स्मार्टफोन्स असोत की कॉम्प्युटर्स, आपल्याला जे जे कण्टेंट किंवा जी जी माहिती दिसते, मिळते, ती एका विशिष्ट प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली असते. फोटो दिसतात त्यासाठीचा प्रोग्राम वेगळा, व्हिडीओसाठी वेगळं, फक्त टेक्स्ट असेल तर वेगळा प्रकार. त्यामध्येसुद्धा पुन्हा उपप्रकार आहेतच. म्हणजे फोटो किंवा इमेज असेल तर तिचा प्रकार वेगळा असू शकतो. प्रकार म्हणजे फाइल फॉरमॅट. व्हिडीओच्या बाबतीत अनेकदा ही अडचण होते की, एखादा व्हिडीओ विंडोज प्लेयरमध्ये दिसत नाही, तर व्हीएलसी प्लेयर दिसतो. काही व्हिडीओ हे फक्त क्विक टाइममध्ये दिसतात. एमओव्ही, एमपी४, एफएलव्ही, एव्हीआय अशी अक्षरं फाइलच्या नावापुढे दिसतात. टेक्स्टच्या बाबतीतही हाच प्रकार असतो. आरटीएफ, डॉक्स, टीएक्सटी ही नावं म्हणजे केमिस्टकडची कडू औषधंच वाटतात. ही नावं दिसायला तशी डेंजर वाटत असली तरी तंत्रज्ञानातला सारा संसार हा या फॉरमॅट्सवरच आधारित आहे.

जगभरात असंख्य फाइल फॉरमॅट्स उपलब्ध आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने मुळात फॉरमॅट्स हवेतच कशाला? एकाच प्रकारच्या फाइलसाठी वेगवेगळे फॉरमॅट्स बनवायचेच कशाला? हे असे प्रश्न येणं साहजिक आहे, पण याचं उत्तरही तितकंच सोप्पं आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे प्रत्येक सॉफ्टवेअरसाठी लागणारी फाइल ही वेगळी असते. त्यामुळेच हे इतके फाइल फॉरमॅट्स आपल्याला दिसतात. अर्थात प्रत्येकाचं वेगळेपणही आहेच. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या गरजेनुसार फाइल फॉरमॅट्स बनवले जातात. इमेज किंवा फोटो फाइल ही त्याला सपोर्ट करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच दिसू शकते. म्युझिक फाइलही त्याच्याशी जुळवून घेणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच ऐकू येऊ  शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर उजव्या पायातला बूट डाव्या पायात जात नाही आणि गेला तरी चाल बिघडते. फाइल फॉरमॅट्सचं तसंच आहे. हे फॉरमॅट्स नेमके काय आहेत, त्यांचं काम काय आणि त्यांची वैशिष्टय़ं काय हे बघू या. सर्वच्या सर्व फॉरमॅट्सची माहिती देणं शक्य नाही. त्यामुळे काही ठरावीक, प्रचलित आणि त्यातही प्रामुख्याने इमेज, म्युझिक आणि व्हिडीओ फॉरमॅट्सची माहिती इथे देत आहोत.

पिक्चर फाइल्स

जेपीईजी – जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप किंवा नेहमीच्या भाषेत जेपेग नावाने ओळखला जाणारा हा प्रकार म्हणजे इमेज फाइल फॉरमॅट. फोटोग्राफ स्टोअर करण्यासाठी सामान्यत: हा फाइल फॉरमॅट वापरला जातो. अर्थात यामध्ये क्वालिटीशी तडजोड होते, पण फाइल साइजच्या आवश्यकतेनुसार क्वालिटी काय ठेवता येते. प्रामुख्याने छायाचित्रांशी निगडित असा हा फाइल फॉरमॅट आहे.

पीएनजी – इमेज, फोटोमधले रंग महत्त्वाचे असतील आणि क्वालिटी घालवायची नसेल तर हा फॉरमॅट वापरला जातो. ग्राफिक इमेजमधील रंगसंगती अबाधित ठेवण्यासाठी पीएनजी म्हणजेच पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स हा उत्तम पर्याय आहे. वेबसाइट आणि वेब डेव्हलपमेंटसाठी प्रामुख्याने या फॉरमॅटच्या इमेजेसचा वापर केला जातो.

