ठिपके क्रमाने जोडून एखादे छानसे चित्र तयार करणे हा लहान मुलांचा आवडता खेळ. पण हाच खेळ सर्व वयोगटातील लोकांना थोडय़ा चॅलेंजिंग पद्धतीने खेळायला मिळाला तर नक्कीच आवडेल ना?
Star Lines (https://play.google.com/store/apps/details?id=pl.com.solidware.starlines) हे असेच एक अॅप आहे. या अॅपमधे काही बिंदू जोडून तयार झालेली आकृती प्रथम काही क्षणांसाठी तुम्हाला दाखवली जाते. तेवढय़ा वेळात त्या आकृतीतील सुरुवातीचा बिंदू, अंतिम बिंदू, बिंदूंना जोडणाऱ्या रेषा, त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा असतो. त्यानंतर तुमच्या समोर तशीच आकृती बनवण्यासाठी केवळ बिंदू दिले जातात. हे चित्र पूर्ण केल्याबद्दल गुण म्हणून तुम्हाला एक स्टार मिळतो. आणि जर तुम्ही एकही चूक न करता दिलेल्या वेळेच्या आत चित्र पूर्ण केल्यास तुम्हाला अधिक स्टार मिळवण्याची संधी असते.
जर बिंदू चुकीचे जोडले गेले तर ती रेषा लाल रंगाने दर्शवली जाते. ती रेषा तुम्ही डिलिट करून पुन्हा योग्य बिंदू जोडू शकता. या अॅपमधे सोप्या आकृत्यांपासून ते कठीण आकृत्यांपर्यंत अशा अनेक लेव्हल्स आहेत. पुढच्या कठीण लेव्हलला जाण्यासाठी किमान स्टार्स मिळवणे आवश्यक असते. म्हणजेच येथे तुमच्या स्मरणशक्तीला नक्कीच आव्हान मिळते.
गंमत म्हणजे या प्रकारचा खेळ आपल्या पूर्वजांनी म्हणजेच त्याकाळच्या ऋषिमुनींनी रात्रीच्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहून खेळलेला आहे. सूर्य किंवा इतर ग्रहांचे भ्रमण आकाशात कसे होते हे सांगण्यासाठी त्यांनी वर्तुळाकार आकाशाचे २७ भाग पाडले. त्या भागांना नक्षत्रे म्हणतात. या नक्षत्रांना दिलेली नावे ही विविध भागांमधील चांदण्यांचे ठिपके जोडून बनलेल्या विशिष्ट आकारावरून दिलेली आहेत. या अॅपला स्टार लाइन हे नाव दिले जाण्याचे कारण हेच आहे.
असेच आणखी एक मनोरंजक वन टच अॅप म्हणजे One touch drawing (https://play.google.com/store/apps/details?id=com.ecapycsw.onetouchdrawing). या खेळातदेखील तुम्हाला ठिपके जोडूनच आकृती तयार करायची आहे. बनवायचे चित्र आणि त्या चित्राचे बिंदू स्क्रीनवर दिसत राहतात. ते बिंदू जोडून स्क्रीनवरील चित्र तुम्हाला पुन्हा काढायचे असते. या खेळाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला एकच रेषा दोन वेळा काढता येत नाही. त्यामुळे कोणतेही दोन बिंदू विचार करूनच जोडावे लागतात. या अॅपमधे हाच खेळ टायमर लावून खेळण्याची देखील सुविधा आहे. त्यामुळे एखादी आकृती तुम्ही किती जलद बिनचूक पूर्ण करू शकता याची नोंद होते.
तुमची स्मरणशक्ती किती तीक्ष्ण आहे हे मनोरंजक पद्धतीने पाहण्यासाठी हे अॅप जरूर वापरून पाहा.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com
अॅपची शाळा : स्मरणशक्ती वाढविणारा खेळ
या खेळाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला एकच रेषा दोन वेळा काढता येत नाही.
Written by मनाली रानडे
आणखी वाचा
First published on: 12-07-2016 at 00:17 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Games app increase memory power