कॅलक्युलेटर हे जवळजवळ प्रत्येक घरात आढळणारे एक साधन आहे. कोणाकडे साधा तर कोणाकडे सायंटिफिक कॅलक्युलेटर असतो. आता ही सुविधा स्मार्ट फोनमध्येच उपलब्ध झाली आहे. गुगल प्ले स्टोअरवर कॅलक्युलेटर्सची अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.
आज आपण Fraction Calculator Plus Free या अ‍ॅपबद्दल जाणून घेणार आहोत. (iPhone, iPad साठी – https://itunes.apple.com/us/app/fraction-calculator-plus-free/id580778301?mt=8) (Android साठी – https://play.google.com/store/apps/details?id=com.digitalchemy.calculator.freefraction ) सर्वसाधारण कॅलक्युलेटरवर दशांश चिन्ह असलेल्या संख्यांची आकडेमोड करण्याची सोय असते. उदाहरणार्थ 2.5+3.6 ही आकडेमोड या कॅलक्युलेटरवर सहजपणे करता येते. परंतु पूर्णाकयुक्त अपूर्णाकाची बेरीज त्यावर सहज करून बघता येत नाही. उदाहरणार्थ 1.5 ही संख्या एक पूर्णाक एक छेद दोन (1½) अशी लिहिली जाते. आता समजा आपल्याला एक पूर्णाक एक छेद दोन (1½) आणि तीन छेद पाच (?) यांची बेरीज करायची असेल तर? सर्वसाधारण कॅलक्युलेटरवर पूर्णाकयुक्त अपूर्णाक संख्या लिहिण्याची सोय उपलब्ध नसते. या अ‍ॅपच्या साहाय्याने अशी आकडेमोड सहज करता येणार आहे. कॅलक्युलेटरचा स्क्रीन पाच भागांत विभागला आहे. एक भाग पूर्णाकाचे आकडे लिहिण्यासाठी, दुसरा भाग अंश आणि तिसरा छेदाचे आकडे लिहिण्यासाठी आहे. चौथ्या भागात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर ह्या गणिती क्रियांचा समावेश आहे आणि पाचव्या भागात आपण टाइप केलेली संख्या, गणिती क्रिया आणि त्यांचे उत्तर दर्शवणारा स्क्रीन आहे.
तुम्हाला जर कधी पूर्णाकयुक्त अपूर्णाकांची आकडेमोड करायची गरज पडली तर हे अ‍ॅप नक्कीच उपयोगी होईल.
त्याचप्रमाणे भूमितीमध्ये आपण अनेक द्विमितीय (2d) आणि त्रिमितीय (3d) आकार शिकतो. प्रत्येक 2d आकाराचे क्षेत्रफळ, परिमिती तर 3d आकारांचे पृष्ठफळ आणि घनफळ काढण्याची सूत्रे वेगवेगळी. शालेय अभ्याक्रमात प्रत्येकाने ही सूत्रे तोंडपाठ केलेली असतात. काही वेळा सोडवलेले गणित तपासून बघण्यासाठी आपण कॅलक्युलेटरचा उपयोग करतो. सामान्य कॅलक्युलेटरवर आपल्याला आकडे आणि गणिती क्रिया सूत्रात भराव्या लागतात. त्यात योग्य सूत्र भरण्याची जबाबदारी आपली असते. कॅलक्युलेटर फक्त आकडेमोड करून देतो. Geometry (Android साठी – https://play.google.com/store/apps/details?id=ru.knnv.geometrycalcfree ) ह्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही 20 हून अधिक 2d आणि 3d आकारांचे क्षेत्रफळ, घनफळ असे बरेच काही केवळ एका क्लिकवर मिळवू शकता. आपल्याला हव्या त्या भूमितीय आकारावर क्लिक केल्यावर कुठली मापे दिली असता या गोष्टी मिळू शकतात ते सचित्र पद्धतीने सांगितले जाते. उदाहरणार्थ जर तुम्ही चौरस(स्क्वेअर) या विभागात गेलात तर येथे चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती दोन वेगवेगळ्या सूत्रांनी मिळवू शकता. पहिल्या सूत्रात चौरसाच्या बाजूचा वापर केला आहे तर दुसऱ्या सूत्रात चौरसाचा कर्ण वापरला आहे. भूमितीय आकाराशी संबंधित मापे देण्यासाठी तुम्ही चौकटीत योग्य ते आकडे लिहिले की हे अ‍ॅप स्क्रीनवर केवळ उत्तर न दाखवता ते सूत्राखालोखाल सोडवून देखील दाखवते. या अ‍ॅपमध्ये त्रिकाणातील कोनांचे माप, चौरस, आयत, समभुज चौकोन, समांतरभुजचौकोन इत्यादीतील कर्णाचे माप, वर्तुळातील कंस, सेक्टरचे माप यासारख्या गोष्टीही मिळवता येतात.
भूमितीय आकारांच्या मोजमापांशी नियमित संपर्क येणाऱ्या व्यक्तींना हे अ‍ॅप नक्की उपयुक्त आहे.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा