परदेशी भाषा शिकवणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. तसेच या भाषांची तोंडओळख आणि पाया पक्का करून घेणारी अनेक विनामूल्य अॅप्स आणि वेबसाइट्सदेखील उपलब्ध आहेत. त्यापैकी डय़ुओलिंगो (duolingo) ह्य़ा अॅण्ड्रॉइड अॅपची माहिती करून घेणार आहोत. ह्य़ा मोबाइल अॅपवर गेल्यावर प्रथम आपल्याला जी भाषा शिकायची आहे ती निवडावी लागते. तसेच भाषा शिकताना आपण किती वेळ देणार हे निश्चित सांगावे लागते. जसे की दिवसभरात पाच मिनिटे किंवा पंधरा मिनिटे.
निवडलेली भाषा तुमच्यासाठी संपूर्णपणे नवी असल्यास तुम्ही प्राथमिक पायरीपासून सुरुवात करू शकता. जर ह्य़ा भाषेशी तुमचा परिचय असल्यास एक चाचणी परीक्षा देऊन ती भाषा किती जाणता हे तपासून तुमचा स्तर (लेव्हल) ठरवला जातो. प्राथमिक स्तरापासून सुरुवात केल्यावर त्यात शब्दांची ओळख करून देणारे पाठ दिसतात. जसजसे आपण एकेक पाठ पूर्ण करतो तसतसे पुढील पाठ खुले होतात.
तुमचे प्रगतिपुस्तक सेव्ह करण्यासाठी तुमचा अकाऊंट तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक पाठात काही ठरावीक शब्दच वेगवेगळ्या प्रश्नांच्या रूपात विचारले जातात. जसे की, विचारलेल्या शब्दासाठी योग्य चित्र निवडा. समजा,
* तुम्ही जर्मन भाषा शिकत असाल तर ‘गर्ल’ या शब्दासाठी जर्मनमध्ये कोणता शब्द आहे हे निवडायचे असते. त्यासाठी सोबत चित्र दिलेले असते. आपण जे उत्तर निवडू त्याचा उच्चार आपल्याला ऐकवला जातो.
* एखाद्या जर्मन वाक्याचे भाषांतर इंग्रजीत करायला सांगितले जाते. त्यासाठी योग्य पर्याय निवडून त्यावर ड्रॅग करायचे असते किंवा कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करायचे असते.
* रिकाम्या जागा भरा, जोडय़ा लावा या प्रकारचे प्रश्नदेखील असतात.
* एखादे जर्मन वाक्य ऐकवले जाते. ते ऐकून टाइप करायला सांगितले जाते. काही पाठांमधे इंग्रजी वाक्यांचे जर्मनमध्ये भाषांतर करायचे असते. त्यांचा उच्चारदेखील करून दाखवायला सांगितला जातो.
अशा प्रकारचे प्रत्येक पाठात अंदाजे १५ प्रश्न असतात. त्यामुळे नवे शब्द, त्यांचे उच्चार, स्पेलिंग यांचा सराव होतो. प्रत्येक भाषेसाठी पन्नासहून अधिक पाठ तयार केलेले आहेत. या अॅपवर तुम्ही स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्विडिश अशा भाषा इंग्रजीतून शिकू शकता. तुम्ही एका वेळी एकापेक्षा अधिक भाषादेखील शिकू शकता. भाषेची नव्याने ओळख करून घेणाऱ्यांना आणि ओळख असलेल्यांना सरावासाठी हे अॅप अतिशय उपयोगी आहे. तसेच या अॅपच्या संबंधित वेबसाइट डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर पाहता येईल.
manaliranade84@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा