माणसाची श्रीमंती ही त्याने जोडलेल्या माणसांवरून होते असं म्हणतात. म्हणजे खिशात पैका असणंही गरजेचं आहेच, नाही असं नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो पैका ज्यांच्यासोबत खर्च करता येऊ शकतो अशी माणसं. माणूस हा समाजशील प्राणी वगैरे आहे. त्यामुळे तो समुहातच राहतो. या समुहातील व्यक्तींशी होणा-या आदानप्रदानांमधून त्याचं व्यक्तीमत्त्व वगैरे घडत अथवा बिघडत असतं. पण मुळात व्यक्तीसंग्रह हा कुठल्याही माणसासाठी खजिनाच. आता हा संग्रह नीट जपून ठेवणं ही ज्याची त्याची कला असते. पण आत्ताच्या तंत्रयुगात हा सारा संग्रह सामावलेला आहे तो हातातल्या स्मार्टफोनमध्ये. अर्थात कॉण्टॅक्ट्स नावाचा जो काही प्रकार आहे तो म्हणजेच हा संग्रह.

आपण किती व्यक्तींना ओळखतो, कितीजण आपल्याला ओळखतात वगैरे संकल्पनांचा पुरावा म्हणजे कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये असणारी नावं आणि त्यांचे नंबर्स. स्मार्टफोनमधला डेटा, मग तो कुठल्याही प्रकारचा असो – व्हिडिओज, फोटोज, गाणी, डॉक्युमेंट्स, अ‍ॅप्स, एखाद्य खजिन्यासारखा जपला जातो. या आदीत वरच्या नंबरवर असेल तर ते म्हणजे कॉण्टॅक्ट्स. मोबाइलमधून नंबर डिलीट होणं, अचानक कॉण्टॅक्ट लिस्ट फॉरमॅट होणं असले प्रकार अनेकांच्या बाबतीत अनेकदा होत असतात.

हे मुळात होतं कसं, होऊ नये म्हणून काय

काळजी घ्यायची आणि झालंच तर काय पावलं उचलायची हे माहित असेल तर व्यक्तिसंग्रहाला ठेच लागत नाही.

मुळात कॉण्टॅक्ट लिस्ट डिलीट होण्यामागे काही कारणं असतं. अचानक कॉण्टॅक्ट्स गायब झालेत असं अनेकदा होते. स्मार्टफोनमध्ये व्हायरस असेल तर ही गोष्ट होऊ शकते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे सिस्टम अपडेट. बहुतांशवेळा अँड्रॉइड अपग्रेड होत असताना कॉण्टॅक्ट्स डिलीट होतात. अँड्रॉइड स्वत:सुद्धा अचानक कॉण्टॅक्ट लिस्ट फॉरमॅट करून टाकतं. अशावेळी असहाय वाटून जातं. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. आणि ते म्हणजे फॅक्टरी रिस्टोअर. फोन फॅक्टरी सेटिंगवर गेला की अश्मयुगात गेल्यासारखं वाटणं साहजिक आहे.

कॉण्टॅक्ट्स गायब होऊ द्ययचे नसतील तर करता येण्याजोगे अनेक उपाय आहेत. त्यापैकी पहिला उपाय म्हणजे कॉण्टॅक्ट्सचा बॅकअप. अँड्रॉइड फोन्ससाठी गुगल बॅकअपचा पर्याय उपलब्ध आहे. कॉण्टॅक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर मेन्यू बटनवर क्लिक करायचं. तिथे येणा-या यादीतून “मूव्ह डिव्हाइस कॉण्टॅक्ट्स टू” या ऑप्शनवर क्लिक करायचं. आणि त्यानंतर बॅकअप अँड्रॉइड कॉण्टॅक्ट्स टू गुगलवर क्लिक करायचं. तुम्ही ज्या गुगल अकाउंटवर साइन इन असाल त्या अकाउंटमध्ये मोबाइलवरच्या कॉण्टॅक्ट्सचा बॅकअप घेणं सुरू राहिल. हा बॅकअप पूर्ण आणि व्यवस्थित झाला आहे का हे बघण्यासाठी जीमेल अकाउंटवर साइन इन करायचं. आणि एकदा खात्री करून घ्यायची.

