दिवस पावसाळ्याचे आहेत. म्हणजे सध्या जरी पावसाने उसंत घेतलेली असली तरी कधी अचानक सरी बरसतील याचा काही भरवसा नाही. त्यात पुन्हा रस्त्यांची अशी अवस्था आहे की चालताना पाय नीट टाकायला लागतो. कपडय़ांवर चिखल उडणार नाही ह्य़ाची काळजी घ्यावी लागते. लोकांच्या छत्रीच्या तारा चुकवाव्या लागतात. ट्रेनमध्ये दुसऱ्याचा चिखलाचा पाय आपल्या पायावर ठसा उमटवणार नाही याकडे लक्ष द्यावं लागतं. अशा सगळ्या प्रपंचामध्ये आपला तारणहार असणारा स्मार्टफोन जर पडला आणि ओला झाला तर मग विचारूच नका. दुष्काळात तेरावा महिनाच. खरं तर मोबाइल ओला होण्यासाठी कुठला एक विशिष्ट मौसम असतो असं नाही. अगदी आंघोळ करताना बादलीत पडून एक डुबकी घेणं कधीही शक्य असतं. पण मुद्दा हा आहे की मोबाइल पाण्यात पडला, ओला झाला की करायचा तरी काय.
पाच रुपयाचं प्लास्टिकचं कव्हर आणि त्यात दडवलेला मोबाइल अनेकांच्या खिशातून डोकावत असतो. पण ही झाली सावधगिरीची उपाययोजना. ओला फोन घसा कोरडा करतो हेच खरं. पण मुळात फोन ओला झाल्यानंतर काय करावं यापेक्षा काय करू नये हे माहीत असणं महत्त्वाचं आहे.
हे करू शकता
* शक्य तितक्या तातडीने फोन स्वीच ऑफ करा. स्वीच ऑन असलेल्या फोनमध्ये पाणी गेल्याने शॉर्टसर्किटची शक्यता जास्त असते.
* कव्हरमधून फोन बाहेर काढा. तसंच सीमकार्ड, स्मार्टकार्डसुद्धा फोनपासून वेगळं करा.
* फोनमधून बॅटरीसुद्धा वेगळी बाहेर काढा. सगळ्याच फोनमध्ये ही सुविधा असेल असं नाही. हल्लीच्या अनेक स्मार्टफोन्समधून बॅटरी वेगळी काढता येत नाही. तशी ती होत नसेल तरी विनाकारण प्रयत्न करू नका.
* एखाद्या स्वच्छ कापडाने किंवा पेपर टॉवेलने मोबाइल शक्य तितका सुकवायचा प्रयत्न करा. टेबल किंवा फरशी पुसल्यासारखं मोबाइल पुसू नका. कापड ठेवून पाणी शोषून घ्या.
* जर का पाणी खूप आतपर्यंत गेलं असेल तर व्हॅक्युम क्लिनरचा वापर करू शकता. मात्र हा उपाय करण्याआधी सिमकार्ड, मेमरीकार्ड, बॅटरी फोनपासून वेगळं करा. फोनच्या छोटय़ा छोटय़ा खाचाखुचांमध्ये शिरलेलं पाणी व्हॅक्युम क्लिनरच्या साहाय्याने शोषून घेणं शक्य असतं. पण हे करताना काळजी घ्या.
* फोन सुकवण्याचा सर्वात सोपा, किफायतशीर आणि स्वस्त उपाय म्हणजे तांदूळ. एक हवाबंद किंवा सीलबंद प्लास्टिकच्या पिशवीत तांदूळ भरायचा आणि त्यामध्ये फोन ठेवून द्यायचा. तांदळामध्ये पाणी आणि बाष्प शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे फोन संपूर्णपणे कोरडा होऊ शकतो. पण तो सुरू होईल की नाही हे मात्र तो किती ओला झाला आहे यावरच अवलंबून आहे. अनेकदा पाण्यामुळे शॉर्टसर्किट होतं किंवा पाण्यातल्या मिनरल्समुळे इलेक्ट्रॉनिक्स खराब होऊ शकतात.
* निदान दोन-तीन दिवस तरी फोन कोरडा होण्यासाठी वाट पाहा. फोन सुरू करून बघण्याचा कितीही मोह झाला तरी टाळा. दोन-तीन दिवसांनंतर फोन बाहेर काढा. त्यामध्ये बॅटरी, सिमकार्ड, मेमरीकार्ड घाला आणि स्वीच ऑन करा.
फोन सुरू झाला नाही तर चार्जिगला लावा. जर का चार्ज होत नसेल तर बॅटरी खराब झाल्याची शक्यता आहे. बॅटरी बदलून पाहा किंवा फोन सरळ रिपेअरिंगसाठी द्या. फोन व्यवस्थित सुरू झाला तरी पुढील काही दिवस त्याच्या फंक्शनिंगकडे नीट लक्ष द्या. गाणी लावून बघा, व्हिडीओ नीट दिसतायंत का ते पाहा, टचस्क्रीनचं कामकाज व्यवस्थित सुरू आहे त्याकडे लक्ष द्या. अनेकदा काही दिवसांनंतर फोनमधील प्रॉब्लेम समोर यायला लागतात. या सर्व उपायांसोबतच आणखी एक उपाय नेहमी सांगितला जातो तो म्हणजे फोन अल्कोहोलमध्ये बुडवून काढा. पण हा उपाय बराच धोकादायक आहे. एक तर शुद्ध अल्कोहोल हे ज्वालाग्रही आहे आणि ते खूप काळजीपूर्वक हाताळावं लागतं. फोन भिजला तर हे सगळे उपाय आहेत. पण तो भिजू नये ह्य़ाची काळजी घेणं कधीही चांगलं नाही का? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हेच खरं.
काय टाळाल?
* फोन ऑन करू नका
* कुठलीही की किंवा बटन दाबू नका. फोन स्वीच ऑफ करायचा असेल तर ठीक आहे.
* फोनवर टॅप करू नका किंवा तो जोरजोरात हलवू नका.
* अगदी नेहमी होणारी चूक म्हणजे फोन उघडणं. कुठल्याही स्मार्टफोनमध्ये लिक्विड डॅमेज इंडिकेटर असतो. फोन उघडला की हा इंडिकेटर अॅक्टिव्हेट होतो. काही स्मार्टफोन्समध्ये असे इंडिकेटर्स असतात जे भिजल्यावर रंग बदलतात. उदा. एखादा छोटा स्टीकर. ह्य़ा इंडिकेटर्सवरून मॅन्युफॅक्चर्सना फोन नेमका कशामुळे बिघडला हे कळतं. फारच गरज असेल आणि अनुभव असेल तर मोबाइल उघडा, अन्यथा तसा कुठलाही प्रयत्न करू नका.
* ओला झाला म्हणून फुंकर मारू नका. त्यामुळे पाणी स्मार्टफोनच्या आणखी आत जाण्याची शक्यता असते.
* फोन ओला झाला की ड्रायरने ब्लो केल्याने किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने तो नीट होतो असा एक समज आहे. पण त्याने स्मार्टफोन खराब होण्याचीच शक्यता जास्त असते. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे फोनमध्ये शॉर्टसर्किट होऊन तो फुटण्याची शक्यता असते.
* फोन ओला झाल्यानंतर काय टाळावं याची ही यादी झाली. पण मग नेमकं करायचं तरी काय.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com