जीआयएफ – जीफ म्हणजेच ग्राफिक्स इंटरचेज फॉरमॅट हा सध्याचा तसा लोकप्रिय प्रकार आहे. हा फॉरमॅट नवीन आहे अशातला भाग नाही, पण सोशल मीडियावर तुफान चालणारा फाइल फॉरमॅट आहे. स्थिरचित्रांपेक्षा थोडीशी हलती चित्रं दर्शवण्याची किमया या फॉरमॅटमध्ये आहे. सोप्या प्रकारचं ग्राफिक्स किंवा अ‍ॅनिमेशन करण्याची सुविधा या फाइल फॉरमॅटमध्ये आहे.

व्हिडीओ फाइल्स

खरं तर व्हिडीओच्या बाबतीत अनेक फॉरमॅट्स आहेत. डिव्हाइस आणि शूट-एडिटनुसार हे फॉरमॅट्स बदलत असतात.

एमपीफोर – म्युझिकच्या बाबतीत जसा एमपीथ्री लोकप्रिय आहे त्याप्रमाणेच व्हिडीओजसाठी एमपीफोर हा तसा सर्वमान्य प्रकार आहे. रॉ फूटेज फाइल्सची साइज ही खूप मोठी असते. त्यामुळे सगळ्याच डिव्हाइसवर ही अशी फाइल दिसणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत ती कम्प्रेस करणं हाच एक उपाय असतो. व्हिडीओ फाइल कम्प्रेस करून कुठल्याही डिव्हाइसवर दिसू शकेल ही सुविधा देणारा फाइल फॉरमॅट म्हणजे एमपीफोर. विंडोज मीडिया प्लेयर असो की व्हीएलसी किंवा अ‍ॅपलचा क्विक टाइम असो, सगळ्याच सॉफ्टवेअर्सवर एमपीफोरचा व्हिडीओ दिसू शकतो.

एमओव्ही – फक्त आणि फक्त अ‍ॅपल युजर्सच्या क्विक टाइम या सॉफ्टवेअरला सपोर्ट करणारा हा प्रकार. एमपीफोरमध्ये अनेकदा कम्प्रेशनमध्ये क्वालिटी खालावते. एमओव्हीच्या बाबतीत मात्र तसा प्रकार होत नाही. त्यामुळेच एमओव्हीची फाइल साइज ही एमपीफोरपेक्षा बरीच जास्त असते.

फाइल फॉरमॅट्सच्या बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे कम्प्रेशन. उपलब्ध डेटा कम्प्रेस करताना दर्जाशी तडजोड होते. उदाहरणार्थ बाहेरगावी जात असताना छोटय़ा बॅगेत खूप सारे कपडे हे अगदी कोंबले जातात, पण तेवढय़ाच प्रमाणातले कपडे हे मोठय़ा बॅगेत ठेवताना त्यांची घडी मोडत नाही. कम्प्रेस करणं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कोंबणं. हे एकदा लक्षात घेतलं, की मग आपल्याला इमेज, व्हिडीओची क्वालिटी खराब का होते हे समजायला सोपं जातं.

म्युझिक फाइल्स

एमपीथ्री

एमपीथ्रीचा खरा फुलफॉर्म हा जरा वेगळा आहे. एमपीईजी म्हणजेच ‘मूव्हिंग पिक्चर एक्सपर्ट्स ग्रुप १ ऑडिओ लेअर ३’ एवढा मोठा फुलफॉर्म आहे याचा. आपल्या श्रवणक्षमतेपलीकडे असणारा ध्वनी किंवा आवाज कमी करायचा या मुख्य उद्देशाने या फाइल फॉरमॅटचा जन्म झाला. त्याशिवाय शीण आवाजाचा दर्जा कमी करायचा आणि उरलेला ध्वनी कौशल्याने कम्प्रेस केलेली ऑडिओ फाइल म्हणजे एमपीथ्री. म्युझिकच्या क्षेत्रात या फाइल फॉरमॅटएवढी लोकप्रियता कुठल्याच फॉरमॅटला लाभलेली नाही.

डब्लूएमए

विंडोज मीडिया ऑडिओ म्हणजेच डब्लूएमए. हा फाइल फॉरमॅट खरं तर एमपीथ्रीला पर्याय म्हणून तयार करण्यात आला होता. एमपीथ्रीमध्ये आवाजाची कमी होणारी क्वालिटी रोखण्यासाठी डब्लूएमए फॉरमॅट आला खरा, पण बहुतांश इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ही फक्त एमपीथ्रीला सपोर्ट करणारी असल्याकारणाने हा प्रकार मागे पडला. दर्जा म्हणाल तर आजही डब्लूएमए फॉरमॅटमधलं गाणं हे एमपीथ्रीपेक्षा कधीही भारी अनुभव देतं कानांना.

pushkar.samant@gmail.com

Story img Loader