गुगल हे सध्याच्या घडीला जगातलं आघाडीचं ‘सर्च इंजिन’ आहे. मुळात ‘सर्च इंजिन’ हा शब्दप्रयोगच गुगलने आणला. काहीही शोधायचं असलं की गुगलला साकडं घातलं जातं. फक्त घरात किंवा इतरत्र कुठे हरवलेल्या गोष्टी शोधत नाही एवढाच काय तो दोष असेल गुगलमध्ये. बाकी मानवाला ज्ञात असलेल्या कुठल्याही विषयावरची माहिती चुटकीसरशी देत असल्यामुळे गुगलला देवासमान मानणारी अनेक मंडळी आहेत. कॉलेजियन्स असो की ऑफिसमधले प्रोजेक्ट्स पूर्ण करणारे सहकारी- ‘जिसका कोई नही उसका गुगल है’ ही उक्ती त्यांच्यासाठी सार्थ अशीच आहे. देवही एवढय़ा लवकर पावत नाही जितक्या तातडीने गुगलबाबा पावतात.
‘सर्चबॉक्स’मध्ये अक्षरं उमटायला लागली की गुगल त्यांना अनुसरून असे ‘सर्च सजेशन्स’ द्यायला लागतो. मात्र अनेकदा आपल्याला हवी असलेली नेमकी माहिती मिळत नाही किंवा ती मिळवण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. गुगलवर माहिती शोधणं हेसुद्धा एक कसब आहे. शोधलं की सापडतं हे खरं असलं तरी नेमकं शोधायचं कसं तेही माहीत असणं गरजेचं आहे. गुगलने पुरवलेल्या अनेक सव्र्हिसेसपैकी गुगल सर्च ही सर्वाधिक वापरली जाणारी सुविधा आहे. मात्र फार कमी लोकांना त्याचा यथोचित वापर करता येतो असं खुद्द गुगलने म्हटलं आहे. या सर्चगॉडकडे गाऱ्हाणं कसं मागायचं ते आपण बघू या.
‘कीवर्डस्’ महत्त्वाचे – ‘सर्चबॉक्स’मध्ये (जिथे आपण आपली क्वेरी टाइप करतो तो) आपण जे लिहितो त्याला ‘सर्च कीवर्डस’ म्हणतात. हे ‘कीवर्डस’च गुगलच्या ‘वेब डॉक्युमेंट्सच्या इंडेक्स’सोबत पडताळून पाहिले जातात. आणि ज्या ‘वेब डॉक्युमेंट्स’शी ते जुळले जातात ते ‘वेबपेजेस’ आपल्याला दिसतात. त्यामुळे जितके जास्त आणि योग्य ‘कीवर्डस’ वापरले जातील तितकी नेमकी माहिती मिळण्यासाठी मदत होईल. मात्र भरमसाट शब्द लिहिणंही टाळावं. एखाद्या मित्राला आपण ज्याप्रमाणे थोडक्यात समजावतो त्याच पद्धतीने आपली क्वेरी नेमक्या भाषेत गुगलला सांगणं उपयुक्त ठरतं.
‘ऑपरेटर्स’ – सामान्यत: सर्च करताना आपण तीन-चार शब्द किंवा अख्खं वाक्य लिहितो. पण गुगल मात्र त्यापैकी नेमके शब्द घेऊनच शोधाशोध करीत असतो. हे सर्च अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी गुगल सर्च ऑपरेटर्सचा वापर करता येऊ शकतो. सर्च ऑपरेटर्स हे ‘सर्च क्वेरी’ला अधिक मजबूत करण्यासाठी असतात.
उदाहरणार्थ, एखाद्या वेबसाइटवरची शैक्षणिक विषयावरची आर्टिकल्स हवी असतील तर सर्चमध्ये SITE: असं लिहून त्या वेबसाइटचं नाव लिहावं. त्यानंतर “”Education” असं इनवर्टेड कॉमामध्ये लिहावं. एखाद्या विशिष्ट कालावधीत प्रसिद्ध झालेली आर्टिकल्स असतील तर तीही शोधता येतात. उदाहरणार्थ ‘2011 to 2014’ असं लिहिण्याऐवजी ‘2011.2014’ असं लिहिल्यास सर्च अधिक प्रभावी होतो. ‘-’ वजाबाकीचं चिन्ह वापरल्यास तो ‘कीवर्ड’ आणि त्याच्याशी संबंधित वेबपेजेस गुगल शोधत नाही. उदाहरणार्थ, ‘National Parkls in India -wikipedia ’ असं लिहिल्यास गुगल तुम्हाला विकिपीडिया सोडून इतर वेबपेजेस दाखवतो. वर सांगितलेल्या ‘रकळए: ’चा आणखी एक वापर आहे. ‘‘SITE:.edu’’ असं टाइप केल्यास शैक्षणिक वेबसाइट्सच रिझल्ट पेजवर दाखवल्या जातात.
मघाशी म्हटल्याप्रमाणे गुगलवर माहिती शोधणं हे खरोखरच कसब आहे. पौराणिक कथांमध्ये कसं अमुक देव प्रसन्न झाला की भक्ताला सांगायचा ‘‘वत्सा, हवा तो वर माग’’ त्या वेळी वत्स त्याला नेमकं हवं तेच मागायचा. हे गुगल प्रकरणही तसंच आहे. आपल्यावर गुगल प्रसन्न आहेच. फक्त नेमका वर मागण्याची कला अवगत असणं गरजेचं.
टीप : गुगल सर्च ऑपरेटर्सची यादी फार मोठी आहे. ती तुम्हाला गुगलवर नक्कीच मिळेल. हे ऑपरेटर्स कसे वापरायचे तेही तिथे दिलेलं आहे. त्यांची माहिती मिळवा आणि नेमकी माहिती शोधा.
अस्सं कस्सं? : गुगलचं व्हय महाराजा!
‘सर्चबॉक्स’मध्ये अक्षरं उमटायला लागली की गुगल त्यांना अनुसरून असे ‘सर्च सजेशन्स’ द्यायला लागतो.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-02-2016 at 04:15 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google search makes amazingly easy to find information