कॉण्टॅक्ट्स सिंक करणं हा सर्वात सुरक्षित उपाय आहे. अँड्रॉइड असो की अ‍ॅपल, दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसाठी क्लाउडवर कॉण्टॅक्ट्स सेव्ह करणं शक्य आहे. वेळोवेळी सिंक करून बॅकअप घेत राहणं हा कॉण्टॅक्ट्स जपून ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सिंRोनाइज होऊन जीमेलवर कॉण्टॅक्ट्सची यादी अपडेटेड ठेवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉण्टॅक्ट्स बॅकपअपचा पर्याय हा सगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे. मॉडेल कुठलंही असो, प्रत्येक स्मार्टफोनमधून कॉण्टॅक्ट बॅकअप घेतला जाऊ शकतो. हा प्रकार किचकट वाटत असेल तर कॉण्टॅक्ट्स मेमरी कार्डवर हलवणंही शक्य आहे. किंवा त्याहून सुरक्षित उपाय म्हणजे कम्प्युटर

किंवा लॅपटॉपवर सेव्ह करणं. अर्थात हा पारंपरिक मार्ग झाला. पण शेवटी प्रश्न व्यक्तीसंग्रहाचा आहे नाही का.

सामान्यत: शोधलं की सापडतं हे तत्व हरवलेल्या वस्तूंच्या बाबतीत अवलंबलं जातं. कॉण्टॅक्ट्सच्या बाबतीत मात्र असं काही होत असेल का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. कॉण्टॅक्ट्स एकदा डिलीट झाले की काय करायचं असा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. सिस्टम रिस्टोअर नावाचा एक ऑप्शन कम्प्युटर्सच्या बाबतीत असतो. ठराविक एका तारखेला, वेळेला आपला कम्प्युटर ज्या अवस्थेत होता, जो काही डेटा त्यावर होता तो तसा मिळवता येण्याचा पर्याय या ऑप्शनमध्ये असतो. स्मार्टफोन्सच्या बाबतीतही तसं होऊ शकतं.

अँड्रॉइड रिकव्हरी टूल नावाचं सॉफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध आहे. विंडोज तसंच आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसाठी हे सॉफ्टवेअर काम करतं. हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं. समजा कॉण्टॅक्ट्स डिलीट झाले असतील तर स्मार्टफोन पीसीसोबत कनेक्ट करायचा. अँड्रॉइड 4.2 किंवा त्यापुढल्या व्हर्जनसाठी सेटिंग्ज—अबाउट फोन—बिल्ड नंबर असं करून डेव्हलपर मोडमध्ये जायचं. त्यानंतर पुन्हा सेटिंग्जमध्ये येऊन डेव्हलपर ऑप्शन्समध्ये जायचं आणि युएसबी डिबगिंग करायचं. त्यानंतर लॉस्ट कॉण्टॅक्ट्ससाठी स्मार्टफोन स्कॅन करायचा. सगळ्या फाइल्स स्कॅन झाल्या की रिस्टोअरवर क्लिक करायचं. एक लक्षात असू द्य नुकत्याच डिलीट झालेल्या कॉण्टॅक्ट्स फाइल्स या प्रRियेने मिळवता येऊ शकतात. डिलीट झालेले सगळेच्या सगळे कॉण्टॅक्ट्स परत मिळतील याची मात्र शाश्व्ती कोणतंच अ‍ॅप देत नाही.

थोडक्यात काय तर लोकसंग्रह अबाधित ठेवणं हा मुद्दा आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणं काहीच गैर नाही. आणि जे उपलब्ध आहे ते मार्ग तर अवलंबलेच पाहिजेत नाही का?

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

Story img Loader