश ताडून त्यानुसार स्क्रीन लाइटची तीव्रता कमी-जास्त करण्याचे महत्त्वाचे काम अॅम्बियन्ट लाइट सेन्सर करतो. अनेक स्मार्टफोन्स, टॅब्लेट तसेच लॅपटॉपमध्येही हा सेन्सर असतो. प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार डिस्प्ले ब्राइटनेस आपोआप अॅडजस्ट होतो. ह्या सेन्सरमध्ये फोटो डायोड्स असतात जे प्रकाशाच्या विविध स्पेक्ट्रमप्रति संवेदनशील असतात. त्यांच्या एकत्रित परिणामानुसार हे डायोड्स अॅडजस्ट होतात आणि त्यानुसार स्क्रीनचा ब्राइटनेस कमी-जास्त होतो.
अॅक्सिलरोमीटर
सर्वाधिक माहीत असलेला आणि वापरला जाणारा असा हा सेन्सर आहे. फोन आडवा केला की स्क्रीन डिस्प्ले आडवा होणे आणि उभा केला की पूर्ववत होणे हे ज्यामुळे शक्य होते तो हा सेन्सर. फोनच्या ओरिएंटेशननुसार डिस्प्ले बदलण्यासाठी हा सेन्सर कारणीभूत असतो. कॅमेऱ्याच्या आडव्या आणि उभ्या होण्यासाठीही हाच सेन्सर मदत करतो. टेम्पल रन असो किंवा इतर कुठलेही रेसिंग गेम्स सहजरीत्या खेळले जातात ते ह्याच सेन्सरमुळे. फोनची तिन्ही अंशांमध्ये म्हणजेच एक्स, वाय आणि झेड अॅक्सिसमध्ये होणारी हालचाल टिपून त्यानुसार डिस्प्ले बदलला जातो.
फिंगरप्रिंट सेन्सर
सध्याच्या बऱ्याचशा स्मार्टफोन्समध्ये असणारा हा लोकप्रिय सेन्सर आहे. आयफोनने ही संकल्पना आणल्यानंतर इतर सर्वच स्मार्टफोन्स कंपन्यांनी ती अवगत केली. फोन लॉकिंग, अनलॉकिंगपासून ते फोल्डर्स लॉकिंग-अनलॉकिंगपर्यंत सगळीकडेच हे सेन्सर उपयुक्त ठरतंय. स्वाइप राइट करून पॅटर्न किंवा पासवर्ड टाकण्याऐवजी फिंगरप्रिंटवरून अनलॉक करणं सोपं ठरलंय. हा सेन्सर म्हणजे असं एक डिव्हाइस आहे जे फिंगरप्रिंट पॅटर्नची डिजिटल इमेज कॅप्चर करतं. जेव्हा जेव्हा बोट स्कॅनरवर ठेवलं जातं तेव्हा त्याचे एक बायोमेट्रिक टेम्प्लेट बनवले जाते आणि ते स्टोअर करून मॅचिंगसाठी वापरले जाते.
याशिवाय मॅग्नेटोमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर, होकायंत्र, एअर ुमिडिटी सेन्सर, पेडोमीटर, हार्ट रेट मॉनिटर असे एकापेक्षा अनेक सेन्सर्स विविध प्रकारच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असतात. काही सेन्सर्स हे एकटे काम करतात तर काहींसाठी एकापेक्षा दोन सेन्सर्स एकत्रित वापरले जातात. उदाहरणार्थ, मोबाइलमधल्या होकायंत्रासाठी लोहचुंबकाचा वापर करता येत नाही. कारण त्यामुळे कम्युनिकेशनला बाधा येऊ शकते. अशावेळी उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून येणाऱ्या लो फ्रिक्वेन्सी सिग्नलला डिटेक्ट केले जाते आणि मग अॅक्सिलरोमीटरच्या साहाय्याने फोनचे ओरिंएटेशन आणि त्यावरू दिशा काढली जाते.
थोडक्यात अॅप्स आणि इतर सॉफ्टवेअर्सबरोबरच या स्मार्ट सेन्सर्समुळे स्मार्टफोनची कार्यपद्धती उजवी ठरते. आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने स्मार्ट बनतात.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com