घरात एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर संपूर्ण घर त्याच्यामागे धावपळ करत असते. त्याचे पथ्यपाणी, खाण्यापिण्याच्या वेळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य औषध योग्य वेळी योग्य प्रमाणात देणे. औषध देण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते त्याला हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. डॉक्टर या सर्व गोष्टी प्रिस्क्रिप्शनमधे व्यवस्थित नमूद करत असतात आणि आपण त्याचे पालन करत असतो.

रोजच्या धावपळ आणि दगदगीच्या जीवनात महत्त्वाची कामे विसरली जाऊ  नयेत म्हणून आपण रिमाइंडर्स, स्टिकी नोट्सचा उपयोग करत असतो. याच धर्तीवर आधारित असलेले Medisafe® ¨FZ Medisafe Meds & Pill Reminders हे अ‍ॅप औषधाच्या वेळेची आठवण करून देण्यास मदत करेल. (https://play.google.com/store/apps/details?id=com.medisafe.android.client&hl=en )

हे अ‍ॅप सुरू केल्यावर तुम्ही तुमचे अकाउंट तयार करू शकता किंवा गेस्ट युजर म्हणून हे अ‍ॅप वापरू शकता. डावीकडे कोपऱ्यात क्लिक केल्यास तुम्हाला विविध पर्याय दिसतील ज्याच्या साहाय्याने तुम्ही हे अ‍ॅप अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकता.

Pillbox हा पर्याय तुम्हाला स्क्रीनवर चार भाग दाखवतो. तुमचा संपूर्ण दिवस चार भागांमध्ये म्हणजेच सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र अशा प्रकारे विभागला जातो. याच स्क्रीनवरील खाली असलेल्या अधिकच्या चिन्हाच्या साहाय्याने औषधे, केलेल्या तपासण्याच्या नोंदी, एखाद्या दिवसासाठी औषधाचा आधी ठरवलेला डोस वाढवायचा असल्यास तेदेखील करू शकता.

Medication या पर्यायाच्या साहाय्याने तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांची नावे एकेक करून समाविष्ट करू शकता. प्रथम औषधाचे नाव द्या. नंतर हे औषध दिवसातून किती वेळा घ्यायचे आहे किंवा किती तासांच्या कालावधीनंतर घ्यायचे हे निवडू शकता. कुठल्या दिवसापासून औषध सुरू करायचे, किती दिवसांसाठी घ्यायचे, की कायमस्वरूपी घ्यायचे आहे हे पर्याय निवडू शकता. इतकेच नव्हे तर हे औषध अ‍ॅलोपथी/आयुर्वेदिक/होमिओपथी यांच्या गोळ्या असतील तर त्या गोळ्यांचा आकार, रंगदेखील निवडू शकता. तसेच औषध चूर्ण, ड्रॉप्स, इंजेक्शन, सिरप वगैरे असेल तर त्याचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत.

येथे औषधाचा डोस सेट करण्याची सोय आहे. काही औषधे जेवणासोबत, जेवणाआधी किंवा जेवणानंतर घ्यायची असतात. याबद्दलची सूचना नमूद करता येते. कायमस्वरूपी औषधे घेणाऱ्यांसाठी औषधे संपायच्या आत ती वेळच्या वेळी विकत आणली जावीत यासाठीदेखील रिमाइंडर सेट करण्याची सोय आहे.

ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल इत्यादींच्या ठरावीक काळाने चाचण्या तुम्ही करत असल्यास त्याच्या रीडिंग्जच्या नोंदी Measurement या पर्यायाखाली करू शकता. डॉक्टरांचे नाव, फोन नंबर्स, इमेल, पत्ता नमूद करून काँटॅक्ट तयार करू शकता. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठीदेखील रिमाइंडर सेट करण्याची सोय आहे.

इतर सेटिंग्जमध्ये कशा प्रकारे रिमाइंडर वाजला आणि दिसला पाहिजे याची सेटिंग्ज आहेत. औषधाचा एकही डोस घेण्याचे विसरले जाऊ  नये याची काळजी या अ‍ॅपद्वारे घेतली जाऊ  शकते. तर मग हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप वापरून बघा आणि तंदुरुस्त राहा.

manaliranade84@gmail.com